ह्यूझ, डेव्हिड एडवर्ड : (१६ मे १८३१–२२ जानेवारी १९००). अँग्लो-अमेरिकन प्रायोगिक भौतिकीविज्ञ. त्यांनी रेडिओ संदेश-वहन प्रणाली, अर्धसंवाहक द्विप्रस्थ स्फटिक असलेली रेडिओग्राही, मुद्रण तारायंत्र व कार्बन ध्वनिग्राहक या उपकरणांसंबंधी संशोधन केले आणि त्यांमध्ये सुधारणा केल्या. त्यांनी विकसित केलेले कार्बन ध्वनिग्राहक दूरध्वनिविद्येच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरले.

ह्यूझ यांचा जन्म लंडन येथे झाला. ते सात वर्षांचे असताना त्यांचेकुटुंब अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशात स्थलांतरित झाले. १८५० मध्ये ते बार्टझटाउन (केंटकी) येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात संगीत विषयाचे प्राध्यापक झाले. १८५२ मध्ये त्यांनी मुद्रण तारायंत्रांसंबंधी संशोधन करण्यास सुरुवात केली आणि नवीन उपकरण तयार केले.१८५५ मध्ये त्यांना टंक-मुद्रण तारायंत्र या यांत्रिक उपकरणाचे एकस्व मिळाले. या यंत्राचे यश ह्यूझ यांना फारच जलद रीत्या मिळाले. ते १८५७ मध्ये हे यंत्र घेऊन यूरोपला गेले. तेथे या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. काही ठिकाणी तर १९३० च्या दशकापर्यंत हे यंत्र वापरात होते. ह्यूझ यांनी १८७८ मध्ये तयार केलेले कार्बन ध्वनिग्राहक हे सध्या वापरात असलेल्या निरनिराळ्या ध्वनिग्राहकांचे अग्रगामी स्वरूप ठरले.

ह्यूझ यांना संगीताचे ज्ञान देखील अवगत होते. ते केवळ सहा वर्षांचे असताना हार्प हे वाद्य चांगल्या प्रकारे वाजवीत.

ह्यूझ हे जून १८८० मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यझाले. त्यांना पॅरिस एक्झिबिशनमध्ये ग्रॅण्ड गोल्ड पदक (१८६७), रॉयल सोसायटीचे सुवर्ण पदक (१८८५), सोसायटी ऑफ आर्ट्सचे आल्बेर्ट सुवर्ण पदक (१८९७) असे विविध मानसन्मान मिळाले. तसेच त्यांच्या विविध संशोधनांबद्दल १८६० मध्ये त्यांना नेपोलियन तिसरायांच्या हस्ते लिजन ऑफ ऑनरचा शेव्हालिए द ला एम्पायर हा किताब प्रदान करण्यात आला.

ह्यूझ यांच्या स्मरणार्थ लंडनच्या रॉयल सोसायटीतर्फे रेडिओविज्ञानव तंत्रज्ञान यांमध्ये विशेष कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना ‘ह्यूझ पदकदेण्यात येते.

ह्यूझ यांचे लंडन येथे निधन झाले.

गायकवाड, पल्लवी