सूकार्णो"

सूकार्णो : (६ जून १९०१–२१ जून १९७०). इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रभावी नेते व प्रजासत्ताक इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष. त्यांचा जन्म रॅडेन सुकेमी सोस्त्रोदिहार्द जो आणि जोमान राय या दांपत्यापोटी जावा बेटावरील सुराबाया गावी झाला. हा प्रदेश त्यावेळी डच ईस्ट इंडीज कंपनीची एक वसाहत होता. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण ओमर सईद चोक्रोआमईनोतो या धर्मनिष्ठ गृहस्थांच्या मार्गदर्शनाखाली जन्मगावी झाले. त्यांनी उच्च शिक्षणाबरोबर अरबी, बाली व आधुनिक इंडोनेशियन भाषांवर प्रभुत्व मिळविले. सूकार्णोसिती उतारी या युवतीबरोबर ते विद्यार्थिदशेतच विवाहबद्घ झाले (१९२१). त्यांनी कुराणा चा अभ्यास केला आणि इंग्रजी, फ्रेंच, जर्मन व जपानी भाषाही आत्मसात केल्या. बांडुंग टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभियांत्रिकीतील पदवी घेतली (१९२७).

चोक्रोआमईनोतोंच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित सरंजामदार, राजकारणी जमत तसेच काही साम्यवादी विचारसरणीचे तरुणही जमत. त्यांच्याशी सूकार्णोंची भेट होई व डचांविषयीचा तिरस्कार व्यक्त होई. अखिल कामकरी वर्गाच्या राष्ट्रवाद (प्रोलेटेअरिअन नॅशनॅलिझम) या तत्त्वाला त्यांनी वाहून घेतले आणि इंडोनेशियन नॅशनॅलिस्ट पक्षाची स्थापना इंडोनेशियन स्वातंत्र्यासाठी केली (१९२८). या गोष्टी डचांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांस बांडुंगच्या तुरुंगात टाकले (१९२९–३१) व नंतर हद्दपार केले. हद्दपारीत देशपार व्यक्ती म्हणून त्यांनी आठ वर्षे (१९३३–४२) फ्लोरेस व सुमात्रा येथे व्यतीत केली. जेव्हा दुसऱ्या महायुद्घकाळात जपानने हा प्रदेश पादाक्रांत केला, तेव्हा त्यांनी त्याचे स्वागत केले. १९४२–४५ या काळात संपूर्ण इंडोनेशिया जपानच्या अंमलाखाली होता. या दरम्यान इंडोनेशियात स्वातंत्र्याची भावना प्रबळ होत गेली. सूकार्णोंना जपानने आपला सल्लागार आणि प्रचारक नेमले. त्यांनी जपान्यांना कामगार, सैनिक व वेश्या पुरवाव्यात असे सुचविले. सूकार्णोंनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि लोकांचा दबाव वाढविला. १ जून १९४५ रोजी प्रभावी भाषण करुन पाच तत्त्वांचा (राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीयवाद, लोकशाही, सामाजिक सुबत्ता आणि ईश्वरावरील विश्वास) पुरस्कार केला आणि देश भ्रष्टाचारमुक्त करण्याची मागणी केली. दुसऱ्या महायुद्घात जपानचा पराभव झाल्यानंतर सूकार्णो आक्रमक बनले. १७ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांनी इंडोनेशियन स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्घ केला. त्यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून अनौपचारिक निवड झाली परंतु डचांनी इंडोनेशिया घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या संघर्षात काही वर्षे गेली आणि अखेर समझोता होऊन १९४९ मध्ये प्रजासत्ताक अधिकृत रीत्या अस्तित्वात आले व सूकार्णो त्याचे राष्ट्राध्यक्ष झाले.

सूकार्णोंनी अध्यक्षीय कारकीर्दीत (१९४९–६५) भाषणबाजी आणि सुखासीन जीवनापलीकडे देशाला कोणताही विकासाचा सुसंगत असा कार्यक्रम दिला नाही किंवा प्रशासकीय सुधारणा, पुनर्वसन व आर्थिक उपयोजन यांवर लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे इंडोनेशियातील राजकीय स्थिती भ्रांतचित्त झाली. आरोग्य, शिक्षण व सांस्कृतिक प्रगती आपातत: खुंटली. परिणामतः १९५६ मध्ये राजकीय पक्षांनी आपला विरोध वाढविला. तेव्हा सूकार्णोंनी संसदीय लोकशाहीच्या जागी मार्गदर्शित लोकशाही आणून भ्रष्ट मंत्र्यांद्वारे साम्यवादी तत्त्वांचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. असंतोष वाढत चालला. त्यांच्या खुनाचे प्रयत्न झाले. सुमात्रा आणि सूलावेसी येथील प्रस्थापित शासनाविरुद्घ संघटित दंगेधोपे झाले. महागाईने उच्चांक गाठला. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांबरोबरचे संबंध संपुष्टात येऊन त्यांनी रशिया व चीन या देशांशी मैत्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सूकार्णोंच्या हुकूमशाहीविरुद्घ जनमत प्रक्षुब्ध झाले. इंडोनेशियाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अन्य देशांनी मान्य केले. तत्पूर्वी १९५५ नंतर इंडोनेशियातील विविध पक्षांत अंतर्गत संघर्ष सुरु झाला होता. १९५९ मध्ये अध्यक्ष सूकार्णो ह्यांनी घटनासमिती रद्द करुन १९४५ च्या संविधानास मान्यता दिली व सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने न्यू गिनीचा प्रदेश इंडोनेशियामध्ये सामील करण्यात सूकार्णोंनी यश मिळविले. त्यामुळे सूकार्णोंनी स्थापन केलेला प्रजासत्ताक पक्ष आणि प्रजासत्ताक सरकार अल्पावधीतच लोकप्रिय ठरले पण तरीही साम्यवादाचा विरोध काही मावळला नाही. त्यांनी १९६५ मध्ये सरकार उलथून पाडण्याचा कट केला, पण तो सुहार्तोंच्या नेतृत्वाखालील सैन्याने हाणून पाडला.

ह्याच सुमारास मलेशियाची निर्मिती झाल्याने त्याविरुद्घ इंडोनेशियन नेत्यांनी निदर्शने सुरु केली. ह्या सर्व अनिश्चिततेचा शेवट ११-१२ मार्च १९६६ रोजी जनरल सुहार्तो ह्यांनी सर्व सत्ता हाती घेण्यात झाला. तेव्हा सूकार्णो हे नामधारी अध्यक्ष राहिले. सुहार्तोंनी कम्युनिस्ट पक्षांसह सर्व पक्ष बेकायदा ठरविले. सूकार्णो निवृत्त झाले (१९६७).

जाकार्ता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : 1. Bemhard, Dahm, Sukarno and the Struggle for Independence, London, 1969.

2. Legge, J. D. Sukarno : A Political Biography, London, 1985.

देशपांडे, सु. र.