चेंबरलिन, ओएन: (१० जुलै १९२० –   ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९५९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. डार्टमथ महाविद्यालयातून १९४१ मध्ये पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९४२ – ४६ या काळात अणुबाँबच्या निर्मितीकरिता प्रसिद्ध असलेल्या मॅनहॅटन योजनेत भौतिकीविज्ञ म्हणून काम केले. या योजनेत ⇨ ई. जी. सेग्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मध्यम ऊर्जेच्या न्यूट्रॉनांच्या अणुकेंद्रित काटच्छेद आणि जड मूलद्रव्यांचे स्वयंभंजन [→ अणुऊर्जा] यांसंबंधी संशोधन केले. १९४७ – ४८ मध्ये त्यांनी शिकागो येथील लमाँट नॅशनल लॅबोरेटरीत काम केले. शिकागो विद्यापीठात फेर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून पीएच्.डी पदवी मिळविल्यानंतर त्यांची कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापकपदावर नेमणूक झाली.

कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी आल्फा कणांचा (रेडियम, युरेनियम इ. मूलद्रव्यांच्या विघटनातून बाहेर पडणाऱ्या कणांचा) क्षय, न्यूट्रॉनांचे द्रवातून होणारे विवर्तन (अडथळ्याच्या कडेवरून जाताना होणारा दिशाबदल) व उच्च ऊर्जायुक्त न्यूक्लिऑनांचे (प्रोटॉन व न्यूट्रॉन या अणुकेंद्रातील कणांचे) प्रकीर्णन (विखुरणे) यांसंबंधी संशोधन केले. १९५५ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातील शक्तिमान बिव्हॅट्रॉनामधून (धन विद्युत् भारित कणांना सु. ६ × १० इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या उपकरणातून) मिळू शकणाऱ्या वेगवान प्रोटॉनांच्या झोताचा उपयोग करून त्यांना सेग्रे यांच्या सहकार्याने अँटिप्रोटॉनाची निर्मिती करण्यात यश मिळाले. अँटिप्रोटॉन या प्रोटॉनाइतकेच वस्तुमान असलेल्या पण ऋण विद्युत् भारित असलेल्या  मूलकणाच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञांनी अंदाज केला होता पण त्याचा प्रत्यक्ष पुरावा यापूर्वी मिळाला नव्हता. चेंबरलिन व सेग्रे यांना या महत्त्वाच्या कार्याबद्दल नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. यानंतर चेंबरलिन यांनी अँटिप्रोटॉन व हायड्रोजन यांतील परस्परक्रिया, अँटिप्रोटॉनांपासून अँटिन्यूट्रॉन मिळविणे व पाय मेसॉन या मूलकणांचे प्रकीर्णन यांसंबंधी संशोधन केले. रोम विद्यापीठात अँटिन्यूक्लिऑनांसंबंधी संशोधन करण्यासाठी १९५७ मध्ये त्यांना गुगेनहाइम विद्यावेतन मिळाले होते. 

अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९६० मध्ये त्यांची निवड झाली. ते अमेरिकेच्या फिजिकल सोसायटीचेही सदस्य आहेत. 

भदे, व. ग.