ह्यूम, ॲलन ऑक्टेव्हिअन : (६ जून १८२९–३१ जुलै १९१२). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक पुढारी व ब्रिटिश ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूमप्रशासक. त्यांचा जन्म सधन व सुशिक्षित घराण्यात माँट्रोझ (फॉर-फरशर परगण्यात) या स्कॉटलंड-मधील गावी झाला. त्यांचे वडील जोसेफ ह्यूम हे स्कॉटिश संसदेचे सदस्य होते. ॲलन ह्यूम वयाच्या तेराव्या वर्षी सैन्यदलात दाखल झाले. नंतर त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. १८४९ मध्ये ते बंगाल प्रांतातील नागरी सेवेत रुजू झाले. त्यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. या काळात त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले. इटावा जिल्ह्यात दंडाधिकारी म्हणून त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी कार्यक्षम रीत्या प्रशासन केले. त्यामुळे त्यांची नियुक्ती वायव्य प्रांतात महसूल मंडळाचे प्रमुख म्हणून झाली (१८५७-५८). कौर सिंग यांच्या सहकार्याने त्यांनी लोकमित्र हे हिंदी भाषेतील मासिक सुरू केले(१८५९). भारतीय नागरी कस्टमचे आयुक्त म्हणून ह्यूम काही काळ कार्यरत होते. पुढे केंद्र सरकारातील महसूल व कृषी विभागांचे सचिव म्हणून त्यांनी १८७०–७९ दरम्यान काम केले. गृहसचिव या नात्याने पोलीस खात्यात त्यांनी आमूलाग्र बदल केले. भारतातील प्रशासनात भारतीयांचा अधिकाधिक सहभाग असावा, या त्यांच्या धोरणामुळे ते अडचणीत आले आणि त्यांची प्रांतिक प्रशासनात बदली करण्यात आली. पुढे शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर (१८८२) त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भाग घेतला. मुंबई येथे १८८५ मध्ये भरलेल्या पहिल्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते एक निमंत्रक होते. व्हाइसरॉय डफरिन आणि ह्यूम यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, भारतीयांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे यांसाठी काही हिंदी सुधारकांच्या मदतीने काँग्रेसची स्थापना केली होती. काँग्रेसचे महासचिव म्हणून ह्यूम यांनी बावीस वर्षे काम केले. सनदी अधिकारी असतानाच त्यांनी हिंदुस्थानातील विविध पक्ष्यांचा अभ्यास केला. पक्षिविज्ञान विषयावर त्यांनी ग्रंथ लिहिले. असंख्य पक्ष्यांचा संग्रह केला. द गेम बर्ड्स ऑफ इंडिया, बर्मा अँड सिलोन (१८७९-८१) हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले. स्ट्रे फेदर्स नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले. भारतातून १८९४ मध्ये ते इंग्लंडला परत गेले. डलवीच जिल्ह्याच्या लिबरल असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांनी जहालमतवादी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन या चळवळीस आर्थिक साहाय्य केले. ह्यूम व तत्कालीन गव्हर्नर डफरीन यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनकत्व दिले जाते.  

ह्यूम यांच्या मार्गदर्शनाखाली दादाभाई नवरोजी, ब्रॅडलॉ, हेन्री कॉटन आदी मंडळींनी इंग्लंडमध्ये व्याख्याने, पत्रके व पुस्तके वगैरेंद्वारा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रचारमोहीम उघडली. ह्यूम यांनी कृषी संचालक असताना सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्या संदर्भात भारतातील शेती सुधारणा अहवाल तयार करून त्यांनी तो प्रशासनाला सादर केला होता. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल (१८७०–९१) व लिनियन सोसायटी (१९०४) या संस्थांचे ते सदस्य होते. मृत्यूपूर्वी त्यांनी पक्षिविज्ञानाच्या संदर्भात जमा केलेली पक्ष्यांची कातडी, अंडी व अन्य साहित्य ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाला दिले. भारतीय टपाल खात्याने ह्यूम यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट काढले होते (१९७३).

लंडन येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

देवगिरीकर, त्र्यं. र.