आझाद हिंद सेना: सुप्रसिध्द भारतीय पुढारी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यासाठी सिंगापूर येथे जुलै १९४३ मध्ये उभारण्यात आलेली लष्करी संघटना.
दुसरे महायुद्ध चालू असता नेताजी सुभाषचंद्रांना ब्रिटीश सरकारने कलकत्ता येथे नजरकैदेत ठेवले होते. तेथून ते १७ जानेवारी १९४१ रोजी धाडसाने निसटले आणि अनेक अडचणींना तोंड देत जर्मनीत पोहोचले . जर्मनीत भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून, स्वातंत्र्यसेना उभी करण्याचा त्यांनी निर्धार घोषित केला व त्यासाठी जर्मन सरकारची सक्रिय सहानुभूतीही मिळवली . जर्मनी व फ्रान्समधील भारतीय नागरिक व जर्मनांच्या ताब्यातील युद्धबंदी ह्यांतून सु. तीन हजारांची फौज निर्माण झाली. परंतु तेथून भारत दूर असल्यामुळे नेताजींना प्रचाराखेरीज प्रत्यक्ष कृती करणे अशक्य झाले.
आग्नेय आशियात १९४२ च्या सुमारास युद्धास प्रारंभ होऊन १५ फेब्रुवारी रोजी जपानने सिंगापूरचा ब्रिटिश आरमारी तळ काबीज केला. नेताजी सुभाषचंद्र सिंगापूरला पोहचण्यापूर्वी मलायी मोहिमेत जपान्यांच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश सेनेतील भारतीय सैन्याधिकारी कॅप्टन मोहनसिंग ह्यांनी जपान्यांच्या आश्रयाखाली भारतीय राष्ट्र सेना स्थापन केली. होती. त्याच वेळी स्वातंत्र्य चळवळीची कार्यवाही त्वरित व्हावी, म्हणून भारतीय स्वातंत्र्य-संघ स्थापून एक कृतिमंडळही नेमले होते. त्यावर ⇨राशबिहारी बोस ह्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कॅ. मोहनसिंग ह्यांच्या निमंत्रणावरून बँकॉक येथील परिषदेस हजर राहण्यासाठी जर्मन व जपानी सरकारच्या मदतीने महत्प्रयासाने नेताजी जून १९४३ मध्ये सिंगापूरला जाण्यासाठी टोकिओत दाखल झाले. परंतु दरम्यान मोहनसिंग ह्यांचे जपानशी मतभेद होऊन जपान्यांनी ही सेना बरखास्त केली परंतु भारतीय स्वातंत्र्य-संघ ही संस्था तेथे अस्तित्वात होती. नेताजींनी जपान्यांच्या मदतीने मोहनसिंगांच्या लष्करी संघटनेचे पुनरुज्जीवन करून तिला ‘आझाद हिंद सेना’ हे नाव देण्याचे ठरविले. २ जुलै १९४३ रोजी नेताजी सिंगापूरला गेले व लागलीच त्यांनी राशबिहारी बोस यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य-संघाची धुरा आपल्या हाती घेतली आणि ५ जुलै १९४३ रोजी औपचारिक रीत्या आपल्या आधिपत्याखाली आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याचे घोषित करून ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्यही प्रसृत केले. जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, सामान्य भारतीय नागरिक व असंख्य स्रिया देशसेवेसाठी स्वेच्छेने ह्या सेनेत दाखल झाल्या. दोन लष्करी विभाग भरतील एवढे खडे सैन्य, जपानच्या हाती लागलेल्या ब्रिटीश शस्त्रसामग्रीच्या आधाराने सुसज्ज करण्यात आले. जगन्नाथराव भोसले, शाहनवाजखान व मेजर सैगल या भारतीय युद्धबंदी लष्करी अधिकाऱ्यांना मेजर जनरल हा हुद्दा देण्यात आला व त्यांच्या अनुक्रमे चीफ ऑफ जनरल स्टाफ व विभागीय सेनाप्रमुख म्हणून नेमणुका केल्या. नेताजी सुभाषचंद्रांनी ह्या सेनेचे सरसेनापतिपद आपणाकडे घेतले आणि स्रियांचे जे ‘झाशीची राणी पथक’ तयार करण्यात आले, त्याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन ह्या सुप्रसिद्ध महिलेकडे सुपूर्त केले. ह्या सर्व सैन्यास तातडीचे लष्करी शिक्षण देण्यात येऊ लागले.
२१ ऑक्टोबर १९४३ ला नेताजींनी आझाद हिंदचे तात्पुरते सरकार प्रस्थापित केल्याची घोषणा केला. जपान, इटली, जर्मनी वगैरे राष्ट्रांनी तत्काळ त्यास औपचारिक मान्यताही दिली. लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारने नागरी शासनव्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले आणि काही मुलकी खाती उघडली. त्यांतील अर्थ, प्रसिद्धी, लष्कर-भरती, आरोग्य व समाज-कल्याण, पुरवठा, गृहबांधणी, वाहतूक इ. विशेष महत्त्वाची होती. पैसा, साधनसामग्री व सेनासंख्याबळ यांचे सर्वंकष संयोजन करण्यात येऊ लागले. स्वत: नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या आणि नभोवाणीवरून भाषणे दिली. थोड्याच दिवसांत आझाद हिंद सेनेस जपानी सेनेचा दर्जा प्राप्त झाला व ती कार्यन्वित झाली. नेताजीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे व स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयामुळे भारतीय सैनिकांची संख्या तीस हजारांच्या वर गेली. पुढे त्या सेनेची गांधी, नेहरू, आझाद अशी तीन पथकांत विभागणी करण्यात आली. ह्या पथकांतील निवडक लोकांचे एक स्वतंत्र पथक ‘नंबर एक गनिमी पथक’ ह्या नावाने तयार करण्यात आले व ते शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करू लागले हेच पथक पुढे ‘सुभाष –पथक’ म्हणूनही लोकप्रिय झाले.
