लॉर्ड रॉबर्ट सेसिल

सेसिल, लॉर्ड रॉबर्ट : (१४ सप्टेंबर १८६४–२४ नोव्हेंबर १९५८). ब्रिटिश मुत्सद्दी, एक तळमळीचा शांतता प्रेमी आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९३७). त्याचे पूर्ण नाव एडगर ॲल्जरनन रॉबर्ट गॅसकॉइन सेसिल (फर्स्ट व्हायकौंट सेसिल ऑफ छेलवुड). त्याचा जन्म सरदार घराण्यात लंडन येथे झाला. त्याचे वडील इंग्लडचे तीन वेळा पंतप्रधान होते. त्यामुळे आपातत: त्यास घरीच राजकीय संस्कार लाभले. त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेऊन सुरुवातीस काही वर्षे शासकीय सेवा केली. पुढे तो सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला. व हाउस ऑफ कॉमन्सवर १९०६ मध्ये निवडून आला. सुरुवातीपासूनच त्याचे राजकीय धोरणविषयक स्वतंत्र विचार होते. त्याने प्रथम पंतप्रधान जोसेफ चेंबरलिनच्या जकातविषयक धोरणावर टीका केली. तसेच आयरिंग होमरूल चळवळीला विरोध केला आणि हाउस ऑफ लॉडर्र्स च्या विशेषधिकारांना पाठिबा दिला. पहिल्या महायुध्दाच्या वेळी (१९१४–१८) त्याची नियुक्ती परराष्ट्र खात्यात अवर सचिव म्हणून करण्यात आली. पुढे त्याच्याकडे सागरी नाकेबंदीचे मंत्रिपद देण्यात आले. तसेच साहाय्यक सचिव म्हणूनही परराष्ट्र खात्यात त्याने काम केले (१९१६). या वेळीच त्याचे जागतिक शांततेविषयी प्रयत्न चालू असल्याचे दिसते कारण त्याने ब्रिटिश मंत्रिमंडळाला एक स्मरणलेख सादर करून राष्ट्राराष्ट्रांतील संघर्ष मिटविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंडळाची निर्मिती करावी, असे सूचित केले होते. समझोता व सहकार्य यांची एकही संधी तो दवडीत नसे. पहिल्या महायुध्दानंतर पॅरिस येथे झालेल्या शांतता परिषदेत तो ब्रिटनचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिला (१९१९). या परिषदेत द. आफ्रिकन नेता यान स्मट्स, लिआँ बूर्झ्वा व रॉबर्ट सेसिल यांनी पुढाकार घेऊन मित्र राष्ट्रांची एक संस्था असावी, या कल्पनेचा पुरस्कार केला. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी चौदा कलमी शांतता कार्यक्रम सादर केला. त्यांतील शेवटच्या कलमात राष्ट्रसंघ निर्मितीची कल्पना त्यांनी मांडली. परिणामत: राष्ट्रसंघ ही जागतिक संघटना जागतिक तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन करण्याचे व्हर्सायच्या तहात निश्‍चित झाले. सेसिलने या संघटनेच्या करारनाम्याचा (मसुदा) खर्डा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याची राष्ट्रसंघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती झाली (१९२०-२१). या त्याच्या कार्यामुळे पंतप्रधान स्टॅन्ली बॉल्डविनने त्यास मंत्रिमंडळात घेतले. त्याला छेलवुडची सरदारकी देऊन (१९२३) पुढे जिनिव्हा येथील नि:शस्त्रीकरणाच्या परिषदांत (१९२६-२७) ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून पाठविले; परंतु या वेळी स्टॅन्ली बॉल्डविनने दिलेल्या सूचनांशी तसेच पाणबुडीच्या प्रश्‍नाविषयी अमेरिकेशी त्याचे मतभेद झाले. बॉल्डविनला पूर्णत: अपयश आले म्हणून परिषदेहून परत आल्यानंतर त्याने आपल्या मंत्रीपदचा राजीनामा दिला. सेसिलची राष्ट्रसंघ या जागतिक संघटनेच्या स्थापनेतील मूलभूत कल्पना अशी होती की, ही संस्था प्रबळ राजसंस्था होऊ नये; परंतु त्यात सर्व राष्ट्रांनी सहभाग घ्यावा आणि युध्दाला तिने विरोध करावा. शिवाय संघर्षात्मक परिस्थितीत मध्यस्थ म्हणून भूमिका बजवावी आणि शांततामय तोडगा सुचवावा. तसेच ती केवळ राजकीय संघटना न राहता तिने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानवतावाद या तत्त्वांवर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत भरीव कार्य करावे. जर्मनी आणि रशिया यांनाही राष्ट्रसंघाचे सभासद करावे म्हणून त्याने एका व्याख्यानात विशेष शिफारस केली होती.

