समता-१ : सर्व मानव जन्मत: समान आहेत त्यांना समान संधी व अधिकार मिळाला  पाहिजे ह्याची दयोतक एक संज्ञा-संकल्पना. सर्व मानवी नागरी हक्कांना प्राथमिक  न्याय देणारे एक सामान्य तत्त्व आहे. समानतेविषयी दोन भिन्न दृष्टिकोन प्राचीन  काळापासून आढळतात. जगातील सर्व व्यक्ती शारीरिक, बौद्धीक व मानसिक दृष्टया  निसर्गत: भिन्न असतात. जीवशास्त्र, मानसशास्त्र व बुद्धीमापन कसोटया यांनीही ही असमानता  मान्य केली आहे. त्यासाठी निसर्गातील वैचित्र्याचा, विषमतेचा दाखला दिला जातो  आणि अखेर निसर्गाप्रमाणेच मनुष्यातील विषमताही एक नैसर्गिक घटना आहे व म्हणून  ती बदलणे शक्य नाही, असा निष्कर्ष काढला जातो. अशास्थितीत समतेचा आगह  धरणे, निसर्गकमाविरूद्ध आहे, असा हा दृष्टिकोन आहे.याउलट साधुसंतांनी सर्वांभूती परमेश्वर, हे तत्त्व मांडले आणि सर्व प्राणि माविषयी प्रेम व समभाव ठेवावा, असे आपल्या शिकवणुकीतून  प्रतिपादिले आहे. येथे स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना त्यांची समदृष्टी गृहीत धरलेली  आहे.

समतेविषयीचे हे दोन दृष्टिकोन पाहिल्यानंतर सामाजिक मूल्यांच्या संदर्भात ही  दोन्ही टोके व्यवहारात व कृतीत निरूपयोगी ठरतात. व्यक्ति-व्यक्तीतील नैसर्गिक  भिन्नता आणि विषमता ही वस्तुस्थिती आहे. ती सकृतदर्शनी नाकारता येणार नाही.  तसेच प्रत्येक व्यक्तीच्या मिळकतीत कमी -अधिकपणा असू शकतो, यातही काही  वावगे मानता येणार नाही पण धनिक वर्ग, उच्चभ्रू किंवा विशेष सवलती उपभोगू  इच्छिणारा समाजगट समाजातील सर्व सोयी, सुविधा, सवलती, धन आणि प्रतिष्ठा  आपल्याच पदरात पाडून घेऊ लागला, तर ती असमानता होईल. म्हणून समाजात राखीव  सवलती नसणे, तसेच प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रांत विकासाची  पुरेशी समान संधी मिळणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या जीवनविषयककिमान गरजांची पूर्तता करणे, या गोष्टींची अंमलबजावणी म्हणजेच समतेचे तत्त्व  प्रत्यक्षात अंमलात आणणे होय.

