विद्युत् वर्चस् मापक : विद्युत् दाब किंवा विद्युत् चालक प्रेरणा (विद्युत् मंडलातून विद्युत् प्रवाह वाहण्यास कारणीभूत असलेली प्रेरणा वि. चा. प्रे.) अचूकपणे मोजणारे उपकरण. ज्ञात विद्युत् दाबाची मोजावयाच्या अज्ञात विद्युत् दाबाशी तुलना करण्यावर या उपकरणाचे कार्य चालते. अशा रीतीने वर्चस् मापकात विद्युत् वर्चसांमधील (विद्युत् स्थितींमधील) फरक म्हणजे वर्चोभेद कळतो.

विद्युत् घटमाला, चल रोधक, मानक विद्युत् घट, गॅल्व्हानोमीटर व ज्याच्यावरून सरक-स्पर्शक सरकतो असा रोधक हे वर्चस् मापकाचे घटक आहेत [यातील रोधकाचे दर एकक लांबीमागे असलेल्या विद्युत् दाबाच्या संदर्भात अंशन परीक्षण (अचूक मूल्य निर्देशित करण्याचे काम) केलेले असते]. घटाच्या वि. चा प्रे. सारख्या अज्ञात एकदिश विद्युत् दाबाचे या उपकरणाने मापन करण्यासाठी त्याची ज्ञात वर्चोभेदाशी तुलना करतात. यामुळे अतिशय अचूक मापन करता येते. वर्चस् मापकाचे एवढ्या अचूकतेने एकदिश (एकाच दिशेत वहनारा) विद्युत् प्रवाहही मोजता येतो. याकरिता वर्चस् मापकाच्या ज्ञात प्रदान विद्युत् दाबाशी ज्ञात विद्युत् रोधात या विद्युत् प्रवाहाने निर्माण होणाऱ्या विद्युत् दाबाची तुलना करतात. वर्चस् मापकाचा विद्युत् रोध मोजण्यासही उपयोग होतो.

एखाद्या संवाहकाच्या रोधामधून रोधामधून विद्युत् प्रवाह पाठविल्यास त्या संवाहकाच्या दोन बिंदूदरम्यान निर्माण होणाऱ्या विद्युत् दाबपाताला विद्युत् रोधपात (किंवा आयआर पात) म्हणतात [रोध R (ओहम) × प्रवाह I (अँपिअर) = विद्युत् दाबपात (ब्होल्ट)]. वर्चस्मापकाचे स्थिर-प्रवाह व स्थिर-रोध असे दोन मुख्य प्रकार आहेत. स्थिर-प्रवाह वर्चसंमापकात विद्युत् प्रवाहाचे मूल्य स्थिर ठेवून रोध बदलण्यात येतो, तर रोध स्थिर वर्चस् मापकात स्थिर रोधाच्या दरम्यान विद्युत् प्रवाह बदलण्यात येतो. विचलन वर्चस्मापक हा स्थिर-प्रवाह वर्चस् मापकाचा सुधारित प्रकार आहे. याची अचूकता मर्यादित असली, तरी विद्युत् उपकरणांच्या परीक्षणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

अधिक सर्वसामान्य प्रकारचा वर्चस्मापक हा एक प्रकारचा चलरोधकच असतो. यामध्ये दोन स्थिर अग्रे व सरक-स्पर्शकाला जोडलेले तिसरे अग्र असते. यातील रोधाचे मूल्य स्थिर असते. अथवा ते विशिष्ट पल्ल्यात जुळवित येणारे असते. दूरचित्रवाणी संच, रेडिओ ग्राही इ. श्राव्य साधनांतील आवाज जुळविणारा किंवा नियंत्रित करणारा रोधक म्हणजे याच प्रकारचे वर्चस् मापक होय.

