फिच, व्हाल लॉग्सडॉन : (१० मार्च १९२३- ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. फिच व शिकागो विद्यापीठातील भौतिकीविज्ञ जे. डब्ल्यू. क्रोनिन यांनी ब्रुकहेवेन नॅशनल लॅबोरेटरी (न्यूयॉर्क) येथे अक्रिय K-मेसॉनांमधील [⟶ मूलकण] क्षयासंबंधी (ऱ्हासासंबंधी) केलेल्या प्रयोगाद्वारे मूलभूत सममितींच्या तत्त्वांच्या [⟶ सममिति नियम] होणाऱ्या उल्लंघनांचा शोध लावल्याबद्दल त्यांना १९८० सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

फिच यांचा जन्म मेरिमन (नेब्रॅस्का) येथे झाला. त्यांना प्रथमतः रसायनशास्त्राची आवड होती. अमेरिकन लष्करात असताना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना लॉस ॲलॅमॉस (न्यू मेक्सिको) येथील अणुबाँब प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी पाठविण्यात आले व त्या वेळी भौतिकी या विषयाशी त्यांचा प्रथम संबंध आला. जुलै १९४५ मध्ये त्यांनी ॲलामोगोर्डो येथील ५०९ बाँब हल्ला गटाने घेतलेल्या चाचण्यांत व प्राथमिक अणुबाँब चाचणीत भाग घेतला होता. मॅक्‌गिल विद्यापीठातून त्यांनी १९४८ मध्ये विद्युत् अभियांत्रिकी या विषयातील पदवी आणि कोलंबिया विद्यापीठातून १९५४ मध्ये भौतिकी या विषयातील पीएच्. डी. पदवी मिळविली. १९५३-५४ मध्ये कोलंबिया विद्यापीठात निदेशक म्हणून काम केल्यानंतर ते प्रिस्टन विद्यापीठात अध्यापन करण्यासाठी गेले व तेथे १९६० पासून भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. १९७६ मध्ये या विद्यापीठाच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष झाले.

विद्युत् चुंबकीय आविष्कारांकरिता तीन प्रकारच्या सममितींचे पालन केले जाते, असे फिच व क्रोनिन यांच्या शोधापूर्वी सिद्ध झाले होते. या तीन प्रकारच्या सममिती पुढीलप्रमाणे होत : (१) ⇨ द्रव्य आणि प्रतिद्रव्य यांमधील सममिती (उदा., इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन), (२) मूळ घटना अथवा वस्तू व तिचे आरशातील प्रतिबिंब यांमधील सममिती ऊर्फ समता आणि (३) अग्रगामी व प्रतिगामी काळ यांमधील सममिती. गुरूत्वाकर्षण व आणवीय स्तरावरील मूलकण (उदा., प्रोटॉन, न्यूट्रॉन व मेसॉन) याच सममिती तत्त्वांचे पालन करतात असे आढळले होते परंतु मूलकणांच्या क्षयासारख्या [उदा., अणुकेंद्रातील बीटा क्षय ⟶ किरणोत्सर्ग] दुर्बल परस्परक्रियांमध्ये यापैकी आरशातील प्रतिबिंबाच्या स्वरूपातील सममिती असत नाही, असे टी. डी. ली व सी. एन्‌. यांग यांनी प्रथम प्रयोगाने १९५७ मध्ये सिद्ध केले. ज्या तत्त्वाचे उल्लंघन झाले त्या तत्त्वाप्रमाणे कोणतीही विशिष्ट भौतिकीय परस्परक्रिया शक्य असेल, तर तिचे आरशातील प्रतिबिंबरूपी व्युत्क्रमी रूपसुद्धा शक्य असले पाहिजे असा अर्थ होतो. मूळ परस्परक्रिया व तिचे आरशातील प्रतिबिंब यांमध्ये वामावर्ती व दक्षिणवर्ती सममितींचा अंतर्भाव होतो. म्हणजेच निसर्ग या दोन प्रकारांमध्ये भेदभाव करीत नाही असे कळते. या शोधामुळे असे स्पष्ट झाले की, तीन सममिती तत्त्वांपैकी दोन सममिती तत्त्वांचे एकाच वेळी उल्लंघन होणे शक्य आहे. एका सममितीच्या उल्लंघनामुळे झालेला परिणाम दुसऱ्या सममितीच्या योग्य उल्लंघनामुळे भरून काढला जाऊ शकतो. यामुळे अशा सर्व मुलभूत परस्परक्रिया काल व्युत्क्रमणाकरिता सममिती असल्या पाहिजेत, असा निष्कर्ष काढता येतो. प्रस्तुत शोधामुळे असे सिद्ध झाले की, वामावर्ती व दक्षिणावर्ती सममितींचे झालेले उल्लंघन द्रव्याऐवजी योग्य प्रतिद्रव्य वापरून भरून काढता येणार नाही. यावरून याचा अर्थ असा होतो की, काल व्युत्क्रमण परस्परक्रियांकरिता आविष्काराची सममिती राहणार नाही. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी असणाऱ्या परिस्थितीचे स्पष्टीकरण करण्याकरिता हा शोध महत्त्वाचा आहे. कारण विश्वाचा आरंभ महास्फोटाने झाला असे मानले, तर त्या क्षणी द्रव्य व प्रतिद्रव्य सारख्याच प्रमाणात निर्माण झाले असले पाहिजेत, असा निष्कर्ष क्रमप्राप्त होतो. मग असा प्रश्न उद्‍भवतो की, निर्मितीक्षणीच द्रव्य व प्रतिद्रव्य यांची परस्परक्रिया होऊन त्यांचे नष्टीकरण का झाले नाही ?

फिच व क्रोनिन यांनी अशा क्षय क्रियांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे आढळले की, बहुतेक सर्व परस्परक्रियांमध्ये जरी या सममितींचे उल्लंघन होत नसले, तरी काही अल्पसंख्य परस्परक्रियांमध्ये असे उल्लंघन होतच असते व त्याबद्दल त्याना निश्चित पुरावाही मिळाला. या शोधामुळे हे स्पष्ट झाले की, विश्वाच्या प्रारंभी जो महास्फोट झाला असे मानले, त्या वेळी द्रव्याचे प्रमाण प्रतिद्रव्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे या द्रव्यांची परस्परक्रिया होऊन ते नष्ट होण्याचा प्रश्नच उद्‍भवला नाही. [⟶ विश्वोत्पत्तिशात्र].

फिच यांना नोबेल पारितोषिकाखेरीज रिसर्च कॉर्पोरेशनचे पारितोषिक (१९६८), अर्नेस्ट ऑरलॅंडो लॉरेन्स पारितोषिक (१९६८) व फ्रॅंक्‌लिन इन्स्टिट्यूटचे जॉन विदरिल पदक (१९७६) हे बहुमान मिळाले आहेत. १९६०-६४ मध्ये ते स्लोअन फेलो होते. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थांचे सदस्य म्हणून १९६६ मध्ये निवड झाली. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विज्ञान सल्लागार समितीचे १९७०-७३ मध्ये ते सदस्य होते. प्रामुख्याने मेसॉन भौतिकीविषयीचे त्यांचे संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

फाळके, धै. शं.