फ्रांक, जेम्स : (२६ ऑगस्ट १८८२–२१ मे १९६४). जर्मन–अमेरिकन भौतिकीविज्ञ. अणूवरील इलेक्ट्रॉनांच्या आघातांचे नियमन करणाऱ्या नियमांचा शोध लावल्याबद्दल फ्रांक यांना ⇨ गुस्टाफ हर्ट् या भौतिकीविज्ञांच्या बरोबर १९२५ सालाच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

त्यांचा जन्म हॅंबर्ग येथे झाला. त्यांनी हायडल्‌बर्ग विद्यापीठात रसायनशास्त्राचा व ब‌र्लिन विद्यापीठात भौति‌कीचा अभ्यास केला आणि १९०६ मध्ये बर्लिन विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. थोडा काळ फ्रॅंकफुर्ट-आम-मेन येथे साहाय्यक म्हणून काम केल्यावर ते बर्लिन येथे हाइन्रिख रुबेन्झ यांचे साहाय्यक झाले. १९११–१८ या काळात त्यांनी बर्लिन विद्यापीठात भौतिकीचे अध्यापन केले. पहिल्या महायुद्धात त्यांनी सैन्यात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना आयर्न क्रॉसचा बहुमान मिळाला होता. युद्धानंतर व्हिल्हेल्म कैसर इ‌न्स्टिट्यूट ऑफ फिजिकल केमिस्ट्री या संस्थेच्या भौतिकी विभागाच्या प्रमुखपदावर त्यांची नेमणूक झाली. १९२० मध्ये ते ग‌टिंगेन विद्यापीठाच्या प्रयोगिक भौतिकी संस्थेचे संचालक व प्रायोगिक भौ‌‌तिकी विषयाचे प्राध्यापक झाले. नाझी राजवटीतील निर्बंधाच्या निषेधार्थ त्यांनी आपल्या प्राध्यापकपदाचा १९३३ मध्ये राजीनामा दिला. एक वर्ष कोपनहेगन येथे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९३५ मध्ये ते अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक व १९३८ मध्ये शिकागो विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी अणुबाँब योजनेचा एक भाग असलेल्या, शिकागो विद्यापीठाच्या धातुवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या रसायनशास्त्रीय विभागाचे संचालक म्हणून काम केले. जर्मनीच्या शरणागतीनंतर फ्रांक व इतर अनेक शास्त्रज्ञांनी ‘फ्रांक अहवाल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या निवेदनाद्वारे सरकारला अशी विनंती केली की, आगाऊ सूचना न देता जपानविरुद्धच्या युद्धात अणुबाँब वापरण्याच्या लष्करी निर्णायाऐवजी निर्मनुष्य अशा एखाद्या ठिकाणी अणुबाँबचे उघड प्रात्यक्षिक करून दाखवावे. जरी या अहवालाचे मुख्य उद्दिष्ट साध्य झाले नाही, तरी विनाशासाठी विज्ञानाचा उपयोग करण्यास शास्त्रज्ञांच्या असलेल्या विरोधाचे तो चिरंतन स्मारक ठरलेला आहे. १९४७ मध्ये शिकागो विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती पण विद्यापीठातील प्रकाशसंश्लेषणांसंबंधीच्या (सूर्यप्रकाशातील उर्जेच्या साहाय्याने कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांपासून का‌र्बोहायड्रेटे तयार होण्याच्या क्रियेसंबंधीच्या) संशोधन प्रयोगाशाळेचे प्रमुख म्हणूनच १९५६ पर्यंत त्यांनी काम केले.

बर्लिन येथे असताना त्यांनी मुख्यत्वे इलेक्ट्रॉन, अणू व रेणू यांच्या गतिकीविषयी (वस्तूंमध्ये–वा कणांमध्ये–गती निर्माण करताना अथवा त्यांच्या गतीत बदल करताना प्रेरणांच्या होणाऱ्या क्रियेचा अभ्यास करणाऱ्या गणितीय शाखेविषयी) संशोधन केले. प्रारंभी त्यांनी वायूंमधून होणाऱ्या विद्युत् संवहनासंबंधी संशोधन केले. नंतर ‌हर्ट्‌झ यांच्याबरोबर त्यांनी निरनिराळ्या वायूंतील मुक्त इलेक्ट्रॉनांच्या वर्तनासंबंधी (विशेषतः अणूंवरील इलेक्ट्रॉनांच्या अस्थितिस्थापक आघातांसंबंधी या आघातांत कणांची मूळची एकूण गतिज ऊर्जा व आघातानंतरची एकूण गतिज ऊर्जा समान नसतात) अभ्यास केला आणि त्यातूनच पुढे नील्स बोर यांच्या आणवीय सिद्धांतातील [⟶ अणु व आणवीय संरचना] काही मुलभूत संकल्पनांना प्रायोगिक पुरावा उपलब्ध झाला. याच कार्याकरिता फ्रांक व हर्ट्झ यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान ‌‌मिळाला. फ्रांक यांनी क्षुब्धावस्थेतील अणूंमधील उर्जा-विनिमय (प्रकाशरसायनशास्त्रीय संशोधन) व रासायनिक विक्रियांतील प्राथमिक प्रक्रियांशी संबंधित असलेल्या प्रकाशीय समस्या या आणवीय भौतिकीतील प्रश्नांविषयीही आपले सहकारी व विद्यार्थी यांच्या साहाय्याने संशोधन केले.

गटिंगेन येथील वास्तव्यात त्यांनी प्रामुख्याने वायू व बाष्प यांच्या अनुस्फुरणासंबंधी (कोणत्या तरी ऊर्जा प्रवाहामुळे क्षुब्धावस्था प्राप्त होऊन विद्युत् चुंबकीय प्रारण–तरंगरूपी उर्जा–उत्सर्जित होणे व क्षुब्धावस्था थांबताच प्रारणाचे उत्सर्जनही थांबणे या आविष्कारासंबंधी) संशोधन केले. १९२५ मध्ये त्यांनी आयोडीन रेणूंचा प्रकाशरासायनिक वियोजनासंबंधीच्या (विद्युत् चुंबकीय प्रारणाच्या शोषणामुळे रेणूंचे दोन अगर अधिक तुकडे पडण्यासंबंधीच्या) आपल्या निरीक्षणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी उर्जा पातळ्यांवर आधारलेल्या एका यंत्रणेची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा पुढे ई. यू. काँडन यांनी विस्तार केला व ती आता ‘फ्रांक-काँडन तत्त्व’ या नावाने ओळखली जाते.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना जर्मन फिजिकल सोसायटीचे माक्स प्लांक पदक (१९५१) व अमेरीकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेसचे रम्फर्ड पदक (१९५५) हे सन्मान मिळाले. १९५३ मध्ये गटिंगेन शहराने त्यांचा सन्माननीय नागरिक म्हणून गौरव केला. लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशीय सदस्य म्हणून १९६४ मध्ये त्यांची निवड झाली. गटिंगेन येथे ते मृत्यू पावले.

भदे, व. ग.