आझाद हिंद सेना जरी युद्धासाठी सज्ज झाली, तरी जपानी अधिकारी तिला आपल्या बरोबरीची समजण्यास तयार नव्हते. त्यांचे मत असे होते की, तिच्यातील बहुतेक सैनिक ब्रिटिशांच्या नोकरीतील भाडोत्री सैनिक असल्याने ते जपान्यांप्रमाणे जिद्दीने लढणे शक्य नाही. म्हणून त्यांची स्वतंत्रच पथके ठेवावीत. परंतु हे मत नेताजींना अमान्य होते. त्यांना आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी आपले सैन्य जपान्यांबरोबर मुद्दाम धाडले. आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहून जपान्यांचेही पुढे मत बदलले. १९४४ च्या मार्च महिन्यात जपान्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य सीमेवर चढविलेल्या हल्ल्यात भाग घेण्यासाठी ह्या सेनेतील काही पथके धाडण्यात आली. सीमेवरील इंफाळ येथे झालेल्या लढाईत ह्या सैन्यातील काही पथकांनी चांगली कामगिरी बजाविली. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले. ह्या वेळी कॅप्टन सूरजमल ह्यांच्या हाताखाली एक जपानी पलटणही देण्यात आली होती. मोडोकप्रमाणे इतर लढायांतही ह्या सेनेने चांगले पराक्रम केले. एक मोक्याचे ठिकाण जिंकण्याची आज्ञा होताच, लेफ्टनंट मनसुखलाल व मूठभर सैनिकांनी जिवाची पर्वा न करता ती टेकडी जिंकली व आपण जपानी सैनिकांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे सिद्ध केले. ह्या युद्धात मनसुखलाल ह्यांना अनेक जबर जखमा झाल्या, तरी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केलेच. आझाद हिंद सेनेच्या इतर पथकांनीही अशीच उत्तम कामगिरी बजावली. परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री, तसेच जपानी सैनिकांनी घेतलेली युद्धक्षेत्रातील माघार ह्यांमुळे सुभाष पथकास नाइलाजाने माघार घ्यावी लागली. शिवाय अपुरा शस्त्र-व अन्न-पुरवठा, रसद मिळण्यातील अडचणी, जपान्यांचे लहरी सहकार्य इत्यादींमुळेही लढाई थांबविणे ह्याशिवाय त्यास दुसरा पर्याय नव्हता. ही पीछेहाट चालू असतानाच ब्रिटिशांनी विमानांतून पत्रके टाकली व ब्रिटिश सैन्यात परत या, अशी लालूच दाखविली. पण एकाही सैनिकाने त्यास भीक घातली नाही किंवा आझाद हिंद सेनेशी बेइमानी केली नाही, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट होय. भारत-सीमा पार करून पुढे ब्रह्मदेशात आगेकूच करणाऱ्या ब्रिटिश व भारतीय सैन्याला आझाद हिंद सेनेची पथके शरण आली. २ मे १९४५ रोजी रंगून पडल्यावर थोड्याच दिवसांत पुढे जपानने शरणागती पतकरली. नेताजी त्या वेळी सिंगापूरहून विमानाने टोकिओला जात असता अपघात होऊन मृत्यू पावले असावेत, असे म्हणतात. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला. शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले. तथापि भारतीयांच्या यासंबंधीच्या प्रक्षुब्ध लोकमताच्या जाणिवेने ब्रिटीश सरकारने या आधिकाऱ्यांच्या शिक्षा माफ केल्या (३ जानेवारी १९४६).
आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने, मानाने व आदराने ‘नेताजी ’ְम्हणू लागली त्यांनी दिलेली ‘जय हिंद’ही घोषणा आजही सर्वतोमुखी झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात जरी ही सेना पराजित झाली असली, तरी तिचे उद्दिष्ट, तीमागील प्रेरणा आणि जिद्द व थोड्या अवधीत तिने केलेली कामगिरी, यांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सेनेच्या अल्पकालीन पण स्फूर्तिदायक इतिहासास काही आगळे व महत्त्वाचे स्थान आहे.
पहा : बोस, सुभाषचंद्र भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास.
संदर्भ : 1. Majumdar,R.C. History of freedom Movement in India-Vol. III,Calcutta, 1963.
2. Majumdar, R.C. Ed. Struggle for freedom-Vol.xI, Bombay,1969.
देवगिरीकर, त्र्यं. र. पाटणकर, गो. वि नरवणे, द. ना.
“