प्राचीन संस्कृतींत -विशेषत: ईजिप्त, बॅबिलोनिया, असिरिया, रोमन इत्यादींत  गुलामगिरीची अमानुष प्रथा होती. अरिस्टॉटल व प्लेटो या मूलगामी ग्रीक  तत्त्ववेत्त्यांनी – विचारवंतांनी या प्रथेचे समर्थन आपल्या लेखनात केलेले आढळते.  तथापि प्लेटोचा समकालीन प्रोटॅगोरस याने गुलाम व स्त्रिया यांना समान राजकीय  हक्क देण्याचे समर्थन केले आहे. मध्ययुगात यूरोपमधील सरंजामदार -विशेषत: अमीर – उमराव स्वत: उच्च समजून इतरांना हीन व कमी लेखत असत आणि विशेष  अधिकारांचा-सवलतींचा फायदा घेत. प्राचीन भारतात वर्णभेद व जातिभेद तीव स्वरूपात  होता. यूरोपमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या रक्षणार्थ केलेला सर्वांत जुना करार  म्हणजे वेस्टफेलियाचा शांतता करार होय (१६४८). या कराराने जर्मनीत रोमन  कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथांच्या लोकांना वागणूक देण्याचे मान्य  झाले. समानतेची आधुनिक संकल्पना सतराव्या शतकात प्रसृत झाली.  तिचे वैकासिक स्वरूप शास्त्रीय शोधानंतर प्रकट झाले. जॉन लॉक (१६३२-१७०४) या  इंग्लिश तत्त्ववेत्त्याने समता ही संकल्पना मांडली. लॉकने टू ट्रीटिझिस ऑफ  गव्हर्नमेंट या पुस्तकात समतेविषयी लिहिले आहे. तो म्हणतो, ” मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था असून त्या अवस्थेत सर्व  माणसे स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक व्यक्तीला आपले  व्यवहार मनसोक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकमत गाजविण्याची  कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होती. फक्त नैसर्गिक  कायदयाची, नैसर्गिक कायदा म्हणजे मानवाच्या प्रज्ञेला स्वयंसिद्ध दिसणारा नैतिक नियम  होय. हा कायदा असे सांगतो की, आपण आपल्या आणि आपल्या बांधवांच्या  जीवितांचे रक्षण करावे आणि कोणीही इतरांचे स्वातंत्र्य व मत्ता हिरावून घेण्याचा  प्रयत्न करू नये. ” पुढे लॉक म्हणतो, ” लोकांतून नियुक्त झालेले शासनच  न्याय्य होय. ह्या दृष्टिकोनामुळे ईश्वरकृपेने सत्ता राजाला प्राप्त झाली, ती पुढे  उमरावांकडे गेली आणि पुढे सामान्य लोक व गुलामापर्यंत पोहोचली. हा  क्रांतिकारक विचार होता.” टॉमस जेफर्सन आणि अन्य प्रतिनिधी हे लॉकचे  अनुयायी शिष्य होते. लॉकच्या समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार टॉमस जेफर्सनने  अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात उघडपणे केला (१७७६). त्यात मानवी  हक्कांचे संरक्षण, हाच प्रमुख हेतू होता. फ्रान्सची त्यानंतर राज्यक्रांती आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा (१७८९) प्रसिद्ध होऊन समानता  या तत्त्वास महत्त्व प्राप्त झाले. फ्रान्सच्या क्रांतीमागे मानवी हक्कांची प्रेरणा होती.  पुढे प्रातिनिधिक संस्थेचे (संसदेचे) सार्वभौमत्व प्रस्थापित झालेल्या सर्वच  लोकशाही राष्ट्रांनी मानवी हक्कांचे संरक्षण, ही नैतिक जबाबदारी स्वीकारली. एकोणिसाव्या शतकात १८७० नंतर  अमेरिकेत पंधराव्या घटना – दुरूस्तीने गुलामांना समानतेचा मतदानाचा हक्क प्राप्त  झाला. पुढे गुलामांना पूर्ण स्वातंत्र्य तसेच स्त्रियांना समानता ह्या गोष्टी विसाव्या  शतकात असंसंच्या २३ व २४ व्या घटना दुरूस्तीने प्रदान  करण्यात आल्या. त्यामुळे श्रीमंत – गरीब, कृष्णवर्णीय – गौरवर्णीय (श्वेतवर्णीय) किंवा स्त्री-पुरूष असा भेद कायदयानुसार राहिला नाही. तत्पूर्वी दुसऱ्या  महायुद्धानंतर १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या व्दारे मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्घ  झाला होता. त्यानेही समानतेच्या तत्त्वास गतिमानता प्राप्त झाली. संयुक्त  राष्ट्रांमार्फत द. आफिकेतील वर्णभेदावर आधारित वर्ण-विद्वेषाविरूद्ध खंबीरपणे  पावले टाकली गेली. त्यामुळे जागतिक लोकमत प्रभावी बनले. भारताच्या संविधानात  अंतर्भूत झालेल्या मानवी हक्कांत समतेचे महत्त्व प्रतिपादन केले असून व्यक्तीचे मूलभूत  अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणा अनुस्यूत आहे


