राजेंद्रप्रसाद, डॉ. : (३ डिसेंबर १८८४–२८ फेब्रुवारी १९६३). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर डॉ.राजेंद्रप्रसाद"नेते आणि भारतीय प्रजासत्तकाचे पहिले राष्ट्रपती (१९५०–६२). त्यांचा जन्म बिहारच्या सारन जिल्ह्यातील जीरादेई या खेड्यात श्रीवास्तव नामक सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा चौधुरलाल हे हथवा संस्थानाचे दिवाण होते. त्यांनी काही जमीनजुमला घेऊन बऱ्यापैकी मालमत्ता संपादन केली होती. वडील महादेव सहाय हे समाजसेवा करीत. ते युनानी व आयुर्वेदीय औषधोपचार करणारे हौशी वैद्य होते. आई कमलेश्वरीदेवी धार्मिक वृत्तीची होती. तिच्या संस्कारांचा प्रभाव राजेंद्रबाबूंच्या जीवनावर अखेरपर्यंत होता. राजेंद्रप्रसादांचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपारिक पद्धतीने झाले. त्यात उर्दू आणि फार्सी या भाषाशिक्षणावर अधिक भर होता. पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए. (१९०६), एम. ए. (१९०८), बी. एल्. (१९०९) व एम्. एल्. (१९१५) या पदव्या मिळविल्या. मॅट्रिकपासून एम्. एल्. पदवीपर्यंत त्यांनी पहिली श्रेणी सोडली नाही. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर जगदीशचंद्र बोस व प्रफुल्लचंद्र रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडली. विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वदेशी व लोकसेवेचे व्रत घेतले.

सुरुवातीस काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले आणि नंतर कलकत्ता उच्च न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला (१९११). पाटण्याला उच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर ते तिथे चौकशी करू लागले (१९१६). त्यात त्यांना चांगली अर्थप्राप्ती होई. एक विद्वान कायदे-पंडित म्हणून त्यांचा नावलौकिकही वाढला. काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले (१९०६). पाटणा नगरपरिषदेचे ते अध्यक्षही होते. ते पुढे १९११ मध्ये काँग्रेसचे सभासद झाले. बिहारच्या १९१७ च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधींशीं त्यांचा परिचय वाढला. हा सत्याग्रह यशस्वी होऊन सरकारने तीन कठियांचा कायदा रद्द केला. त्यानंतर राजेंद्रबाबूंचा काँग्रेसशी वारंवार संबंध येऊ लागला. रौलट कायदा रद्द व्हावा, म्हणून देशात सार्वत्रिक सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली (१९१९). त्यावेळी बिहार प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षपदी ते निवडून आले. त्यांनी म. गांधींच्या चतुःसूत्रीचा पुरस्कार केला आणि वकिली व्यवसाय सोडला. पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापून स्वदेशी, मद्यपानबंदी, खादीचा प्रसार इ. कार्यक्रम हाती घेतले. १९३० च्या कायदेभंग चळवळीत राजेंद्रबाबूंचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला. तीन वेळा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९३०-३१, १९३२ व १९३३) परंतु ब्रिटीश सरकारने बेकायदा अध्यक्ष म्हणून त्यांना पुन्हा पंधरा महिने कारावासात टाकले. तिथे त्यांचा दम्याचा विकार वाढला. बिहारमध्ये १९३४ साली फार मोठा भूकंप झाला. त्यावेळी त्यांची सुटका झाली. मदत समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अतोनात परिश्रम घेऊन ३८ लाख रुपयांचा भूकंप निधी जमा केला. प्रकृतीची पर्वा न करता ते रात्रंदिवस गोरगरिबांसाठी खपले. १९३४ च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतरच्या छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले (१९४२). त्यावेळी त्यांची बंकीपूरच्या तुरुंगात रवानगी झाली. तिथून १५ जून १९४५ रोजी ते सुटले. तुरुंगात असताना त्यांनी आत्मचरित्राचा बराचसा भाग लिहिला.

