अलगतावाद : विदेशनीतीचे एक सूत्र. एका राष्ट्राने अन्य राष्ट्राशी कोणत्याही प्रकारे बंधनकारक असा तह अगर करार न करता स्वतंत्रपणे आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे धोरण स्वीकारणे, ह्यास ‘अलगतावाद’ म्हणतात. जपानचे विसाव्या शतकापूर्वी अनेक वर्षे अशा प्रकारचे धोरण होते. एकोणिसाव्या शतकात, विशेषतः नेपोलियनच्या पाडावानंतर, ब्रिटननेही इतर यूरोपीय राष्ट्रांच्या संदर्भात काहीसे राजकीय अलगतेचे धोरण स्वीकारले होते. ह्यासच ‘वैभवशाली अलगता’ म्हणण्यात येत असे. परंतु आपल्या परराष्ट्रनीतीचा पाया म्हणून अलगतेचा अंगीकार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी प्रथमपासून केला व पहिल्या महायुद्धापर्यंत यशस्वी रीतीने अलगता टिकविली.

 

अमेरिकेची ही अलगता यूरोप खंडापुरती व फक्त राजकीय क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. सांस्कृतिक अगर व्यापारी संबंध कायम ठेवून यूरोपीय राजकारणापासून मात्र आपल्या राष्ट्राने अलग राहावे, असे तत्त्व अध्यक्ष वॉशिंग्टन व जेफर्सन ह्यांनी प्रतिपादन केले होते. १८२३ मध्ये अध्यक्ष मन्‍रो यांनी हेच धोरण प्रकटपणे घोषित केले. यूरोप खंडाच्या राजकीय घडामोडींपासून आपले राष्ट्र मूलतः अलग राहिले आहे, असे सांगून इतःपर यूरोप खंडातील कोणत्याही सत्तेने अमेरिका खंडातील कोणत्याही राज्याच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करता कामा नये व तसे झाल्यास ते कृत्य शत्रुत्वाचे मानण्यात येईल, असा एकतर्फी इशारा अध्यक्ष मन्‍रो यांनी दिला होता.⇨मन्‍रोसिद्धांत  ह्या नावाने ही घोषणा इतिहासप्रसिद्ध आहे व जवळजवळ दुसऱ्‍या महायुद्धापर्यंत हीच अमेरिकेची नीती होती, असे म्हणण्यास हरकत नाही. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे व खंडांतील इतर देशांच्या दौर्बल्यामुळे, अमेरिकेचे अलगतेचे धोरण यशस्वी झाले असावे. पहिल्या महायुद्धात हे राष्ट्र ओढले गेल्यामुळे ही नीती बदलेल असे वाटले होते. व्हर्सायचा तह व राष्ट्रसंघाची सनद ह्यांमागे प्रेरणाशक्ती अध्यक्ष विल्सन ह्यांची तथापि अमेरिकन राष्ट्राने दोनही गोष्टींकडे पाठ फिरवून पुन्हा अलगता स्वीकारली. १९३५ व १९३७ सालच्या तटस्थतेच्या कायद्यामुळे ह्या धोरणास पुष्टी मिळाली. दुसऱ्‍या महायुद्धानंतर मात्र हे धोरण संपूर्णपणे बदलले, असे म्हटले पाहिजे. संयुक्त राष्ट्रे व इतर आंतरराष्ट्रीय संघटनांत अमेरिका सहभागी आहे, एवढेच नव्हे, तर नाटोसारख्या सामुदायिक व इतर द्विपक्षीय लष्करी करारांमुळे जगातील सु. ५० राष्ट्रांच्या संरक्षणाची हमी अमेरिकेने घेतली आहे. दुसऱ्‍या महायुद्धानंतर ओघाओघाने आलेल्या नेतृत्वामुळे असे घडणे अपरिहार्य होते. अमेरिकेच्या बाबतीत अलगता इतिहासजमा झाली असून जगात अन्यत्र कोठेही अलगतावादाचा पुरस्कार आज होत नाही.

 

खोडवे, अच्युत