विठ्ठलभाई पटेल

पटेल, विठ्ठलभाई जव्हेरभाई : (१८ फेब्रुवरी १८७१–२२ ऑक्टोबर १९३३). एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू. पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून गाजलेले विठ्ठलभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे वडीलबंधू होत. लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात खेडा जिल्ह्यात करमसद येथे जन्म. आईचे नाव लाडबाई. करमसद व नडियाद येथे शालेय शिक्षण संपवून ते मॅट्रिक झाले व मुंबईस वकिलीच्या परीक्षेसाठी आले. विद्यार्थिदशेतच दिवाळीबाई या युवतीशी त्यांचा विवाह झाला (१८९७). वकिलीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवून त्यांनी गोध्रा येथे वकिली सुरू केली व वल्लभभाईंच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. पुढे दोघेही बंधु १८९८ पासून बोरसदला वकिली करू लागले. आठ वर्षे वकिली चांगली केल्यानंतर विठ्ठलभाई १९०५ मध्ये वल्लभभाईंच्या व्ही. जे. पटेल या नावाने मिळालेल्या पारपत्रावर बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला गेले व बॅरिस्टर होऊन परतले (१९०८).  लंडनमध्ये दादाभाई नवरोजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वृत्तपत्रे, व्यासपीठ व कायदेमंडळ यांचा सम्यक उपयोग केला पाहिजे, ही शिकवणूक त्यांना दादाभाईंकडून मिळाली. मुंबईला परत आल्यावर पुन्हा वकिली सुरू केली व १९११ साली मुंबई कायदेमंडळात ते निवडून आले. त्यांनी सर्व बिनसरकारी सभासद एकत्र आणून सरकारी धोरणावर प्रभाव पाडला. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात यावे, या उद्देशाने त्यांनी एक विधेयक मांडले. ही त्यांची एक महत्त्वाची कामगिरी होती. ४ सप्टेंबर १९१८ रोजी इंपीरियल कौन्सिलचे ते सभासद झाले. तेथे त्यांनी हिंदू मिश्रविवाहाचा प्रस्ताव मांडला परंतु कौन्सिल बरखास्त झाल्यामुळे त्याचा विचार झाला नाही. विठ्ठलभाई १९१५ च्या मुंबई काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. १९१९ साली त्यांनी काळा कायदा म्हणून प्रसिद्ध झालेल्या रौलट ॲक्टवर प्रखर टीका केली. विलायतेत पार्लमेंटने माँटेग्यू सुधारणांचा विचार करण्याकरिता जॉइंट सिलेक्ट कमिटी नेमली. त्या समितीपुढे साक्ष देण्याकरिता काँग्रेसने पटेलांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविले. तेथे अनेक शिष्ठमंडळे गेली. पटेल–टिळकांचे शिष्टमंडळ एकत्र काम करी व बेझंटबाईंना विरोध करी. पटेल यांची त्या काळातील इंग्लंडमधील कामगिरी संस्मरणीय झाली. असहकारितेच्या आंदोलनातील विधिमंडळ-बहिष्कार पटेलांना मान्य नव्हता पण त्यांनी पक्षशिस्त पाळली. विधिमंडळाचा राजीनामा दिला व निवडणुकीला ते पुन्हा उभे राहिले नाहीत. पुढे ते स्वराज्य पक्षात गेले. १९२३ च्या नागपूर झेंडा सत्याग्रहात विठ्ठलभाई पटेल एक पुढारी होते. त्यांच्याच मुत्सद्दीपणामुळे तो सत्याग्रह यशस्वी झाला. १९२२ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले. त्यांच्या प्रयत्नाने शाळांतून हिंदी शिकविण्यास सुरुवात झाली. सर्व खात्यांत स्वदेशी माल घेण्याचे घोरणही त्यांच्यामुळेच स्वीकारले गेले. नंतर ते मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दीतच गांधींना मानपत्र देण्यात आले. १९२३ साली ते मुंबई शहरातून स्वराज्य पक्षातर्फे मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून गेले. १९१९ च्या कायद्यानुसार मध्यवर्ती कायदेमंडळाच्या अध्यक्षपदाची निवड होऊन २५ ऑगस्ट १९२५ रोजी पटेल ह्यांना ५८ मते आणि रंगाचारी ह्यांना ५६ मते पडून पटेल अध्यक्ष झाले. ते पहिलेच लोकनियुक्त अध्यक्ष होत. पटेल यांची कारकीर्द एका वर्षाच्या मुदतीतसुद्धा फार गाजली. १९२६ च्या नोव्हेंबरात पटेल यांची पुन्हा अध्यक्षस्थानी फेरनिवडणूक झाली. १९२८ मध्ये सरकारने विशिष्ट राजकीय प्रचाराला आळा घालण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणले. बिलाचा रोख मुख्यतः मीरत कटाच्या खटल्यात गुंतलेल्या कम्युनिस्टांविरुद्ध होता. पटेलांनी पहिल्या खेपेला समसमान मते पडली असता, आपले जादा मत बिलाविरुद्ध दिले. तेव्हा सरकारने १९२९ फेब्रुवारी मध्ये पुन्हा दुसरे पब्लिक सेफ्टी बिल आणले. मीरत कटाचा खटला चालू होता, तेव्हा पटेल यांनी विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे विधेयक परत घ्यावे किंवा खटला काढून घ्यावा असा सल्ला दिला. सरकारने पटेल यांचा सल्ला ऐकला नाही. ८ एप्रिल १९२९ रोजी विधेयकाचा निकाल होणार होता, त्याचा दिवशी सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्ब टाकून विलक्षण खळबळ उडविली. पुढे ते विधेयक ११ एप्रिलला आले असता अध्यक्षांनी ते नियमबाह्य ठरविले. सरकारने वटहुकूम काढून हे विधेयक अंमलात आणले.