 भारतात जातिव्यवस्था, जन्मावरून ठरविलेल्या उच्च्नीचतेवर आधारलेली आहे.  अस्पृश्यतेसारख्या कल्पनांची उत्पत्ती या विषमतेच्या पोटी झाली आहे. पाश्चात्त्य देशांत वर्णविद्वेषाची कल्पना रूजली आहे. आशिया-आफ्रिका खंडांतील कृष्णवर्णीय आणि आदिम समाज आणि अमेरिकेतील निगो  यांना अदयापि समान वागणूक मिळत नाही. श्वेतवर्णीय-कृष्णवर्णीय हा भेद आहे.  कृष्णवर्णीयांसाठी काही देशांत (द. आफ्रिका) निराळे कायदे होते.  राष्ट्राचा प्रमुख इस्लामी धर्माचाच असावा, अशी तरतूद पाकिस्तानच्या संविधानात आहे.  धार्मिक विषमतेचे हे तत्त्व उघड उघड पाकिस्तानने पुरस्कारिले आहे. संपत्ती, जात, धर्म, वर्ण ही लक्षात न घेता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, यालाच  सामाजिक समानता म्हणतात. तसेच राजकीय समता प्रातिनिधिक लोकशाहीचे मुख्य तत्त्व  आहे. सर्व नागरिकांना राजकीय अधिकार प्राप्त करून घेण्याची समान संधी मिळाली  पाहिजे. तद्वतच नागरिकाला आपल्या हक्कांचे-अधिकाराचे संरक्षण करता येते.  राज्यव्यवहारात सर्व नागरिकांना संधी असणे, हे राजकीय समतेचे प्रमुख लक्षण होय.  साम्यवादी देशांत कम्युनिस्ट पक्षाकडे (पॉलिटब्यूरो) सत्ता असल्यामुळे नेते  इतर नागरिकांना राजकीय समता वास्तव अर्थाने उपभोगू देत नाहीत.

कृषिव्यवसायातील जमीनदारी पद्धती आणि कारखानदारीच्या क्षेत्रातील अनियंत्रित मालकी  हक्क बरखास्त केले पाहिजेत, असा आर्थिक समतेचा आगह असतो. प्रत्यक्ष कसणारा  श्रमजीवी शेतकरी शेताचा मालक असावा आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे नियंत्रण  कारखान्यावर असावे, तर समाजात आर्थिक विषमतेला कमीतकमी मुभा राहील, अशी  अपेक्षा आर्थिक समानतेत अभिप्रेत आहे. शिवाय कोणत्याही स्वरूपात असलेली आर्थिक मक्तेदारी समता  प्रस्थापित होण्यासाठी विघातक ठरते पण आर्थिक समतेचा अर्थ प्रत्येक कार्यक्षम  आणि कामचुकार व्यक्तीला सारखेच वेतन मिळणे, असा मात्र असू नये. श्रम केल्याशिवाय  कोणालाही जगण्याची संधी मिळता कामा नये आणि जो श्रम करील त्याला त्याच्या  श्रमाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. या दोन तत्त्वांचा आर्थिक समतेशी संबंध  जोडला पाहिजे कारण समता म्हणजे न्याय. ज्या समाजात विषमता असेल, तिथे  तेवढया प्रमाणात न्याय असू शकत नाही. म्हणून समानतेची वागणूक हाच न्यायतत्त्वांचाप्रमुख निकष मानला पाहिजे, विषमतेमुळे क्रांती होते, हा महत्वाचा सिद्धांत प्रसिद्घ  तत्त्वज्ञ व राज्यशास्त्रज्ञ अरिस्टॉटलने मांडला आहे. अतिदारिद्रयमुळे किंवा  अतिसंपन्नतेमुळे माणसाचा नैतिक अध:पात होतो, ही गोष्ट प्राचीन भारतीय  आचार्यांनी सूचवून ठेवली आहे. राज्यकारभारात इतरांप्रमाणेच आपणास समान संधी  आणि समान हक्क मिळाले पाहिजेत, ही इच्छा क्रांतीच्या मागे असते. इतरांपेक्षा  आपल्याला कमी लेखले जाते, अशी कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या वर्गाची भावना दृढ होऊ  लागली की, त्यातून राजकीय उठाव होतो. विषमतेचे शल्य समाजात दीर्घकाळ बोचत  राहिल्यास, ती गोष्ट समाजाला विघातक ठरते. सामाजिक क्षेत्रातील विषमता  मानवनिर्मित  असते. म्हणून ती दूर करण्याचे प्रयत्न माणसानेच केले पाहिजेत, हे तत्त्व समतेच्या  संदर्भात महत्त्वाचे आहे. थोडक्यात समता प्रस्थापित करणे, याचाच अर्थ कोणाही  व्यक्तीला आपल्या बुद्धीमत्तेचा, विविध गुणांचा व कार्यक्षमतेचा विकास करण्यासाठी  समाजाने व शासनाने संधी उपलब्ध करून देणे असा आहे.

