वेंडल विल्की

विल्की, वेंडल लूइस : (१८ फेब्रुवारी १८९२-८ ऑक्टोबर १९४४). अमेरिकन विधिज्ञ, राजकीय विचारवंत आणि ‘विश्वराज्य’ (वन वर्ल्ड) संकल्पनेचा उद्गाचता. त्याचा जन्म एलवुड (इंडियाना) येथे झाला. १९६६ साली त्याने इंडियाना विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली व वडिलांबरोबर काही वर्षे वकिली केली (१९१६-२३). पहिल्या महायुद्धात त्याने भूसेनेत काही दिवस काम केले. नंतर न्यूयॉर्क येथे त्याने वकिली व्यवसाय केला (१९२३-३३). यात त्याला कीर्ती व पैसा दोन्ही मिळाले. १९२९ मध्ये ‘कॉमनवेल्थ अँड सदर्न कॉर्पोरेशन’चा (यूटिलिटी होल्डिंग कंपनी) तो प्रथम विधिसल्लागार होता व नंतर त्याच कंपनीच्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली (१९३३). ⇨टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी ह्या सरकारमान्य कंपनीला (स्था.-१९३३) फ्रँक्लिन रूझवेल्टने सार्वजनिक निगमाचे स्वरूप देऊन अनेक सोयी-सवलती दिल्या. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला. या कारणास्तव वेंडल विल्कीसारख्यांनी या निगमाला कडाडून विरोध केला व या कंपनीचा एकूण खर्च अवास्तव असून तिने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी चढाओढ करू नये, याकरिता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा दिला. तथापि न्यायालयाने ‘टीव्हीए’ला (टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी) घटनात्मक मान्यता दिली, तेव्हा त्याने आपल्या ‘कॉनमवेल्थ अँड सदर्न कॉर्पोसेशन’ ची एक उपकंपनी टीव्हीएला ७८ दशलक्ष डॉलरला विकली (१९३९) व डेमॉक्रॅटिक पक्षाचा राजीनामा देऊन रिपब्लि नक पक्षाचे सदस्यत्व पतकारले (१९४०). त्याच वर्षी रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदासाठी त्याचे नाव सुचविण्यात आले. आपल्या प्रचारदौऱ्यात त्याने फ्रँक्लिन रूझवेल्टच्या परराष्ट्रीय धोरणाची प्रशंसा केली परंतु त्याच्या अंतर्गत धोरणावर-विशेषतः ⇨न्यू डील कार्यक्रमावर-घणाघाती हल्ला केला. निवडणुकीत त्याचा पराभव झाला परंतु त्याने सु. सव्वादोन कोटी मते मिळविली. आतापर्यतच्या पराभूत उमेदवारांत एवढी मते मिळविण्याचा उच्चांक त्याने प्रथमच प्रस्थापित केला. त्यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येते.

१९४१-४२ च्या दरम्यान इंग्लंड, रशिया, चीन तसेच मध्यपूर्वेतील देशांना त्याने राष्ट्रपतींचा खाजगी प्रतिनिधी म्हणून भेटी दिल्या. रिपब्लिकन पक्षांतर्गत असलेला संकुचितपणा निपटून काढण्यासाठी त्याने १९४२ च्या दरम्यान एक मोहिम आखली आणि पक्षाच्या अलिप्त धोरणावर परखड टीका केली. जगभर प्रवास करून त्याने अनेक देशांतील वेगवेगळ्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण केले. त्याचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीयत्ववादी होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकेला संकुचित अंतर्गत राजकीय धोरणातून बाहेर काढून तेथे आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन रूजवण्याचा प्रयत्नु त्याने केला. आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या व सहकार्याच्या पार्श्वभूमीवर ‘विश्वराज्य’ या संकल्पनेचा पुरस्कार करणारा, तसेच त्याची रूपरेषा विशद करणारा अत्यंत अभ्यसनीय व मौलिक असा वन वर्ल्ड (१९४३) हा ग्रंथ त्याने लिहिला. हे त्याच्या या क्षेत्रातील कार्याचे उत्तम फलित होय. विश्वराज्याची संकल्पना रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अझूनही पाश्चात्य संस्कृतीमध्ये तग धरून आहे व तिच्याविषयी आधुनिक विचारवंतांनाही स्वारस्य आहे, याची त्याला जाण होती म्हणूनच राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करूनही ही कल्पना कृतीत आणता येईल, असा त्याला दृढ विश्वास होता. अमेरिकेतील राजकीय विचारप्रालींवर त्याने अमेरिकन प्रोग्रॅम (१९४४) हे आणखी एक पुस्तक लिहिले. तो न्यूयॉर्क येथे मरण पावला.

संदर्भ : 1. Dillon, Mary Earheart, Wendell Willkie 1892-1944, New York, 1952.

    2. Severn, William, Toward One World The Life of Wendell Willkie, New York, 1967.

घाडगे, विमल