सिंग, विश्वनाथ प्रताप : (२५ जून १९३१–२७ नोव्हेंबर २००८). भारताचे सातवे पंतप्रधान (डिसेंबर १९८९ ते नोव्हेंबर १९९०), सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ. त्यांचा जन्म भूतपूर्व राजघराण्यात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती विश्वनाथ प्रताप सिंगहोते. वयाच्या पाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी (ते सिंग यांचे चुलते होते) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तकपिता १९४१ मध्ये वारले आणि व्ही. पी. सिंग मंडाचे अकराव्या वर्षीच राजे झाले. संस्थान विलीन होईपर्यंत ते महाराजा होते (१९४८). त्यांनी उच्च शिक्षण पुणे व अलाहाबाद विद्यापीठांत घेऊन बी.ए., बी.एस्‌सी. व एल्एल्.बी. पदव्या संपादन केल्या. विद्यार्थिदशेत ते वाराणसीतील उदयप्रताप महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते (१९४७-४८). त्यांचा विवाह सीताकुमारी या शाही घराण्यातील युवतीशी झाला (१९५५). त्यांना दोन अपत्ये आहेत. विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या अखत्यारीतील पसाना हा ग्रामीण परिसर भूदान चळवळीस दान केला (१९५७). त्यानंतर ते सक्रिय राजकारणाकडे वळले. ते १९६० मध्ये काँग्रेस पक्षात प्रविष्ट झाले. सुरुवातीस त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील उपचिटणीस, चिटणीस अशी पदे देण्यात आली. पुढे ते काँग्रेसतर्फे विधिमंडळावर ( उत्तर प्रदेश ) निवडून आले (१९६९–७१). तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते (१९६९–७१). त्यांच्याकडे १९७०-७१ मध्ये काँग्रेसचे प्रतोदपद देण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात ते उपवाणिज्य मंत्री, नंतर त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. या दरम्यान त्यांची राज्येसभेवर नियुक्ती करण्यात आली (१९७१–७४). त्यानंतर त्यांची लोकसभेवर निवड झाली. मध्यंतरी त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी निवड केली (जून १९८०–८२). त्यांनी काही काळ उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले (१९८४). त्यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली आणि पुन्हा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ (१९८४–८६) आणि संरक्षण (१९८६-८७) ही खाती कार्यक्षम रीत्या सांभाळली. तथापि पंतप्रधानांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर ‘तुमचे शासन अत्यंत भ्रष्टाचारी आहे’, असा आरोप केला. परिणामतः त्यांना काँग्रे स पक्षातून बाहेर पडण्याचा आदेश देण्यात आला (१९८७).

त्यांनी जनमोर्चा या नवीन पक्षाची स्थापना केली. पुढे त्याचे विसर्जन जनता दलात करुन ते जनता दलातील एक प्रभावी नेते झाले. त्यानंतर समाजवादी जनता दल असे संयुक्त पक्षाचे नामकरण करण्यात आले (१९८८–९०). या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळविले पण स्वबळावर शासन स्थापण्याइतपत त्यांच्याकडे संख्याबळ नव्हते. म्हणून भा. ज. प. व कम्युनिस्ट पक्ष यांच्या सहकार्याने नॅशनल फ्रंट (राष्ट्री य आघाडी) स्थापण्यात आली. तिचे निमंत्रक (कन्व्हेनर) व्ही. पी. सिंग होते. या आघाडीने त्यांना नेतृत्व दिले आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले (१९८९). त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांच्या योजना मांडल्या. त्यांपैकी मंडल आयोगाने १९८० मध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण सुचविलेल्या २७ टक्क्यांचा समावेश होता. याविषयी काही नेत्यांनी व्ही. पी. सिंग यांची बाजू घेतली पण काँग्रेससह अनेक पक्षांनी या विधेयकाला संसदेत विरोध केला. उत्तर भारतात विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश येथे अनेक विद्यार्थी नाराज झाले. शिवाय भा. ज. प. अध्यक्ष अडवानी यांना रथयात्रेच्या निमित्ताने अटक करण्यात आली होती. त्यामुळे भा. ज. प.ने व्ही. पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी व्ही. पी. सिंग यांचे सरकार गडगडले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर मंडल आयोगाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अन्वयार्थ आणि निर्णय यांकरिता प्रविष्ट झाले (१९९१). सर्वोच्च न्यायालयाने १६ नोंव्हेंबर १९९२ रोजी व्ही. पी. सिंग यांचा या संदर्भातील सुधारणा ठराव काही फेरबदलांसह संमत केला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली तथापि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणातून अलिप्त राहिले. मंझिलसे जादा सफर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे (२००६). प्रदीर्घ आजाराने दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

देशपांडे, सु. र.