कूपर, लीअन एन्. : (२८ फेब्रुवारी १९३०–  ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९७२ मधील भौतिकीचे नोबेल पारितोषिक कूपर यांना जॉन बारडीन व जॉन स्क्रीफर या शास्त्रज्ञांसमवेत अतिसंवाहक (अतिशय नीच तापमानाला ज्यांचा विद्युत् रोध जवळजवळ नाहीसा होतो अशा) पदार्थांच्या ‘बीसीएस’ (बारडीन, कूपर व स्क्रीफर यांच्या आद्याक्षरांवरून पडलेले नाव) सिद्धांताच्या सूत्रीकरणाबद्दल मिळाले.

कूपर यांचा जन्म न्यूयॉर्क शहरामध्ये झाला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या सैद्धांतिक भौतिकीमधील ए. बी. (१९५१) व ए. एम्. (१९५३) या पदव्या मिळविल्या. १९५४ साली त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. ते प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडी या संस्थेत नॅशनल सायन्स फौंडेशनचे फेलो (१९५४-५५), इलिनॉय विद्यापीठात भौतिकीचे सहसंशोधक (१९५५–५७), ओहायओ राज्यात साहाय्यक प्राध्यापक (१९५७-५८) तसेच ब्राउन विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक (१९५८–६२) व प्राध्यापक (१९६२–६६) होते. याशिवाय ते १९५९–६५ मध्ये स्लोन रिसर्च फेलो व १९६५-६६ मध्ये गुगेनहाइम फेलो होते. १९६६ सालापासूनच ब्राउन विद्यापीठात ते गॉडर्ड विद्यापीठी प्राध्यापक आहेत. तसेच विविध औद्योगिक व शैक्षणिक संस्थांचे ते सल्लागार आहेत. १९६८ साली त्यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक मिळाले.

कूपर यांनी १९५६ साली असे दाखवून दिले की, अतिसंवाही जालकात इलेक्ट्रॉन-फोनॉन (स्फटिक जालकातील कंपन ऊर्जेचे एकक पुंज, क्वांटम)-इलेक्ट्रॉन विनिमयामध्ये दोन इलेक्ट्रॉनांना दूर ठेवणारी कुलंब (स्थिर विद्युत्) प्रेरणा नाहीशी होते व विशिष्ट परिस्थितीत फोनॉनांद्वारे परस्परांवर क्रिया करणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या जोडीमध्ये एक नवीन आकर्षण प्रेरणा दिसून येते. अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन एकमेकांशी बद्ध होऊन त्यांची जी जोडी तयार होते तिला ‘कूपर जोडी’ असे म्हणतात. कूपर जोडीतील इलेक्ट्रॉनांची परिवलने (स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे) व संवेग (वस्तुमान गुणिले वेग) एकमेकांच्या विरुद्ध असतात. एक ‘कूपर जोडी’ अतिसंवाहक तयार करू शकत नाही. परंतु एका वर्षानंतर बारडीन, कूपर व स्क्रीफर हे तिघेजण इलिनॉय विद्यापीठात एकत्र काम करीत असताना, त्यांनी कूपर यांची कल्पना अनेक इलेक्ट्रॉनांकरिता कशा प्रकारे उपयोगात आणता येते व अतिसंवाही अवस्था कशी तयार होते, हे दाखवून दिले. शून्य तापमानाला जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन जोड्या असतात व त्यांच्यामध्ये उच्च प्रमाणात सुसंगती आढळते, असे त्यांनी प्रतिपादन केले. अशा संवाहकामध्ये विद्युत् प्रवाहाला स्फटिक जालकामधील दोषांखेरीज कसल्याही रोधाला तोंड द्यावे लागत नाही.

अणुकेंद्रीय भौतिकी, नीच तापमान भाैतिकी, मूलकण भौतिकी, क्षेत्र सिद्धांत, अतिसंवाहकता इ. विषयांसंबंधी त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

पहा : अतिसंवाहकता.                  

                             सूर्यवंशी, वि. ल.