जूल, जेम्स प्रेस्कट : (२४ डिसेंबर १८१८–११ ऑक्टोबर १८८९). इंग्लिश भौतिकीविज्ञ. उष्णता व विद्युत् शास्त्रात विशेष कार्य. सॉलफर्ड (लँकॅशर) येथे त्यांचा जन्म झाला. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना घरीच शिक्षण घ्यावे लागले. लहान वयातच शास्त्रीय संशोधनाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले.

इ. स. १८३८ मध्ये त्यांनी स्वतः तयार केलेल्या एका विद्युत् चुंबकीय एंजिनाचे वर्णन प्रसिद्ध केले. १८४० मध्ये ⇨उष्णतेचा यांत्रिक तुल्यांक  मोजण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली. अखंड विद्युत् प्रवाहामुळे एखाद्या संवाहकात निर्माण होणारी उष्णता ही त्या संवाहकाचा विद्युत् रोध, विद्युत् प्रवाहाचा वर्ग व प्रवाह चालू असेपर्यंतचा अवधी यांच्या समप्रमाणात असते, हा त्यांचा शोध ‘जूल नियम’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा नियम विद्युत् विच्छेद्याच्या (जो पदार्थ योग्य द्रवात विरघळविल्यास त्यातून विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या प्रत्यक्ष जाण्याने विजेचा प्रवाह वाहू शकतो अशा पदार्थाच्या) बाबतीतही लागू पडतो, असे १८४३ मध्ये त्यांनी प्रतिपादन केले. ऊर्जेचे अविनाशित्व व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांतील परस्परसंबंध यांविषयीचा त्यांचा नियम १८४७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर विल्यम टॉमसन (नंतर लॉर्ड केल्व्हिन) यांच्याबरोबर उष्णतेसंबंधी त्यांनी काही महत्त्वाचे प्रयोग केले. ⇨ चुंबकीय आकारांतराचे जूल यांनीच प्रथम निरीक्षण केले. वायूतील रेणूंच्या सरासरी वेगाने निरपेक्ष एककातील मूल्य त्यांनीच प्रथम मांडले.

उष्णता, विद्युत शास्त्र व ⇨ऊष्मागतिकीतील त्यांच्या कार्याकरिता रॉयल सोसायटीच्या कॉप्ली व रॉयल या पदकांचा त्यांना बहुमान मिळाला. जूल यांच्या कार्याच्या गौरवार्थ ऊर्जेच्या एककास ‘जूल’ (= १० अर्ग) हे नाव देण्यात आलेले आहे. लंडनच्या फिजिकल सोसायटीने त्यांचे संशोधन कार्य दोन खंडांत (सायंटिफिक पेपर्स, १८८५–८७) प्रसिद्ध केले. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ते सभासद होते. सेल (चेशायर) येथे ते मृत्यू पावले.

भदे, व. ग.