राष्ट्रसंघास १९३० ते १९३८ दरम्यान दोन गंभीर आंतरराष्ट्रीय समस्यांना तोंड द्यावे लागले. जपानने १९३१ मध्ये चीनवर आक्रमण करून मँचुरियात सत्ता स्थापली. त्यानंतर १९३४ मध्ये इटलीने इथिओपियावर आक्रमण केले. या दोन्ही आक्रमणाचा राष्ट्रसंघाने केवळ निषेध केला. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सच्या दृष्टीकोनातून जर्मनीतील नाझी शक्तीचा प्रश्न चिंतेचा होता. त्यांनी जर्मनीबरोबर म्यूनिक येथे करार केला (१९३८). इंग्लडने जर्मनीला दिलेल्या सवलतींविषयी काही संसद सदस्यांनी टीका केली. त्यांत सेसिल हा प्रमुख होता, या घटनांमुळे महासत्तांतील सत्तासंतुलनाच्या राजकराणात राष्ट्रसंघ निष्प्रभ ठरला तरी लोककल्याणच्या सामाजिक योजनांत त्याने विधायक व भरीव कार्य केले. त्यामुळे राष्ट्रसंघ ही संघटना टिकावी तथापि राष्ट्रसंघाच्या सभासदांत श्वेतवर्णीय राष्ट्रांचे वर्चस्व असावे आणि सभासद राष्ट्रांत वांशिक समानता नसावी, या मताचा तो होता.

दुसऱ्या महायुध्दानंतर त्याने राष्ट्रसंघाच्या अस्तित्वासाठी अटोकाट प्रयत्न केला; परंतु अमेरिकेमुळे तो अयशस्वी झाला. त्याने शांतता व चर्चविषयी काही स्फुटलेख व ग्रंथ लिहिले, त्यांपैकी अवर नॅशनल चर्च आणि द वे ऑफ पीस (१९२८) हे महत्त्वाचे होत.

याशिवाय द ग्रेट एक्स्पेरिमन्ट (१९४१) या आत्मचरित्रात तत्कालीन राजकीय परिस्थिती व राष्ट्रसंघाविषयीचे त्याने प्रभावी शब्दांत विचार मांडले आहेत. तो म्हणतो, मला यापुढे युध्द नष्ट करण्याचा प्रयत्न हा अधिक मौलिक राजकीय उद्देश वाटतो; परंतु उजव्या विचारसरणीच्या लोकांना, विशेषत: भांडवलदारांना, तो फारसा रुचत नाही. म्हणूनच राष्ट्रसंघास ते विरोध करतात तथापि ते युध्दापासून कशी सुटका होईल यासंबंधी काहीच विधायक मार्ग सुचवत नाहीत. तसेच नि:शस्त्रीकरणासंबंधीही तो म्हणतो, ज्या राष्ट्रांची भूराजनीतीच्या दृष्टीने भौगोलिक स्थिती नाजूक आहे, अशा फ्रान्स, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया या राष्ट्रांना शस्त्रकपातीचे धोरण लागू करणे गैरसोयीचे व अन्यायकारक ठरेल. त्यांना लष्कराची व संरक्षणाची हमी दिली पाहिजे. सामूहिक सुरक्षितता हा सर्वांत चांगला मार्ग असून, दुसज्या महायुध्दात जर्मनी आणि जपानने केलेल्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी तोच अधिक उपयुक्त झाला. राष्ट्रसंघाच्या अपयशानंतर त्याने सार्वजनिक मतपरिवर्तनाकडे लक्ष केंद्रित केले आणि १९३४ मध्ये त्याने ‘पीस बॅलट’ शांतता मतपत्रिका मोहीम सुरू केली. या पत्रिकेसाठी त्याने एक प्रश्नावली बनविली. राष्ट्रसंघ, नि:शस्त्रीकरण, शस्त्रास्त्रांचे खाजगी कारखाने आणि सामूहिक सुरक्षिततेसाठी आर्थिक व लष्करी अनुज्ञा या चार महत्त्वाच्या बाबींचा तीत समावेश करण्यात आला. सुमारे एक कोटी लोकांनी याची उत्तरे दिली. त्यातून आंतरराष्ट्रीय एकोपा व परस्पर हितैक्य यांवर विशेषत्वाने भर दिला होता आणि सामूहिक सुरक्षिततेची कल्पना सर्वांनी जागतिक शांततेसाठी एक आवश्यक बाब म्हणून आवर्जून सांगितली होती.

तो टनब्रिज (केन्ट) येथे मरण पावला.

पहा : राष्ट्रसंघ.

संदर्भ : १. ठाकूर, अशोक, ॲल्फ्रेड नोबेल आणि नोबलचे मानकरी, पुणे २००८.

२. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.

शेख, रुक्साना