राष्ट्रवाद : राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यांवर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय विचारप्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद. एकोणिसाव्या शतकापासून यूरोपच्या इतिहासाला दिशा देणारी एक प्रमुख प्रेरणा म्हणून राष्ट्रवादाचा निर्देश करता येईल. हेच ऐतिहासिक कार्य राष्ट्रवादाने पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया खंडात आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आफ्रिका खंडात पार पाडले आहे. एक राजकीय विचारप्रणाली या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि एकता कायम राखणे, ही स्वयंसिद्ध नैतिक भूमिका होय. राष्ट्रीय स्वयंनिर्णयाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या हक्काचा पुरस्कार करणे, हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेचे सामूहिक राष्ट्रीय रूप होय. उदारमतवादाचेच हे दोन भिन्न पातळ्यांवरील आविष्कार होत. विकासोन्मुख आणि न्यायाधिष्ठित समाजरचना निर्माण करणे आणि जागतिक शांतता व सहकार्य साध्य करणे, ही उद्दिष्टे साध्य करावयाची असतील, तर व्यक्तिस्वातंत्र्यास पूरक असलेल्या राष्ट्रस्वातंत्र्याचा आग्रह धरावयास हवा, अशी उदारमतवादाची भूमिका आहे. जॉन स्ट्यूअर्ट मिल, जोसेफ मॅझिनी, वुड्रो विल्सन यांनी तिचे सातत्याने समर्थन केले परंतु दोन महायुद्धांदरम्यानच्या कालखंडात राष्ट्रवादाची अतिरेकी, भ्रष्ट आणि विकृत कल्पना फॅसिझम आणि नाझीवाद यांच्या रूपाने फोफावली. दुसऱ्या महायुद्धात या शक्तींचा बीमोड होऊन राष्ट्रवादाच्या संकल्पनेस लागलेले ग्रहण सुटले व महायुद्धोत्तर काळात आशिया-आफ्रिका खंडात राष्ट्रवादाने एक स्वातंत्र्यवादी आणि पुरोगामी प्रेरणा या भूमिकेतून ऐतिहासिक कार्य बजावले. प्रगत औद्योगिक समाजात राष्ट्रवादी प्रेरणेचा भर काहीसा ओसरला असला, तरी नवजात राष्ट्रांमध्ये मात्र अंतर्गत आणि बाह्य विघटनवादी शक्तींचे आव्हान पेलणारी एक विकासोन्मुख आणि लोकशाहीवादी प्रेरणा, म्हणून राष्ट्रवादाचे ऐतिहासिक कार्य संपलेले नाही.

राष्ट्रवाद या संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी विविध दृष्टिकोनांतून तिच्याकडे पाहणे आवश्यक ठरते.

तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन : तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता राष्ट्रवाद या संकल्पनेचे मूळ कांट (१७२४ – १८०४) या जर्मन तत्त्वज्ञापर्यंत पोहोचते. शाश्वत नीतिमूल्यांच्या निकषांविषयी त्याने असे प्रतिपादन केले, की नीतीचे उगमस्थान प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातच असते. व्यक्तींच्या आशा-आकांक्षांना नैतिक आशय प्राप्त होतो, तो कोणा बाह्य प्रेरणांच्या प्रभावामुळे नव्हे, तर त्या व्यक्तीचा आपल्याच जन्मजात प्रवृत्तींच्या विरोधी जो संघर्ष चालू असतो, त्याचा तो परिपाक असतो. नैतिक अर्थाने प्रत्येक व्यक्ती स्वायत्त असते. व्यक्तींची स्वतःची अनुभूती हीच नीतिमूल्यांची जननी आहे. म्हणून अनुभूती घेण्याचे स्वातंत्र्य हे नैतिक जीवनाचे अधिष्ठान आहे.

कांटच्या या प्रतिपादनामुळे व्यक्ती ही धर्म आणि समाज यांच्या विघातक बंधनातून तत्त्वतः मुक्त झाली हे खरे पण या सर्व स्वायत्त व्यक्तींना एकत्र जोडणारा कोणताही तात्त्विक दुवा अस्तित्वात नसेल, तर सुसंघटित आणि अर्थपूर्ण समाजजीवन निर्माण होऊ शकणार नाही. ही गोष्ट राष्ट्र या संकल्पनेमुळे शक्य झाली. व्यक्तिजीवनाची राष्ट्रजीवनाशी सैद्धांतिक सांगड घालण्याचे कार्य योहान फिक्टे (१७६२–१८१४) या दुसऱ्या जर्मन तत्त्वज्ञाने केले. फिक्टेच्या मते मानवी संस्कृती ही आपाततः घडलेली घटना नसून ती एका चिरंतन वैश्विक शक्तीचा आविष्कार होय आणि याच विश्वशक्तीने राष्ट्र हा समूहजीवनाचा मूलाधार म्हणून निश्चित केला आहे. साहजिकच व्यक्तीस समृद्ध नैतिक जीवन जगण्याची संधी आणि स्वातंत्र्य राष्ट्रजीवनाशी तादात्म्य पावल्यानेच प्राप्त होते आणि म्हणून राष्ट्र ही समूहजीवनाची श्रेष्ठतम व स्वयंसिद्ध सीमा आहे. व्यक्तीच्या सर्वोच्च निष्ठांची ती स्वामिनी आहे.

