नॉयमान, फ्रांट्‌स एर्न्स्ट : (११ सप्टेंबर १७९८–२३ मे १८९५) जर्मन भौतिकीविज्ञ, खनिजवैज्ञानिक व गणितज्ञ. आणवीय व रेणवीय उष्णता, स्फटिकविज्ञान, विद्युत शास्त्र आणि प्रकाशकी या विषयांत त्यांनी विशेष महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म योआकिमस्टाल येथे झाला. बर्लिन येथे चालू असलेल्या त्यांच्या शिक्षणात, त्यांनी १८१५ मध्ये नेपोलियनविरुद्धच्या मोहिमेत भाग घेतल्यामुळे, खंड पडला. त्यानंतर १८१७ मध्ये ते बर्लिन विद्यापीठात धर्मशात्राचे शिक्षण घेण्याच्या उद्देशाने गेले पण नंतर विज्ञानाकडे त्यांचे लक्ष वळून येना व बर्लिन येथे खनिजविज्ञान व स्फटिकविज्ञान यांचा अभ्यास करून १८२५ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांचे सुरुवातीचे बरेचसे कार्य स्फटिकविज्ञानासंबंधी होते. अशनींच्या पृष्ठावरील विशिष्ट रेषांचे नॉयमान यांनी प्रथम निरीक्षण केले म्हणून या रेषांना त्यांचे नाव देण्यात आलेले आहे [ → उल्का व अशनि]. १८२६ मध्ये केनिग्झबर्ग विद्यापीठात त्यांची अध्यापक म्हणून आणि नंतर १८२९ मध्ये खनिजविज्ञान व भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १८७६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

आणवीय उष्णतेसंबंधीचा डुलाँग आणि पेटिट यांच्या नियमाचा [→उष्णता] नॉयमान यांनी १८३१ मध्ये विस्तार करून ‘संयुगाची रेणवीय उष्णता ही त्यांतील मूलद्रव्यांच्या आणवीय उष्णतांच्या बेरजेबरोबर असते’ हा त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा नियम मांडला. विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाचे (एखाद्या विद्युत् मंडलाशी संलग्न असलेल्या चुंबकीय स्रोतात बदल झाल्यामुळे त्या मंडलात विद्युत् चालक प्रेरणा–विद्युत प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा–निर्माण होते या अविष्काराचे) नियम त्यांनी १८४५–४७ मध्ये गणितीय रीत्या सिद्ध करून विद्युत गतिकीच्या (विद्युत्, चुंबकीय व यांत्रिक आविष्कार यांतील परस्परक्रियांसंबंधीच्या शास्त्राच्या) गणितीय सिद्धांतात महत्त्वाची भर घातली. त्यांनी प्रकाशाचा गतिकीय सिद्धांत मांडण्याच्या दृष्टीने मूलभूत कार्य केलेले होते आणि ए. एल्. कोशी व ए. जे. फ्रेनेल यांनी मांडलेल्या नियमांना जुळतील असे नियमही मांडले होते. दोन स्फटीकीय माध्यमांना अलग करणाऱ्या पृष्ठभागाकरिता त्यांनी गणितीय स्वरूपातील अटी मांडल्या आणि ताण दिलेल्या स्फटिकीय माध्यमांना अलग करणाऱ्या पृष्ठभागाकरिता त्यांनी गणितीय स्वरूपातील अटी मांडल्या आणि ताण दिलेल्या स्फटिकीय पदार्थांच्या बाबतीत आढळणाऱ्या द्विप्रणमनाचे (त्यातून जाणाऱ्या प्रकाशाच्या दिशेत दोनदा बदल होण्यासंबंधीचे) नियमही सैद्धांतिक रीत्या मांडले. १८४८ मध्ये त्यांनी लोखंड व पोलाद यांच्या स्फटिकीय संरचनेतील विशिष्ट पट्टांचा (नॉयमान पट्टांचा) शोध लावला. १८७८ साली ⇨ गोलीय हरात्मकांसंबंधी त्यांचा एक निबंध प्रसिद्ध झाला.

के. जी. जे. याकोबी यांच्या समवेत नॉयमान यांनी गणित व भौतिकी या विषयांतील मूलभूत संशोधनाच्या पद्धतींचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या दृष्टीने १८३३ मध्ये एक उपयुक्त चर्चासत्र सुरू केले. त्यांना १८८७ मध्ये इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक मिळाले. त्यांचे कार्य एकत्रित स्वरूपात ३ खंडांमध्ये (१९०६–२८) प्रसिद्ध झाले. ते केनिग्झबर्ग येथे मृत्यू पावले.

 

भदे, व. ग.