विद्युत् प्रवाहामळे ज्यातींल दर्शक काट्याचे विचलन होते, अशा उपकरणांपेक्षा वर्चस्मापक अधिक अचूक असते. ⇨व्होल्टमापकाच्या तुलनेत वर्चस्मापकाचे मापन वेगळे असून ते अधिक अचूक व म्हणून अधिक उपयुक्त असते. कारण व्होल्टमापक विद्युत् घटमालेस जोडल्यावर तिच्यातून थोडा विद्युत् प्रवाह वाहत असतो. म्हणजे असे मापन हे घटमालेच्या दोन बाह्य अग्रांमध्ये मोजलेले विद्युत् वर्चस् असते. याउलट वर्चस्मापकाने मापन करताना संतुलनाने अक्षोम बिंदू मिळतो. त्या वेळी विद्युत् प्रवाह असतो. याचाच अर्थ असा वेळी विद्युत् घटमालेची वि. चा. प्रे. मोजली जाते. व्होल्टमापकाची मापन मर्यादा एका ठराविक मर्यादीपलीकडे वाढविता येत नाही, वर्चस् मापकाची मापनमर्यादा मात्र हवी तेवढी वाढविता येते.

योहान क्रिस्टोफ पोगेनडोर्फ यांनी वर्चस्मापकाचे मूलभूत तत्त्व विशद केल्यानंतर अचूक मापन करणारी अधिक कार्यक्षम उपकरणे तयार करण्यात आली. यासाठी वर्चस्मापकाच्या विद्युत् मंडलातील व स्विचामधील तापविद्युत् परिणाम दूर करण्यात आले. आधुनिक वर्चस्मापके अतिशय अचूक त्यांच्या मदतीने ०·१ मायक्रोव्होल्पासून २ व्होल्टपर्यंतचे एकदिश वर्चस् विद्युत् मोजता येते. यापेक्षा अधिक विद्युत् दाब मोजण्यासाठी व्होल्ट-गुणोत्तर नावाने ओळखण्यात येणारा उच्च विद्युत् रोध वापरतात.

प्रत्यावर्ती विद्युत् दाबमापनासाठीही वर्चस् मापकाची मूलभूत तत्त्वे (व तंत्रे) वापरतात मात्र याची अचूकता मर्यादित असते. मुख्यत्वे चुंबकीय परीक्षणासाठी याचा उपयोग होतो. एकदिश व प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वहनाऱ्या) अशा दोन्ही विद्युत् प्रवाहांचे अचूक मापन करणारे उपकरणही बनविण्यात आले आहे. हे प्रथमतः मानक विद्युत् घट वापरून प्रमाणित करतात आणि मग ते पुन्हा प्रत्यावर्ती प्रवाहासाठी प्रमाणित करतात. यामुळे एकदिश प्रवाहांच्या बाबतीत मिळणारी अचूकता प्रत्यावर्ती प्रवाहाच्या बाबतीतही मिळते.

वर्चस्मापकाचे काही उपयोग वर आले असून इतर काहीस उपयोग पुढे दिले आहेत. अँपिअरमापक आणि व्होल्टमापक यांच्या अंशन परीक्षणासाठी वर्चस्मापक वापरतात. विद्युत् जनित्रावर क्षेत्र-प्रवाह नियामक म्हणून, तसेच एकूण रोधाची विद्युत् मंडलाच्या दोन भागांत विभागणी करण्यासाठी व विद्युत् दाबाचे दोन भागांत विभाजन करण्याकरिता वर्चस् मापकाचा उपयोग करतात. निर्वात नलिका, अचूक मापन करणारी इलेक्ट्रॉनीय साधने यांच्यात त्यांचा पल्ला निवडणारे स्विच म्हणून वर्चस् मापक वापरतात. उद्योगधंद्यांमध्ये स्वयंचलित वर्चस्-मापके मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यांच्यामध्ये विद्युत् प्रवाहमापक अथवा त्यासारख्या उपकरणाच्या मदतीने इलेक्ट्रॉनीय मंडल प्रभावित केले आणि अज्ञात वि. चा. प्रे. चे आपोआप संतुलन होऊन मिळणारा संतुलन बिंदू आलेखावर नोंदला जातो.

पहा : अँपिअरमापक ओहममापक गॅल्व्हानोमीटर वर्चस् व्होल्टमापक.

भावे, श्री. द.