हजारे, अण्णा :  (१५ जून १९३७). भारतीय जनआंदोलन चळवळीतील एक अध्वर्यू आणि ज्येष्ठ समाजसेवक. मूळ नाव किसन बाबुराव हजारे पण अण्णाहजारे या नावानेच परिचित. महाराष्ट्रातील भिंगार (जि. अहमदनगर) या गावी बाबुराव आणि लक्ष्मीबाई या दांपत्यापोटी जन्म. त्यांचे आजोबा सैन्यात होते. वडील भिंगारमधील एका औषधालयात नोकरीस होते. पुढे ते नोकरी सोडून राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) या आपल्या मूळ गावी आले (१९५२).सात मुलांचा गोतावळा सांभाळ-ताना ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे अण्णा मुंबईला आपल्या आत्याकडे गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते फुलांच्या दुकानात काम करू लागले. नंतर त्यांनी स्वतःचे फुलांचे दुकान काढले पण फारसा जम बसेना म्हणून ते सैन्यात वाहनचालक म्हणून दाखल झाले (१९६३). भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान खेमकरण येथील हवाई हल्ल्यात त्यांच्या यूनिटमधील सर्व सहकारी मारले गेले तथापि अण्णा किरकोळ जखमी झाले (१९६५). पुढे आपल्या गावाची दैन्यावस्था पाहून त्यांनी सैनिकी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली (१९७५).

अण्णा हजारे

गावाकडील शेतकऱ्यांच्या व्यथा, पाण्याचे दुर्भिक्ष, भ्रष्ट कर्मचारी–अधिकारी यांमुळे अण्णा अस्वस्थ होत. त्यांना आत्महत्या करावी असे वाटे; तथापि विवेकानंदांच्या कॉलिंग टू द यूथ फॉर नेशन या ग्रंथामुळे त्यांना नवचैतन्य मिळाले. स्वतःची शेतजमीन त्यांनी गावातील शाळेच्या वसतिगृहासाठी दिली, तसेच निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम गावातील यादवबाबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. गावाच्या सामाजिक परिवर्तनासाठी, गावातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी दारूबंदीचा कार्यक्रम यशस्वी रीत्या हाताळला. पाण्यासाठी श्रमदानातून तलाव, कालवे उभारले. परिणामतः सु. आठशे हे. जमीन पाण्याखाली आली. वनीकरण, स्वच्छता अभियान, कुर्‍हाडबंदी, पारदर्शी प्रशासन, आर्थिक स्वावलंबन इ. उपक्रमांमुळे अल्पावधीतच राळेगण-सिद्धी हे राज्यात आदर्श गाव ठरले. नंतर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांत ग्रामविकासाच्या योजना राबविल्या. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

सामाजिक परिवर्तनाबरोबरच भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासन यांविरुद्ध अण्णांनी जनआंदोलन छेडले. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक चळवळ सुरू केली. प्रशासकीय कामकाजाची माहिती सामान्य लोकांना मिळावी, प्रशासनिक कामात पारदर्शकता असावी यांसाठी त्यांनी माहितीचा अधिकार, ग्रामसभांचे सक्षमीकरण, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा यांसंदर्भात प्रदीर्घ संघर्ष केला आणि त्यांच्याअंमलबजावणीसाठी उपोषण, मोर्चा, आंदोलन या मार्गांचा अवलंब केला. माहितीच्या अधिकारासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बारा दिवस अखंड उपोषण केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अखेर माहितीचा अधिकार प्रथम महाराष्ट्रात व नंतर देशात संमत झाला. त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनामुळे अनेक भ्रष्ट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि सु. चारशे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

भ्रष्टाचारमुक्तीसाठी जनलोकपाल विधेयक आवश्यक असल्याची भूमिका अण्णांनी घेतली. या विधेयकाची अपरिहार्यता अनेक भाषणांतून, लोकांशी केलेल्या संवादांतून त्यांनी व्यक्त केली. या प्रलंबित विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी अखेर दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर त्यांनी उपोषणास सुरुवात केली (५ एप्रिल २०११). त्याला देशभरातूनउत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला. हे आंदोलन जागतिक स्तरावरही लक्षवेधी ठरले. पुढे केंद्र शासनाच्या आश्वासनामुळे हे आंदोलन थांबले तथापि हे विधेयक पारित झाले नाही. अखेर जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अण्णांनी राळेगणसिद्धी येथे १० डिसेंबर २०१३ पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली. १७ डिसेंबर २०१३ रोजी राज्यसभेत व १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकसभेत सु. ४६ वर्षे रखडलेले हे विधेयक मंजूरझाले आणि अण्णांनी उपोषण सोडले. राजकीय पक्षांच्या संदर्भात ते म्हणतात, ‘आत्मकेंद्रितता, पक्षाचे हितसंबंध, सत्ता, स्वार्थ, प्रतिष्ठा, बेइमानी ही थोड्याफार फरकाने सर्वत्र आढळतेच.’ या प्रचलित व्यवस्थेला ‘राइट टू रिकॉल’ (माघारी बोलाविण्याचा अधिकार) हाच पऱ्याय असू शकतो, म्हणून हे विधेयक आणण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.

अण्णांच्या अलौकिक, निष्कलंक, निःस्वार्थी, अविवाहित जीवनशैलीवर दिग्दर्शक-पत्रकार कृष्ण राघव यांनी अगम्य की खोज नावाचा लघुपट काढला (१९९६). त्यांच्या सेवाभावी कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांपैकी इंदिरा प्रियदर्शिनी व मित्र पुरस्कार (१९८६), मॅन ऑफ द यिअर पुरस्कार (१९८८), महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार (१९८९), केंद्र शासनाचापद्मश्री (१९९०) व पद्मभूषण पुरस्कार (१९९२), विवेकानंद सेवा पुरस्कार (१९९६), शिरोमणी पुरस्कार (१९९६), केअर आंतरराष्ट्रीय पुरस्कार (१९९८), रोटरी आंतरराष्ट्रीय मानवसेवा पुरस्कार (१९९९), पॉल मित्तल राष्ट्रीय पुरस्कार (२०००), जायंट्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०००), विश्व वात्सल्य पुरस्कार (२०००), जागतिक बँकेचा जित गिल पुरस्कार (२००८), रवींद्रनाथ टागोर आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार (२०११), ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय अखंडता पुरस्कार (२०१३), सर चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनन्स पुरस्कार (२०१३) इ. महत्त्वाचे सन्मान होत. यांशिवाय त्यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाला लोकांनी सढळ हाताने देणग्या दिल्या व त्यांचा उपयोग त्यांनी सामाजिक काऱ्यासाठीच केला.

आग्रही स्वभाव, तडजोड न करण्याची वृत्ती, स्पष्टवक्तेपणा यांमुळे अण्णा अनेकदा टीकेचे लक्ष्य बनले मात्र आव्हानांना सामोरे जात त्यांची जनहितासाठी एकांगी लढाई सुरूच आहे. वाट ही संघर्षाची (२०११)हे त्यांच्यावरील पत्रकार शाम भालेराव यांनी संपादित केलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

संदर्भ :  १. कुलकर्णी, सुहास, संपा. खरेखुरे आयडॉल्स, पुणे, २००७.

२. भाटिया, सुदर्शन, क्रांतिदूत अण्णा हजारे, नवी दिल्ली, २०११.

३. सोमण, कमलेश; गोगटे, दिलीप परांजपे, दिपा, अनु. लोकनायक अण्णा हजारे आणि जनलोकपाल विधेयक, पुणे, २०११.

मिठारी, सरोजकुमार