सत्याग्रहाच्या लढ्याच्या वेळी पटेल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला (१९३०). २० ऑगस्ट रोजी पेशावरला केलेल्या अत्याचाराचा अहवाल देण्याकरिता जी समिती नेमली होती, तिचे ते अध्यक्ष होते  पण या अहवालावर सरकारने बंदी घातली. तो हुकूम अमान्य केला गेला व पटेलांना सहा महिने शिक्षा झाली  पण प्रकृतीच्या सबबीवर ते लवकर सुटले. २४ फेब्रुवारी १९३१ रोजी ते व्हिएन्नाला गेले. १९३१ च्या डिसेंबरमध्ये परत आले. १९३२ च्या लढ्यात त्यांना पुन्हा अटक झाली. तुरुंगातच त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. औषधोपचारासाठी ते यूरोपात गेले, तेथे त्यांची प्रकृती अधिक बिघडली व थोड्याच दिवसात जिनीव्हा येथे ते मरण पावले. मुंबई महानगरपालिका, मुंबई विधिमंडळ व काँग्रेस अशा तीन क्षेत्रांत जरी त्यांनी कार्य केले, तरी संसदपटू म्हणूनच ते सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यांचे अस्खलित वक्तृत्व, कुशल संसदपटुत्व व सरकारशी असलेले अडवणुकीचे तर्कशुद्ध घोरण यांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ते प्रसिद्ध होते. आपल्या पगारापैकी काही रक्कम ते महात्मा गांधींना देत. त्यांनी आपल्या संपत्तीचा विश्वस्त नेमला होता. यातूनच पुढे मुलींची एक शाळा गुजरातमध्ये काढण्यात आली.

संदर्भ : 1. Patel, G. I. Vithalbhai Patel : Life and Times, 2 Vols., Bombay, 1950.

२. करंदीकर, ज. गं. विठ्ठलभाई पटेल, मुंबई, १९४८.   

       

देवगिरीकर, त्र्यं. र.