सिंग, चंद्रशेखर सदानंद : (१ जुलै १९२७ – ८ जुलै २००७). भारताचे आठवे पंतप्रधान (१९९०-९१) व ख्यातनाम संसदपटू. त्यांचा जन्म इब्राहिमपट्टी (जि. बलिया, उत्तर प्रदेश) या खेड्यात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. विद्यार्थिदशेत त्यांनी फी वाढीविरुद्घ आंदोलन छेडले. याच काळात त्यांचा दुजादेवी या युवतीशी विवाह झाला. त्यांना दोन मुलगे आहेत. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम्.ए. ही पदवी मिळवली (१९५०). त्यांना पीएच्. डी. करावयाची होती पण आचार्य नरेंद्र देवांच्या समाजवादी चळवळीकडे ते आकृष्ट झाले. १९५५ मध्ये ते सक्रिय राजकारणात आले. प्रजासमाजवादी पक्षाचे पुढे ते सरचिटणीस झाले आणि त्यांची राज्यसभेवर निवड झाली (१९६२). त्यांनी डायनॅमिक्स ऑफ सोशल चेंज (१९६४) हे भारतीय अर्थशास्त्रावर पुस्तक लिहिले आणि यंग इंडियन या साप्ताहिकाचे संपादनही काही वर्षे केले.

चंद्रशेखर सदानंद सिंगअशोक मेहतांमुळे ते काँग्रेसमध्ये गेले (१९६५). श्रीमती इंदिरा गांधींसाठी त्यांनी प्रचार केला व ‘सिंडिकेट’ चौकडीविरुद्घ पक्षांतर्गत बंड पुकारले. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संजीव रेड्डींचा पराभव करुन गिरींना निवडण्यात त्यांनी श्रीमती इंदिरा गांधींना सहकार्य केले. ‘तरुण तुर्क’ म्हणून त्यांची महती वाढली ‘गरिबी हटाव’ ही त्यांचीच अभिनव कल्पना होय, मात्र श्रीमती इंदिरा गांधींच्या व्यक्तिकेंद्रित निर्णयाविरुद्घ यंग इंडियन या साप्ताहिकातून त्यांनी घणाघाती टीका केली आणि जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीस त्यांनी पुढे १९७५ मध्ये पाठिंबा दिला. देशात आणीबाणी जाहीर झाली आणि चंद्रशेखरांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांना स्थानबद्घ करण्यात आले. तुरुंगात त्यांनी मेरी जेल डायरी हे पुस्तक लिहून तत्कालीन अनुभव कथन केले (१९७६). आणीबाणीनंतर चंद्रशेखर जनता पक्षात सामील झाले (१९७७). त्यांना जनता पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले. हे पद त्यांनी दीर्घकाल उपभोगले (१९७७ – ८७). १९७९ मध्ये त्यांनी भारतभर दौरा केला. चंद्रशेखर हे बलिया मतदारसंघातून सलग १९७७ ते १९८४ आणि १९८९ नंतर २००१ पर्यंत लोकसभेत खासदार होते.

त्यांनी कन्याकुमारीपासून राजघाटपर्यंत सु. ४,२६० किमी.ची प्रदीर्घ पदयात्रा काढून जनतेशी थेट संपर्क साधला होता (१९८२). भारताने अणुबाँब बनविण्याच्या कल्पनेस त्यांचा व्यक्तिगत विरोध होता. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात १९८५-८६ मध्ये मतभेद झाले आणि जनता दल या नवीन पक्षाची स्थापना झाली (१९८८). पुढे सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेसचा पराभव झाला (१९८९) आणि जनता दल, भाजप व डावे गट यांच्या पाठिंब्याने केंद्रात व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरकार सत्तारुढ झाले पण जनता दलात व्ही. पी. सिंग यांच्या धोरणांसंबंधी, विशेषतः मंडल आयोग, राखीव जागा आणि रामजन्मभूमी – बाबरी मशीद या प्रश्नांवरुन, मतभेद निर्माण झाले. रामजन्मभूमीच्या संदर्भात अडवानींनी रथयात्रा काढली. त्यांना २२ ऑक्टोबर १९९० रोजी अटक होताच भाजपने शासनाचा पाठिंबा काढून घेतला. परिणामतः चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील ५८ खासदारांनी पक्षातून बाहेर पडून समाजवादी जनता दलाची स्थापना केली आणि काँग्रेस (इंदिरा ), अण्णा द्र. मु. क. व अपक्ष यांच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता हस्तगत केली (१९९०).१६ नोव्हेंबर १९९० मध्ये लोकसभेत चंद्रशेखरांनी आपल्या सरकारवर विश्वास संत करुन घेतला आणि ते भारताचे आठवे पंतप्रधान झाले.

त्यांनी पंजाब प्रश्न सामंजस्याने सोडवावा तसेच सरहद्दीवरील रहिवाशांना ओळखपत्रे देण्याच्या कल्पनेचाही पाठपुरावा केला. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद हा धार्मिकवाद विश्वहिंदू परिषद व बाबरी मशीद समिती यांनी परस्परांत चर्चा करुन सामान्य तोडगा काढून मिटवावा, अन्यथा तो विनाशास कारणीभूत ठरेल, असे त्यांनी आग्रहपूवर्क प्रतिपादन केले होते. काश्मीर प्रश्नही चर्चेनेच सुटू शकेल, असे त्यांचे मत होते मात्र त्यांनी मुस्लिम महिला विधेयक आणि अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांसंबंधी तटस्थ भूमिका स्वीकारली.

चंद्रशेखर यांनी समन्वयवादी भूमिका घेऊन देशात सुव्यवस्था व शांतता या प्रश्नांना प्राधान्य दिले. आर्थिक बाबतीत त्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला होता तथापि काँग्रेसने पाठिंब्याची शाश्वती नाकारताच १९९१-९२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखा-अनुदान मागण्या मांडल्यानंतर ६ मार्च १९९१ रोजी चंद्रशेखर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला आणि संसदेच्या फेरनिवडणुकांची मागणी केली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी कोणत्याही एका पक्षात न राहता अपक्ष खासदार म्हणून विरोधकाची भूमिका बजावली.

नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

घाडगे, विमल