समाजशास्त्रीय दृष्टिकोन : समाजशास्त्रीय दृष्टिकोनान्वये राष्ट्र हा आधुनिकीकरणाच्या इहवादी प्रभावी प्रेरणांना मिळालेला राजकीय प्रतिसाद आहे. एखाद्या समाजात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू होते, याचा अर्थ त्या समाजाची पारंपरिक संस्थात्मक बैठक विघटित होऊन सामाजिक एकसंधता नष्ट होते. पारंपरिक समाजामध्ये व्यक्ती आपल्या सामाजिक भूमिका व्यक्तिगत पातळीवरच हाताळीत असतात, समूहजीवनाच्या कक्षा संकुचित असतात. लोकांचे आर्थिक राहणीमान तुटपुंजे असते, तंत्रज्ञानाची पातळी निकृष्ट दर्जाची असते आणि नफ्यासाठी उत्पादन हे समाजमूल्य नसते. अशा समाजात समाजजीवनाचे नियमन करण्यासाठी आवश्यक असलेली अनेकविध कार्ये एकमेकांपासून शास्त्रीय पद्धतीने विलग केलेली नसतात. म्हणून त्यामध्ये वस्तुनिष्ठता नसते. याउलट आधुनिक समाजातील सामाजिक व्यवहार व्यक्तिनिरपेक्ष पातळीवरून हाताळले जातात, कार्यांचे एकमेकांपासून पद्धतशीरपणे आणि काटेकोर विलगीकरण केले जाते, व्यक्तींचे एकमेकांशी संबंध कार्यांच्या संदर्भात ठरतात व म्हणून ते निर्वाणीचे नसतात. आधुनिक समाज हा प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आणि उद्योगप्रधान असतो.

आधुनिकीकरणाच्या या प्रक्रियेत एकमेकांविषयीच्या व्यक्तिगत विश्वासावर आधारित परंपरागत राजकीय संबंध निष्प्रभ होतात व त्यामुळे सामाजिक पोकळी निर्माण होते. परिणामी एकाकीपणा, साशंकता, अस्थिरता आणि असुरक्षितता या भावनांनी सर्व व्यक्ती व्यग्र होतात. त्यांच्या सर्वोच्च निष्ठा ज्याला अर्पण करून निश्चिंत होता येईल, अशा नव्या स्वरूपातील समाजपुरुषाची गरज त्यांना भासू लागते. राष्ट्राच्या रूपाने हा नवा समाजपुरुष त्यांना सामोरा येतो. हा राष्ट्रपुरुष त्यांच्या जीवनास स्थैर्य आणि शाश्वती देतो. राष्ट्र या संकल्पनेचे एक प्रमुख सामाजिक मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे.

वसाहतवाद आणि राष्ट्रवाद : काही मार्क्सवादी अभ्यासकांच्या मते राष्ट्रवाद ही केवळ वसाहतवादविरोधी प्रतिक्रिया आहे. या दृष्टिकोनातून वसाहतवादी परकी सत्तेने लादलेल्या जुलमी व अपमानास्पद अंमलाविरोधी निर्माण झालेली राजकीय चळवळ म्हणजे राष्ट्रवाद होय. परकीय अंमलामुळे राष्ट्रास आत्मभान निर्माण होण्यास मदत होते हे खरे असले, तरी राष्ट्रवादाचे जनकत्व वसाहतवादाशी जोडणे जसे चूक आहे, त्याप्रमाणे राष्ट्रवादाचा अर्थान्वय केवळ वसाहतवादाच्या संदर्भात स्पष्ट करण्याचा प्रयत्नही चूक आहे. तसे करणे म्हणजे वसाहतवादाचा अनुभव नसलेल्या समाजामध्ये राष्ट्रनिर्मितीची क्षमता नाकारणे होय.

मार्क्सवाद आणि राष्ट्रवाद : मार्क्स, लेनिन आणि स्टालिन या तिघांनीही अशी सैद्धांतिक भूमिका घेतली की राष्ट्रवाद व भांडवलशाही समाजव्यवस्था ही एकाच संस्थेची दोन रूपे आहेत. ‘कामगारांना पितृभूमी नसते,’ हे मार्क्सचे वचन प्रसिद्ध आहे. याचा अर्थ असा समजता येईल की जोपर्यंत कामगारांचे समाजातील स्थान आर्थिक व राजकीय दास्याचे आहेत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठेची भावना निर्माण होणे अशक्य आहे आणि हे दास्य संपुष्टात आले की राष्ट्रवादाचा राजकीय पायाच नष्ट होतो. दरम्यानच्या काळात कामगारांच्या निष्ठांचा केंद्रबिंदू आंतरराष्ट्रीय श्रमजीवीवर्ग हा असतो.

