हेंडरसन, आर्थर : (१३ सप्टेंबर १८६३–२० ऑक्टोबर १९३५). इंग्लंडचा एक समाजवादी कामगार नेता आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म सामान्य मजूर कुटुंबात ग्लासगो येथे झाला. जन्मगावी शिक्षण घेऊन न्यूकॅसल (नॉर्थम्बरलंड) येथील लोखंडाच्या भट्टीत तो मजूर म्हणून काम करू लागला. या वेळी इंग्लंड-मध्ये कामगारांची चळवळ मूळ धरत होती. तो तेथील कामगार संघटनेचा सचिव झाला. कामगार चळवळीतून तो मजूर पक्षाकडे आकृष्ट झाला. मजूर पक्षाच्या इतिहासात एक थोर संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. प्रारंभी तो त्या पक्षातर्फे नगरपालिकेतून निवडून आला व पुढे न्यूकॅसलचा महापौर बनला. नंतर तो संसदेवर (हाउस ऑफ कॉमन्स) निवडून आला (१९०३). तो अखेरपर्यंत हाउस ऑफ कॉमन्सचा सभासद होता. तो संसदेत मजूर पक्षाचा नेता बनला. त्याच्याकडे काही वर्षे पक्षाचे अध्यक्षपद आणि नंतर सन्मान्य पण महत्त्वाचे सचिवपद होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी (१९१४–१८) त्याने इंग्लंडच्या युद्धातील सहभागास आपल्या पक्षाचा पाठिंबा दर्शविला. युद्ध काळात त्याने शासनाला मजुरांच्या समस्यांबाबतीत अनेक वेळा सल्ला दिला. त्यानंतर तो लॉइड जॉर्जच्या संयुक्त मंत्रिमंडळात सामील झाला (१९१७). प्रारंभी हेंडरसनकडे व्यापार मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्याने १९१७ च्या डिसेंबरमध्ये द एम्स ऑफ द लेबर पार्टी या छोट्या पुस्तिकेत युद्धोत्तर परिस्थितीचे समालोचन केले असून युद्धानंतर सर्वत्र क्रांती घडेल, असे भाकीत केले होते. तसेच पश्चिमी राष्ट्रांनी या संक्रमणाच्या परिस्थितीत लोकशाही संकेतांना डावलू नये व सामाजिक सुधारणांद्वारे आंतरराष्ट्रीय सुरक्षितता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, असे सुचविले होते. सिडनी वेब याच्या मदतीने त्याने पक्षाचे संविधान लिहिले आणि त्यात पक्षाच्या सामाजिक विचारसरणीवर भर दिला. पुढे तो बिनखात्याचा मंत्री झाला. पहिल्या महायुद्धानंतर मजूर पक्षाने निवडणुका जिंकून प्रथमच मॅक्डोनल्डच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बनविले. त्यात त्याला गृहसचिव हे महत्त्वाचे पद देण्यात आले (१९२४). 

 

आर्थर हेंडरसनयुद्धोत्तर काळात हेंडरसनने मॅक्डोनल्डच्या शांततामय मार्गांना संपूर्ण पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर मॅक्डोनल्डच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात (१९२९–३१) त्याने परराष्ट्र मंत्र्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. या काळात त्याने राष्ट्रसंघाच्या तत्त्वांना महत्त्व देऊन त्या धर्तीवर ग्रेट ब्रिटनचे परराष्ट्रीय धोरण आखले. त्याचा मूळ पिंड जरी कट्टर समाजवाद्याचा होता, तरी त्याने रॉबर्ट सेसिल याचे सहकार्य राष्ट्रसंघाच्या संबंधात घेतले. एवढेच नव्हे, तर सेसिलची नियुक्ती राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी मंडळात केली. 

 

हेंडरसन हा प्रथमपासून जागतिक शांततेचा पुरस्कर्ता आणि लोकशाहीचा निष्ठावान समर्थक होता. त्यामुळे १९३१ मध्ये त्याची राष्ट्रसंघातर्फे जिनीव्हा येथे आयोजित केलेल्या निःशस्त्रीकरण परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच वेळी मॅक्डोनल्डशी त्याचे मतभेद झाले. त्यामुळे हेंडरसनने शासनातून निवृत्ती स्वीकारली आणि उर्वरित आयुष्य आंतरराष्ट्रीय शांततेसाठी व्यतीत करण्याचे निश्चित केले मात्र त्याने जिनीव्हा शांतता परिषदेचे अध्यक्षपद सोडले नाही. त्याने त्या संदर्भात असे स्पष्ट केले की, हे अध्यक्षपद मला माझ्यावरील विश्वासामुळे मिळाले आहे केवळ मी ग्रेट ब्रिटनचा परराष्ट्रमंत्री होतो म्हणून नव्हे. 

 

२ फेब्रुवारी १९३२ रोजी निःशस्त्रीकरण परिषद भरली आणि तीत जागतिक शांततेसंबंधी अनेक महत्त्वाचे ठराव संमत होऊन सामूहिक सुरक्षितता व निःशस्त्रीकरण या दोन बाबींवर भर देण्यात आला. १९३३ मध्ये हेंडरसनने पॅरिस, रोम, बर्लिन, म्यूनिक इ. शहरांना भेटी देऊन आपले निःशस्त्रीकरण व शांतताविषयक विचार मांडले. तो म्यूनिकला ॲडॉल्फ हिटलरलाही भेटला आणि त्याला शस्त्रास्त्रांची कपात करण्याची विनंती केली. त्याच्या या परिषदेतील कार्याचा उचित गौरव नोबेल समितीने त्याला १९३४ चे शांतता नोबेल पारितोषिक देऊन केला परंतु त्याच्या या परिषदेतील ठरावांना प्रत्यक्षात फारच थोडे यश लाभले कारण जपान व जर्मनी ही दोन राष्ट्रे युद्ध आणि आक्रमण यांचा पाठपुरावा सातत्याने करीत होती. निःशस्त्रीकरण या संज्ञेला फक्त शस्त्रास्त्रांची कपात एवढाच अर्थ उरला आणि अखेर त्याचा भ्रमनिरास झाला. ज्या दिवशी इटलीचे इथिओपियावर आक्रमण झाले, त्याच दिवशी तो लंडन येथे मरण पावला. 

 

संदर्भ : Hamilton, Mary Agnes, Arthur Henderson : A Biography, London, 1938. 

शेख, रुक्साना