बांडुंगपरिषद: जागतिक शांततेसाठी आशियाई राष्ट्रांनी आयोजित केलेली एक शांतता परिषद. दुसऱ्‍या महायुद्धानंतर अनेक शतकांच्या यूरोपीय वसाहतवादाविरुद्ध आफ्रो-आशियाई जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यामधूनच स्फूर्ती घेऊन ब्रह्यदेश, श्रीलंका, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या कोलंबो परिषदेतील राष्ट्रांच्या निमंत्रणावरून इंडोनेशियात बांडुग येथे १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान आफ्रो-आशियाई स्वतंत्र राष्ट्रांची परिषद भरली होती. यजमान कोलंबो परिषदेतील राष्ट्रांखेरीज २५ राष्ट्रांचे प्रतिनिधी प्रथमच या परिषदेला उपस्थित राहिल्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय अफगाणिस्तान, कांपुचिया (कंबोडिया), चीन, ईजिप्त, इथिओपिया, घाना, इराण, इराक, जपान, जॉर्डन, लाओस, लेबानन, लायबीरिया, लिबिया, नेपाळ, फिलिपीन्स, सौदी, अरेबिया, सूदान, सिरिया, थायलंड, तुर्कस्तान, उत्तर व्हिएटनाम, दक्षिण व्हिएटनाम आणि दक्षिण येमेन या देशांनीही या परिषदेत भाग घेतला.

 

या परिषदेचा उद्देश आफ्रो-आशियाई देशांत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय सहकार्याला प्रोत्यासहन देणे व वसाहतवादाला विरोध करणे असा होता. परिषदेचे कामकाज सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्यामुळे हा उद्देश बहुतांशी सफल झाला. द. आफ्रिका, इझ्राएल, तैवान, दक्षिण व उत्तर कोरिया यांना परिषदेचे निमंत्रणच धाडण्यात आले नव्हते.

 

सर्व राष्ट्रांनी परस्परांशी चांगला शेजारी या नात्याने राहून सहकार्य वाढवावे आणि एकमेकांशी खालील तत्त्वांच्या आधारे वर्तन करावे :

 

 (१) मानवी हक्क आणि संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या सनदेतील तत्त्वे व उद्दिष्टे यांबद्दल आदर.

 

(२) सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि प्रादेशिक अखंडत्वाबद्दल आदर बाळगणे.

 

(३) सर्व वंश आणि लहानमोठी राष्ट्रे यांच्या समानतेस मान्यता देणे.

 

(४) परस्परांच्या अंतर्गत घडामोडींत ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप न करणे.

 

(५) प्रत्येक राष्ट्राच्या स्वसंरक्षणाचा अथवा सामूहिक संरक्षणाचा अधिकार मान्य करणे (संयुक्त राष्ट संघटनेच्या सनदेनुसार) .

 

(६) (अ) बलाढ्य राष्ट्राच्या हिताकरिता उभारलेल्या रक्षणयंत्रणेपासून अलिप्त राहणे. (ब) एका देशाने दुसऱ्‍या देशावर दडपण आणण्यास विरोध करणे.

 

(७) कोणत्याही राष्ट्राच्या अखंडत्वास किंवा स्वातंत्र्यास धक्का पोहोचेल अशी कृत्ये, धमक्या किंवा बलोपयोग यांस विरोध करणे.

 

(८) संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या सनदेनुसार सर्व आंतरराष्ट्रीय पेचप्रसंगांची सोडवणूक करणे.

 

(९) परस्पर हितसंबंध आणि सहकार यांना प्रोत्साहन देणे.

 

(१०) न्याय आणि आंतरराष्ट्रिय दायित्व यांबद्दल आदर बाळगणे.

 

परिषदेच्या कामकाजामध्ये चीनने प्रभावीपणे भाग घेतला. चौ एन-लायने शेजारी आशियाई राष्ट्रांबरोबर चीनचे मैत्रीचे संबंध वाढविले. बांडुंग परिषदेने यजमान राष्ट्रांना सहभागी राष्ट्रांशी सल्लामसलत करून परिषदेची पुढील बैठक बोलावण्याबद्दल व्यवस्था करण्याची शिफारस केली होती परंतु अशी परिषद पुन्हा भरलीच नाही. बांडुंग परिषदेमधील एकजूट अंतर्गत मतभेदांमुळे टिकू शकली नाही तरी बांडुंग ‘स्पिरिट’ हे पुढेही टिकून राहिले कारण संयुक्त राष्ट्रांमधील आफ्रो-आशियाई गट त्याची आठवण करुन देतो.

 

संदर्भ : 1. Brecher, Michael, India and World Politics, London, 1968.

           2. Calvocoressi, Peter, World Politics Since 1945. London, 1977.

           3. Macridis, R. C. Ed. Foreign Policy in World Politics, Englewood Cliffs (N.J). 1976.

 

 

काकडे, सु. रा वाचल, वि.मा.