लॉर्ड ॲक्टनसारख्या मार्क्सच्या समकालीन असलेल्या बिगर मार्क्सवादी टीकाकाराने राष्ट्र-संकल्पनेविषयी ‘राष्ट्रचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट होय,’ अशी जी एकांगी भूमिका घेतली, तशी मार्क्सवादी विचारात आढळत नाही. राष्ट्र या संकल्पनेने बजावलेल्या प्रागतिक कामगिरीची योग्य ती दखल मार्क्सवादाने घेतली आहे. एंगेल्सने म्हटले आहे की, ‘आंतरराष्ट्रीय कामगार क्रांती घ़डून येण्यासाठी परकी सत्तेच्या दास्यात असलेल्या समाजांना स्वातंत्र्य प्राप्त होऊन त्यांची स्वतंत्र राष्ट्रे होणे आवश्यक आहे’. खुद्द भांडवलशाही समाजांचा विचार करतानादेखील असे लक्षात येते की भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या कालखंडातील राष्ट्रवादाचे कार्य पुरोगामी स्वरूपाचेच आहे. लेनिनने राष्ट्रवादाचे तीन ऐतिहासिक कालखंड मानले आहेत : पहिला कालखंड (१७८९–१८७१) हा भांडवलदार वर्गाच्या उन्नयनाचा कालखंड होता. या कालखंडात भांडवलशाही प्रेरणा या एका अर्थाने पुरोगामी होत्या कारण त्यांनी कालबाह्य अशा मध्ययुगीन सरंजामशाही शृंखला तोडून इतिहासाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला. या ऐतिहासिक कार्यामध्ये राष्ट्रवादाने भांडवलशाहीस मोलाची साथ दिली. दुसऱ्या कालखंडात (१८७१–१९१४) भांडवलशाही व्यवस्थेचे पूर्ण प्रभुत्व प्रस्थापित झाले पण त्याचबरोबर भांडवलदार वर्ग पुरोगामी भूमिकेपासून दूर जात प्रतिगामी बनला. हा साम्राज्यवादी कालखंड होय. या कालखंडात भांडवलशाही राष्ट्रांनी अवलंबिलेले साम्राज्यवादी धोरण म्हणजे राष्ट्रवादाचे विकृत स्वरूप होय. या नंतरच्या तिसऱ्या कालखंडात साम्राज्यवादी राष्ट्रांमधील संघर्ष अतिशय तीव्र होईल, असे भाकीत लेनिनने केले.

दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडांत साम्राज्यवादी शक्तींशी मुकाबला करण्याची जबाबदारी राष्ट्रवादावर पडली. मार्क्सवादाने या परिस्थितीची योग्य ती दखल घेतली आहे. आंतरराष्ट्रीय संदर्भात मुक्त अगर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या नवजात आशियाई-आफ्रिकी राष्ट्रांतील सत्तारूढ वर्गाचे मूल्यमापन करताना मार्क्सवादी विवेचनात, ज्या नवजात राष्ट्रांची आर्थिक धोरणे साम्राज्यवादास पूरक आहेत, त्यांची संभावना साम्राज्यवादाचे हस्तक अशी होते परंतु ज्या राष्ट्रांची आर्थिक धोरणे पूर्णतः राष्ट्रीय हितावर आधारित असतात, आर्थिक स्वयंपूर्णता हे ज्यांच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय असते व परकीय भांडवलशाही शक्तींशी ज्यांचे संबंध स्पर्धात्मक असतात, अशी राष्ट्रे भांडवलशाही स्वरूपाची असली, तरी राष्ट्रवादी आणि म्हणून साम्राज्यवादविरोधी असल्यामुळे त्यांचा उल्लेख राष्ट्रवादी भांडवलदारवर्ग, असा पुरोगामी अर्थाने करण्यात येतो.

संदर्भ : 1. Kang, Tai S. Ed. Nationalism and the Crises of Ethnic Minoirities in Asia, Westport,1981.

2. Kohn, Hans, The Idea of Nationalism : A Study of Its Origins and Background, New York, 1961.

3. Kohn, Hans, The Age of Nationalism : The First Era of Globa, History New York, 1962.

4. Shafer, B. C. Nationalism, Myth and Reality, New York, 1955.

5. Snyder, Louis L. The Dynamics of Nationalism, New Brunswick, 1954.

6. Snyder, Louis, L. The Meaning of Nationalism, Princeton, 1964.

तवले, सु. न.