सिरिमाओ बंदरनायके

बंदरनायके, सिरिमाओ : (१७ एप्रिल १९१६- ). श्रीलंकेच्या पंतप्रधान (१९६०-६५ व १९७०-७७) आणि मुत्सद्दी. जगातील पहिल्या स्त्री पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचा जन्म जमीनदार रॅटवॅट्टे घराण्यात बलंगोड (जिल्हा रत्नपूर) येथे झाला. वडील डिसावा बार्न्झ रॅटवॅट्टे हे रत्नपूर जिल्ह्याचे प्रमुख (रटे महात्मय) होते. सिरिमाओंचे शिक्षण कोलंबोतील कॉन्व्हेन्ट शाळेत झाले. त्यांचा विवाह तत्कालीन स्थानिक स्वराज मंत्री सॉलोमन बंदरनायके यांच्याशी झाला (१९४०). त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. सॉलोमन बंदरनायके (१८९९-१९५९) हे मूळचे ख्रिस्ती होते पुढे ते बौद्ध धर्माचे अनुयायी झाले. १९५१ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी लंका फ्रीडम पक्ष स्थापन केला. १९५६ ते १९५९ या काळात ते श्रीलंकेचे (तत्कालीन सीलोन) पंतप्रधान होते. त्यांच्या भाषिक धोरणामुळे देशात अशांतता माजली होती, परिणामतः एका बौद्ध भिक्षूने त्यांचा खून केला. 

सिरिमाओंनी विवाहानंतर सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला. स्त्रियांचे हक्क, स्त्रीशिक्षण, मजुरांचे प्रश्न यांसारख्या सामाजिक प्रश्नांत त्या लक्ष घालू लागल्या. लंका महिला समितीच्या त्या खजिनदार व पुढे अध्यक्ष झाल्या. पतीच्या निधनानंतर त्या लंका फ्रीडम पक्षाच्या अध्यक्ष झाल्या (मे १९६०). देशातील डाव्या पक्षांशी युती करून त्यांनी १९६० च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळविले व त्या पंतप्रधान बनल्या. आपल्या पंतप्रधानकीच्या काळात त्यांनी देशांतर्गत धोरणात मावळ समाजवादाचा, तर परराष्ट्रीय संबंधात अलिप्तवादाच्या हिरिरीने पुरस्कार केला. सुरूवातीस त्यांनी सॉलोमन बंदरनायके यांच्याच राष्ट्रीय कार्यक्रमांचा आणि तटस्थ अलिप्तवादाचा पाठपुरावा केला.

देशांतर्गत धोरणात सिंहली ही एकमेव राष्ट्रभाषा ठेवण्याचे धोरण त्यांनी चालू ठेवले. त्यामुळे तमिळ भाषिक लोकांची सहानुभूती त्यांनी गमावली. खाजगी शाळा, परकी मालकीच्या तेल कंपन्या, चहाचे व रबराचे मळे आणि विमा कंपन्या यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले. या निर्णयामागे आर्थिक क्षेत्रात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व कमी करून छोट्या उद्योगधंद्यांना व लहान व्यापाऱ्यांना पैसा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे ही उद्दिष्टे होती तथापि आर्थिक अडचणींवर मात करता आली नाही. १९७१ मध्ये अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या तरुणांनी केलेले बंड त्यांनी मोडून काढले त्यासाठी देशात आणीबाणी जाहीर केली.

त्यांनी १९७२ मध्ये देशासाठी नवीन संविधान तयार करून सीलोनचे श्रीलंका (सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंका) हे अधिकृत नाव घोषित केले. संसदेस सार्वभौमत्व देणे, पुनर्विलोकनाचा अधिकार न्यायालयाकडून घेणे आणीबाणीत शासनास विरोधकांवर कडक नियंत्रणाचे अधिकार असणे, ही नवीन संविधानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये होती. डावे-साम्यवादी पक्ष व लंका समसमाजवादी पक्ष यांच्याशी युती करण्याचे त्यांचे धोरण होते. या युतीच्या साहाय्याने १९७० मधील सार्वत्रिक निवडणुका त्यांनी जिंकल्या परंतु ही युती दीर्घकाळ टिकू शकली नाही. 

इ.स. १९६४ व पुन्हा १९७४ मध्ये अनुक्रमे लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी या तत्कालीन भारतीय पंतप्रधानांशी तमिळ भाषिक भारतीय आप्रवासी लोकांना नागरिकत्व देण्याबाबत त्यांनी करार केले आणि देशापुढील एक वादग्रस्त प्रश्न सोडविण्यात यश मिळविले. भारताशी मैत्रीचे संबंध स्थापन करणे व अरब देशांना सहानुभूती दाखविणे, हे त्यांच्या परराष्ट्रीय धोरणाचे सूत्र होते. भारत-चीन युद्धात (१९६२) तडजोड घडवून आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. बड्या राष्ट्रांच्या संबंधात त्यांचा कल रशियाकडे झुकलेला दिसतो. त्यांनी पूर्व जर्मनी, उत्तर कोरिया, दक्षिण व्हिएटनाम इ. साम्यवादी राष्ट्रांना मान्यता दिली इतकेच नव्हे तर हिंदी महासागरातील अमेरिकेच्या नाविक तळास विरोध दर्शविला. या धोरणामुळे अमेरिकेचा त्यांनी रोष आढवून घेतला.  

वाढती महागाई, बेकारी, औद्योगिक अशांतता आणि मध्यमवर्गाची सहानुभूती गमाविल्यामुळे १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत जरी त्या निवडून आल्या तरी त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेचे (फुड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन) त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सेरेस पदक त्यांना दिले (१९७७). वृत्तपत्रावर नियंत्रण, सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार, नात्यागोत्याचे राजकारण इ. आरोप त्यांच्या आणीबाणीतील प्रशासकीय कारभारावर करण्यात आले. नव्या सरकारने त्यांची चौकशी करून त्यांना दोषी धरले (१९८०). संसदेने त्यांचे नागरी हक्क काढून घेण्याचे ठरविले. 

सिरिमाओ यांना राजकारणाव्यतिरिक्त बौद्ध धर्म व श्रीलंकेतील प्राचीन वास्तू यांबद्दल अभिमान व आस्था आहे. या दृष्टीने सिंहलीज मोनॅस्टिक आर्किटेक्चर – द विहार ऑफ अनुराधपूर (१९७५) हे त्यांचे पुस्तक बोलके आहे. 

संदर्भ : 1. Phadnis, Urmila, Religion and Politics in Sri Lanka, London, 1974.

          2. Prasad, D. M. Ceylon’s Foreign Policy under the Bandaranaikes : 1956-65, New Delhi, 1973.

          3. Wilson, A. J. Politics in Sri Lanka, London, 1974.

शेख, रुक्साना जोशी, वि. सी.