सुशीलकुमार शिंदे

शिंदे, सुशीलकुमार संभाजीराव : (४ सप्टेंबर १९४१–). महाराष्ट्र राज्याचे बाविसावे व दलित समाजातील पहिले मुख्यमंत्री (२००३) आणि आंध्रप्रदेश राज्याचे राज्यपाल (२००४). त्यांचा जन्म माकडाची उपळाई (परांडा तालुका, उस्मानाबाद जिल्हा) या खेड्यात सामान्य गरीब कुटुंबात संभाजी व सखुबाई या दांपत्यापोटी झाला. त्यांनी माध्यमिक शिक्षणानंतर सोलापूर जिल्हा न्यायालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी मिळविली (१९५७). नोकरी करीत असताना त्यांनी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयातून बी. ए. (ऑनर्स) ही पदवी मिळविली (१९६२). पुढे त्यांनी दयानंद महाविद्यालय (सोलापूर) येथून एल्एल्. बी. ही पदवी संपादन केली (१९६५). त्यानंतर मुंबई पोलीस खात्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उप-निरीक्षक पदावर त्यांची निवड झाली. या पदावर असतानाच त्यांचा विवाह उज्ज्वला (वैद्य) यांच्याशी झाला (१९७०). त्यांना स्मृती, प्रीती व प्रणिती अशा तीन कन्या आहेत.

पोलीस खत्यातील नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबईत भोईवाडा न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला आणि त्याचबरोबर ते काँग्रेस पक्षाच्या राजकारणात सक्रिय सहभागी झाले (१९७१). सुरुवातीस त्यांनी ‘काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन’ या समितीचे प्रदेश निमंत्रक म्हणून काम पाहिले. दरम्यान त्यांनी जानेवारी १९७३ मध्ये करमाळा (सोलापूर जिल्हा) या राखीव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे पोटनिवडणूक लढविली आणि ते मताधिक्याने विजयी झाले. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू झाली. वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री होते. पुढे शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. याच काळात ‘इंडियन जेसिज’ या संस्थेने निवडलेल्या देशातील दहा कर्तबगार तरुणांत त्यांचा अंतर्भाव होता. पुढे शरद पवारांच्या पुलोद मंत्रीमंडळात (१९७८) ते होते. याच कालावधीत जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर व बाल कामगार परिषदेत ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यानंतर त्यांनी १९८३–९२ या काळात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. तब्बल नऊ वेळा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर केला. १९८५ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ‘कांपुचिया प्रश्नावर भारताची भूमिका’ अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीवर तसेच सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यावर (१९९२) त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याच वर्षी त्यांची राज्यसभेवर निवड झाली. पुढे १९९३ मध्ये चीनला गेलेल्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून १९९०-९१ आणि १९९६-९७ अशी दोनदा त्यांची निवड झाली. राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा व के. आर. नारायणन यांच्यासमवेत त्यांनी परराष्ट्र दौरे केले. बाराव्या लोकसभेवर प्रथमच सोलापूरच्या सर्वसाधारण मतदारसंघातून एक लाखापेक्षा अधिक मतांनी ते निवडून आले. पुढील वर्षी लगेचच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. संयुक्त राष्ट्रांत पाठविलेल्या भारताच्या २००२ मधील शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. १८ जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते ७९ हजार मताधिक्याने निवडून आले (२००३). २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले तथापि त्यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला व राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली (४ नोव्हेंबर २००४). पुढे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली (२९ जानेवारी २००६).

सोलापूरच्या न्यायालयातील एक चतुर्थश्रेणी कर्मचारी, पोलीस उप-निरीक्षक, वकील अशा क्रमाने जीवनाचा आलेख पुढे नेताना सुशीलकुमार यांना सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला. पंधरा वर्षे महाराष्ट्र राज्यात विविध खात्यांचे मंत्री म्हणून, तसेच काँग्रेस पक्षांतर्गत विविध समित्यांचे सदस्य, सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पेलल्या. साहजिकच प्रशासनाचा उत्तम अनुभव आणि राज्याच्या सर्व स्तरांमध्ये वावर असल्याने त्यांच्याविषयी लोकांत आपुलकीची भावना आहे.

सुशीलकुमार यांचा लेखन-वाचनाचा व्यासंग सर्वश्रुत आहे. त्यांनी लिहिलेले विचारवेध आणि विचारमंथन (हिंदी) हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू या भाषा चांगल्या अवगत आहेत. नॅशनल स्पोर्ट्स क्लबचा ‘पेट्रन इन चीफ’ (१९८७), १९९३-९४ दरम्यान संसदीय कामकाजातील योगदान व जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित केल्याबद्दल ‘नॅशनल सिटिझन’, भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ (२००३), दि साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार’ (२००३), आणि वीरशैव कक्कया समाज विकास मंडळातर्फे देण्यात येणारा ‘विशेष जीवन गौरव’ पुरस्कार (नोव्हेंबर २००५) हे मानसन्मान व पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

देशपांडे, सु. र.