आँग सान : (? १९१६–१९ जुलै १९४७). ब्रह्मदेशातील एक क्रांतिकारी स्वांतत्र्यवीर. माग्वे जिल्ह्यातील नॉटमॉक गावी तो जन्मला.

आँग सान

विद्यार्थीदशेतच त्याने ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचारास सुरुवात केली. पदवी घेतल्यानंतर १९३९ मध्ये डोबामा एसि-यॉन या क्रांतिकारी संघटनेचा तो सचिव झाला. १९४० मध्ये जपानला जाऊन त्याने ब्रह्मी स्वातंत्र्यसैन्याचे सेनापतिपद स्वीकारले.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस जपानने ब्रह्मदेश घेतल्यावर बेमॉच्या कळसूत्री सरकारमध्ये तो संरक्षणमंत्री झाला. तथापि ब्रह्मी स्वातंत्र्यसैन्यास जपानने अयोग्य वागणूक दिल्यामुळे त्याने ‘अँटीफॅसिस्ट पीपल्स फ्रिडम लीग’ व ‘पीपल्स व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन’ ह्या दोन संघटनांची स्थापना करून ब्रह्मी स्वातंत्र्याची चळवळ चालू ठेवली व मित्रराष्ट्रांना जपानविरुद्ध मदत देण्याचे ठरविले.

दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या पराभवनंतर १९४६ मध्ये तो गव्हर्नरच्या कौन्सिलचा उपाध्यक्ष झाला. २७ जानेवारी १९४७ ला लंडन येथे झालेल्या ॲटलीआँग सान करारानुसार ब्रिटिशांनी ब्रह्मदेशास एक वर्षात स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले. त्याच वर्षी १९ जुलैला आँग सानचा त्याच्या सहकाऱ्यांसह रंगून येथे खून झाला. ब्रह्मी स्वातंत्र्य लढ्यात आँग सानला मानाचे स्थान आहे.

देशपांडे, सु.