लॉरेन्स, अर्नेस्ट ऑरलँडो : (८ ऑगस्ट १९०१-२७ ऑगस्ट १९५८). अमेरिकन भौतिकीविज्ञ. सायक्लोट्रॉन या उच्च उर्जा मिळविणाऱ्या पहिला ⇨ कणवेगवर्धकाचा शोध लावल्याबद्दल त्यांना १९३९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.

लॉरेन्स यांचा जन्म साउथ डकोटा राज्यातील कँटन येथे झाला. साउथ डकोटा विद्यापीठाची रसायनशास्त्रातील बी. ए. (१९२२), मिनेसोटा विद्यापीठाची एम्. ए (१९२३) व येल विद्यापाठाची भौतिकीतील पीएच्‍. डी. (१९२५) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. येल विद्यापाठात दोन वर्षे राष्ट्रीय संशोधन अधिछात्र व एक वर्ष भौतिकीचे साहय्यक प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९२८ मध्ये ते बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक व दोन वर्षांनंतर प्राध्यापक झाले.

लॉरेन्स यांनी प्रामुख्याने अणुकेंद्रीय भौतिकीत संशोधन केले. १९२९ मध्ये प्रथम त्यांनी सायक्लोट्रॉनाची कल्पना मांडली. एम्.एस्. लिव्हिंगस्टन या त्यांच्या विद्यार्थांनी हा प्रकल्प हाती घेऊन १३,००० इलेक्ट्रॉन-व्होल्ट इतक्या ऊर्जेपर्यंत प्रवेगित केलेले प्रोटॉन मिळविण्यात यश मिळविले. लॉरेन्स यांनी दुसरा सायक्लोट्रॉन उभारून त्याच्या साहाय्याने १२ लक्ष इलेक्ट्रॉन-व्होल्ट ऊर्जेचे प्रोटॉन मिळविले. ही उर्जा अणूकेंद्रीय विघटन करण्यास पुरेशी होती. हे संशोधन पुढे चालू ठेवण्यासाठी बर्कली येथे कॅलिफोर्निया विद्यापीठाची रेडिएशन लॅबोरेटरी त्यांनी उभारली व तिचे ते १९३६ मध्ये संचालक झाले. या संचालक पदावर व विद्यापीठातील प्राध्यापकपदावर त्यांनी मृत्यूपावेतो काम केले. सायक्लोट्रानातून मिळणाऱ्या उच्च उर्जायुक्त कणांचा विविध मूलद्रव्यांच्या अणूंवर भडिमार करण्यासाठी उपयोग करण्यात आला. यामुळे या अणूंचे विघटन होऊन काही अणूंच्या बाबतीत नवीनच मूलद्रव्ये तयार झाली. ⇨टेक्‍नेशियम हे अशा प्रकारे कृत्रिम रीतीने तयार करण्यात आलेले पहिले मूलद्रव्य होते. याच पद्धतीने ज्ञात मूलद्रव्यांच्या हजारो किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (अणूक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या व भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या मूलद्रव्यांच्या प्रकारांचा) शोध लावण्यात आला. यांचे धाकटे बंधु जॉन लॉरेन्स यांच्या सहकार्याने त्यांनी सायक्लोट्रॉनाच्या जीववैज्ञानिक व वैद्यकिय उपयोगसंबंधी संशोधन केले. त्यांनी सायक्लोट्रॉनाच्या साहाय्याने वैद्यकीय उपयोग असलेले किरणोत्सर्गी फॉस्फरस, आयोडीन [याचा अत्यवटुत्य या विकारात प्रथमच उपचार करण्याकरित वापर करण्यात आला. ⟶ अवटु ग्रंथी] तसेच इतर मूलद्रव्यांचे समस्थानिक तयार केले. यांखेरीज त्यांनी कर्करोगावार उपचार करण्यासाठी न्यूट्रॉन शलाकांचा वापर करण्यास प्रारंभ केला. साक्लोट्रॉनाची अधिक मोठी व अधिक शक्तिमान रूपे लॉरेन्स यांनी तयार केली. १९४१ मध्ये सायक्लोट्रॉनाच्या साहाय्याने मेसॉन कण कृत्रिम रीत्या निर्माण करण्यात आले (हे कण प्रथम विश्वकिरणांत-बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांत-आढळले होते) आणि पुढे या संशोधनाचा प्रतिकणांसाठीही विस्तार करण्यात आला. लॉरेन्स यांच्या मूलभूत अभिकल्पाचा (आराखड्याचा) उपयोग इतर प्रकारचे कणवेगवर्धक विकसित करण्यासाठी करण्यात आला आणि या कणवेगवर्धकांचा भौतिकीमध्ये नंतर झालेल्या प्रचंड प्रगतीत मोठा सहभाग होता.

दुसऱ्या महायुद्धात अणूबाँब तयार करण्यासाठी लागणारे युरेनियम (२३५) अलग करण्याच्या विद्युत् चुंबकीय प्रक्रिया [⟶ युरेनियम] कार्यक्रमाचे ते प्रमुख होते. अणूकेंद्रीय भौतिकीतील कार्याखेरीज त्यांनी एका रंगीत दूरचित्रवाणी चित्रनलिकेचाही शोध लावला होता व तिचे एकस्व (पेटंट) घेतले होते. त्यांनी विद्युत् ठिणगी विसर्जनाचा अभ्यास करण्यासाठी ३ अब्जांश सेकंद इतक्या अत्यल्प कालावधीचे मापन करणाऱ्या पद्धतीचा शोध लावला होता.

लॉरेन्स यांना नोबेल पारितोषिकाखेरीज फ्रँक्‍लिन इन्स्टिट्यूटचे एलिअट क्रिसन पदक, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक, रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक तसेच फॅराडे पदक व एन्‍रीको फेर्मी पुरस्कार हे सन्माम मिळाले. ते अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, स्विडीश ॲकॅडेमी, सोव्हिएट ॲकॅडेमी वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. त्यांच्या बहुमानार्थ लॉरेन्स बर्कली रेडीएशन लॅबोरेटरी व लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी या प्रयोगशाळांना, लॉरेन्स हॉल ऑफ सायन्स या संग्रहालय व संशोधन केंद्राला तसेच १०३ अणुक्रमांकांच्या मूलद्रव्याला (लॉरेन्सियम) यांचे नाव देण्यात आले. त्यांचे बहुतेक संशोधन कार्य द फिजिकल रिव्ह्यू आणि प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस यांमध्ये प्रसिद्ध झाले. ते पॅलो अल्टो (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू पावले. 

भदे, व. ग.