सेंटो : ( सेंट्रल ट्रीटी ऑर्गनाय्‌झेशन ). टर्की, इराण, पाकिस्तान आणि ग्रेट ब्रिटन या चार देशांत पारस्परिक संरक्षणासाठी झालेला संघटना करार. प्रथम या कराराचे नाव मिडल-ईस्ट ट्रीटी ऑर्गनाय्‌झेशन (मेटो) असे होते. त्यावर टर्की व इराक ह्या दोन देशांनी २४ फेब्रुवारी १९५५ रोजी स्वाक्षऱ्या केल्या, तोच बगदाद करार होय. त्यानंतर त्याचवर्षी एप्रिलमध्ये ग्रेट ब्रिटन, सप्टेंबरमध्ये पाकिस्तान व नोव्हेंबरमध्ये इराण हे देश ह्या करारात सामील झाले. इराकचे पाश्चात्त्यधार्जिणे शासन क्रांतिकारकांनी पदभ्रष्ट केले (१९५८) आणि तिथे नवीन सरकार अस्तित्वात आले. तेव्हा ह्या नवशासनाचा बगदाद करारास विरोध झाल्यामुळे इराकने या करारातून मार्च १९५९ मध्ये अंग काढून घेतले. परिणामी बगदाद कराराचे २१ ऑगस्ट १९५९ रोजी उर्वरित देशांनी सेंटो करारात रूपांतर केले. बगदाद कराराचे मुख्यालय सुरुवातीस बगदाद येथे होते ते अंकारा (टर्की) येथे हलविण्यात आले. पुढे सेंटो करारात ग्रेट ब्रिटन, टर्की, इराण आणि पाकिस्तान हे देश उरले.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने या संघटनेची अधिकृत सभासद नव्हती, तरी त्यांचा ह्या संघटनेशी प्रारंभापासून जवळचा संबंध होता. सेंटोच्या परिषदेची ज्यावेळी बैठक बोलाविली जाई, त्यावेळी अमेरिकेस बैठकीचे निमंत्रण दिले जाई. खरे म्हणजे अमेरिकेनेच रशियाला विरोध करण्यासाठी सदस्य राष्ट्रांना बगदाद करार करण्यास उत्तेजन दिले होते. ही कृती अमेरिकेच्या साम्यवादाच्या प्रसारास विरोध या परराष्ट्रीय धोरणाचा एक प्रमुख भाग होती. हा करार निर्माण करून अमेरिकेने नाटो व सीटो ह्या करारांतील भौगोलिक पोकळी भरून काढली. अमेरिका सदस्य राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर लष्करी व आर्थिक मदत करीत होता. रशियाने जर सदस्य राष्ट्रावर आक्रमण केले, तर त्यास सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करावा, असे धोरण होते परंतु प्रत्यक्षात ह्या संघटनेने कोणतीही सुरक्षा देण्याची व्यवस्था केली नाही, तसेच या प्रदेशांतील आर्थिक व तांत्रिक बाबींच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मध्य-पूर्वेतील सभासद संघटनेच्या मर्यादित उद्देशाबद्दल पूर्णतः असमाधानी होते. त्यांना ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांपासून अलिप्त राहून स्वतंत्र रीत्या कृती करावी हे अधिक सोयीस्कर वाटले. त्यामुळे त्यांनी सेंटोतून अंग काढून घेतले. परिणामतः १९७९ मध्ये ही संघटना विसर्जित करण्यात आली.

शिंदे, आ. ब.