विसाव्या शतकातील इतिहासाचा अन्वयार्थ म्हणजे समानतेच्या तत्त्वाचा शोध होय.  यासाठी लोकांनी लढा दिला, मरण पतकरले आणि हे तत्त्व मिळवून लोकशाही  दृढमूल केली. या काळात समता ही सामाजिक चळवळीमागील प्रमुख प्रेरणा होती. तिने  यूरोप खंडाला झपाटले आणि पूर्व यूरोपातील देश व चीन यांतील साम्यवादी  चळवळीलाही स्फूर्ती दिली. आफ्रिका खंडातील आधुनिक देशांनीही समतेचा  पाठपुरावा केला आणि श्वेतवर्णीयांच्या राजकीय व आर्थिक मक्तेदारीला आव्हान  दिले. अमेरिकेतही श्वेतवर्णीयांचे श्रेष्ठत्व संपुष्टात आणण्यासाठी नागरी हक्कांची  चळवळ उभी केली. कदाचित विसाव्या शतकातील समानतेच्या हक्कासाठी केलेला हा  प्रभावी प्रयत्न होता. या चळवळींबरोबर स्त्रियांनी स्त्रीमुक्तिचळवळीव्दारे आपल्याला गौण  लेखण्याबद्दल पुरूषांच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील वर्चस्वाला उठाव  करून आव्हान दिले आणि पुरूषांबरोबर समान हक्कांची मागणी केली. त्यामुळे  त्यांनाही अर्थपूर्ण लाभ मिळाले आहेत. तथापि वांशिक आणि लैंगिक भेदभाव पूर्णत:  नष्ट झाले नाहीत. सामाजिक जीवनात, विशेषत: अमेरिकेत अदयापि काळा -गोरा  भेदभाव पसंगोपात्त डोके वर काढतो. तसेच स्त्री-पुरूष असा भेदभाव न करता  समान संधी देण्याचे समता तत्त्व विधिवत् सर्वमान्य झाले असले, तरी व्यवहारात पूर्ण  समानता दिलेली दिसत नाही. अलीकडे त्यातच १९७० नंतर समलिंगी आनंदवादी  स्त्री-पुरूषांनी समान हक्कांसाठी चळवळ सुरू केली असून त्यांच्या जीवनपद्धतीला  कायदेशीर मान्यता दयावी, अशी मागणी केली आहे.

समता म्हणजे विविधतेचा अभाव नव्हे. समाजात गुणांची, विचारांची, प्रवृतींची आणि  आविष्काराची विविधता आवश्यक असते. त्यातूनच प्रगती होते. त्याचप्रमाणे समता  म्हणजे निर्जिव साचेबंदपणाही नव्हे. साचेबंदपणामुळे स्वतंत्र विचारांची गळचेपी  होते आणि समतेचे उद्दिष्ट विफल ठरते. व्यक्तिव्यक्तीतील बुद्धीमत्ता वा बौद्धीक  क्षमता, कार्यकुशलता वगैरे लक्षात न घेता कोणत्या तरी अवास्तव तत्त्वाच्या पायावर  आणि भावनात्मक  पद्धतीने समतेचे तत्त्व आर्थिक क्षेत्रात लागू करणे, अव्यवहार्य व अशक्य आहे अशा सर्व  व्यक्तींना त्यांच्या कुवतीनुसार व कार्यकुशलतेनुसार वेतन मिळणे, हा हक्क  नाकारता येणार नाही. आर्थिक समता रूजविणे, म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण करण्याची  संधी प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे, हे तत्त्व अनुसरणे होय.

संदर्भ : 1. Lakoff, Sanford A. Equality in Political Philosophy, Cambridge (Mass.), 1964.

           2. Minow, Martha, Making All the Difference: Inclusion, Exclusion and American Law, New York, 1990.

           3. United Nations, Pub. International Standards of Equality and Religious Freedom, New York, 1990.

गर्गे, स. मा.