सडरब्लुम, नातान : (१५ जानेवारी १८६६ -१२ जुलै १९३१). स्वीडिश ल्यूथेरियन धर्मशास्त्रवेत्ते, तुलनात्मक धर्मशास्त्राचे अभ्यासक व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी (१९३०). त्यांचे पूर्ण नाव लाझ यूलोफ नातान सडरब्लुम. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ट्रॉनॉ (स्वीडन) येथे झाला. प्रारंभीचे शालेय शिक्षण जन्मगावी घेऊन त्यांनी अप्साला विदयापीठातून विविध धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला आणि पदवी मिळविली (१८८६). विदयार्थिदशेत आल्ब्रेख्ट रिट्शाल या धर्मवेत्त्याच्या लेखनाचा तसेच विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १८९३ मध्ये त्यांनी धर्माधिकाऱ्याची दीक्षा घेतली आणि पॅरिसमधील (फान्स) स्वीडिश वकिलातीत तेथील चर्चचा पाद्री म्हणून सात वर्षे काम केले. तिथून परतल्यावर त्यांची अप्साला विदयापीठात धर्मशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१९०१). शिवाय अप्सालाचे आर्चबिशप म्हणूनही त्यांची निवड झाली. त्यांनी लाइपसिक विदयापीठात १९१२ -१४ दरम्यान प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. पुढे त्यांची स्वीडनच्या मुख्य आर्चबिशपपदी नियुक्ती झाली (१९१४). या निमित्ताने त्यांनी विविध देशांना सदिच्छा भेटी दिल्या. त्यामुळे चर्चच्या वैश्विक कार्याविषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली. परिणामत: त्यांच्या संघटनात्मक कार्याला चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी चर्चचे एकत्रीकरण आवश्यक होते म्हणून त्यांनी जागतिक चर्च-मंडळ स्थापण्याचा १९१४ व १९१७ असा दोनदा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर त्यांनी जागतिक चर्चचा समन्वय आणि ऐक्य यांसाठी स्टॉकहोम येथे १९२५ मध्ये परिषद भरविली. यानंतर जागतिक ऐक्यावर निष्ठा असणाऱ्या चर्चच्या अनेक परिषदा झाल्या व त्यांतून जागतिक चर्च-मंडळ अस्तित्वात आले. त्याव्दारे सडरब्लुम यांनी सामंजस्य आणि सहकार यांचा शांततेसाठी सतत पाठपुरावा केला, त्याबद्दल त्यांचा शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

सडरब्लुम यांनी विपुल गंथलेखन केले. त्यांच्या गंथांपैकी द आफ्टर लाइफ ॲकॉर्डिंग टू मॅझ दॅ इझम (१९०१, इं. भा.), ह्यूमर अँड मेलँकली अँड अदर ल्यूथर स्टडीज (१९१९, इं. भा.), क्रिश्चन फेलोशिप (१९२३), द लिव्हिंग गॉड : बॅसल फॉर्म्स ऑफ पर्सनल रिलिजन (१९३३, इं. भा.) हे गंथ मान्यवर असून प्रसिद्ध आहेत. पहिल्या गंथात त्यांनी तुलनात्मक दृष्टया इराणी धर्माचा अभ्यास करून तत्संबंधीचे आपले निष्कर्ष मांडले आहेत तर द लिव्हिंग गॉड … या गंथात त्यांनी ईश्वर या कल्पनेपेक्षा ‘ पावित्र्य ’ किंवा ‘ निष्पापता ’ या संकल्पनेवर भर दिला असून, धार्मिक विचारांचे ते मूल अधिष्ठान असल्याचे मत प्रतिपादिले आहे.

अल्पशा आजाराने त्यांचे अप्साला येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Bagchi, Asoke, Comp. &amp Ed. Hinduja Foundation Encyclo- paedia of Nobel Laureates 1901–1998, Delhi, 1999.

2. Curtis, C. J. Nathan Soderblom, Theologian of Revelation, 1966.

शेख, रूक्साना