कॅसलर,आल्फ्रेड :(३ मे १९०२ —  ). फ्रेंच भौतिकी विज्ञ १९६६ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचे शिक्षण एकोल नॉर्मेल सुपिरियर, पॅरिस येथे झाले. प्रथमतः त्यांनी मलहाऊस, कोलमार व बोर्डो येथील शाळांत अध्यापन केले (१९२६—३१). नंतर ते बोर्डो येथील विज्ञान विभागात साहाय्यक(१९३१—३६), क्लेरमॉंफेरँद विद्यापीठात अधिव्याख्याते (१९३६—३८), बोर्डो येथील विज्ञान विभागात प्राध्यापक (१९३८—४१) होते आणि १९४१ पासून एकोल नॉर्मेल सुपिरियर येथे भौतिकीचे प्राध्यापक आहेत. १९५८ पासून ते ॲटाॅमिक क्लाॅक लॅबोरेटरीचे संचालक आहेत. त्यांनी अण्वस्त्र निर्मितीस आणि फ्रेंच अण्वस्त्र कार्यक्रमास प्रथमपासून विरोध केला.

कॅसलर यांनी शोधून काढलेल्या प्रकाशीय पंप पद्धतीमुळे लेसरचा शोध लावण्यास मोठी मदत झाली. [→लेसर]  पुरेशा वर्णपटीय शुद्धतेचा प्रकाश उपलब्ध होत नाही, ही या पद्धतीतील मोठी अडचण होती. कॅसलर यांनी बिटर व ब्रॉसेल यांच्या मदतीने ध्रुवित(विशिष्ट पातळीत कंप पावणाऱ्या) प्रकाशाचा उपयोग करून व ⇨पुंजयामिकीय निवड नियमांचा फायदा घेऊन ही अडचण सोडविली. या प्रकाशीय पंप पद्धतीचा लेसरखेरीज अतिशय संवेदनक्षम चुंबकमापकांत व आणवीय घड्याळांत उपयोग होतो. अणूंमधील ⇨हर्टझीयन अनुस्पंदनाचा अभ्यास व तो करण्यासाठी प्रकाशीय पद्धतींचा लावलेला शोध व त्यांचा विकास या कार्यांकरिता त्यांना १९६६ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.

कॅसलर हे इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्स, पोलिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इ. अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य आहेत. ऑक्सफर्ड, पीसा, एडिंबरो इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या आहेत.

भदे, व. ग.