पं. जवाहरलाल नेहरूंनी २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी सरकार बनविले. या राष्ट्रीय मंत्रीमंडळात अन्नमंत्री म्हणून राजेंद्रबाबूंचा समावेश झाला. त्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती स्थापण्यात आली व राजेंद्रप्रसाद यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड झाली. या समितीने सु. तीन वर्षांच्या परिश्रमानंतर भारताची राज्यघटना मंजूर केली. त्यानुसार प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्रबाबूंचा शपथविधी झाला (१९५०). त्यांनी आपले वेतन कमी करून घेतले आणि राष्ट्रपती भवनातील शाही राहणीमानात आमूलाग्र बदल केला. तेथील विशाल उद्यान जनतेसाठी खुले केले. पूर्वीप्रमाणेच ते साधेपणाने रहात. या पदावर ते निवृत्त होईपर्यंत म्हणजे १० मे १९६२ पर्यंत होते. त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रपतींचे घटनात्मक स्थान व अधिकार यांविषयीचा प्रश्न दोन तीन वेळा उद्भवला.

प्रथम राष्ट्रपती झाल्यावर १९५० मध्ये त्यांनी पंतप्रधानांना एक टिपण पाठवून राष्ट्रपतींना विशेषाधिकार आहेत काय, हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळचे महान्यायवादी सेटलवाड यांनी या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले नंतर १९५१ मध्ये हिंदू कोड बिल हे हिंदू व्यक्तिगत कायद्यात बदल करणारे विधेयक मांडले गेले तेव्हाही त्यांनी त्या वेळच्या संसदेस एवढे महत्त्वाचे विधेयक विचारात घेण्याचा अधिकार नाही, या कारणास्तव प्रस्तावित विधेयकाविरुद्ध मत नोंदवून आपण संसदेला संदेश पाठवू, असा मनोदय व्यक्त केला होता. विशेषतः हिंदू धर्म आणि परंपरा यांविषयींचा त्यांचा दृष्टिकोन सौम्य आणि परंपरेचा अभिमान बाळगणारा असल्याने ते ह्या विधेयकावर नाराज होते. पुढे १९६० साली त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे राष्ट्रपतींच्या घटनात्मक स्थानाची चर्चा व्हावी असे सुचविले, या व अन्य कारणांनी पंतप्रधान नेहरूंशी त्यांचे तात्विक मतभेद झाले मात्र त्यांच्या व्यक्तिगत मैत्रीत व स्नेहसंबंधात बाधा आली नाही. निवृत्तीनंतर ते बिहारमधील आपल्या सदाकत आश्रमात (पाटणा) राहण्यास गेले. आईसमान असलेली त्यांची मोठी विधवा बहिण भगवती देवी हिचे निधन (१९६०) झाले व संधिवाताने त्यांच्या पत्नीचे निधन झाले (१९६२). यांमुळें ते खचले. शिवाय त्यांचा दम्याचा विकार तीव्रतर झाला. त्यातच पाटण्यात त्यांचे निधन झाले.

त्यांचे खासगी जीवन अत्यंत साधे व पारंपरिक पद्धतीचे होते. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांचा विवाह राजबंसदेवी यांच्याबरोबर झाला (१८९७). त्यांना मृत्यूंजय व धनंजय असे दोन मुलगे झाले. त्यांच्या घरची सर्व आर्थिक जबाबदारी मोठे भाऊ महेंद्रप्रसाद सांभाळत असत.

स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांनी प्रचार-प्रसारार्थ सर्व भारतात प्रवास केला. परदेशी प्रवासाचीही त्यांना अनेकदा संधी मिळाली. त्यांनी श्रीलंकेचा दोनदा दौरा केला (१९२७ व १९५९). १९२८ मध्ये ते कायदाविषयक सल्लागार म्हणून एक खासगी अपील दाखल करण्यासाठी इंग्लंडला गेले. त्याचवेळी यूरोपमधील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी नेपाळ (१९५६), जपान (१९५८), मलाया, इंडोनेशिया, व्हिएतनाम (उत्तर व दक्षिण), लाओस (१९५९), आणि रशिया (१९६०) यांचे सदिच्छादर्शक दौरे केले.

राजेंद्रबाबूंच्या अध्ययनाचा प्रारंभ ऊर्दू आणि फार्सी भाषांनी झाला असला, तरी नंतर त्यांनी इंग्रजी हिंदी व बंगाली या भाषांवर प्रभुत्व मिळविले. हिंदु कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला. हिंदीचा भारतभर व विशेषतः दक्षिण भारतात प्रसार व्हावा, म्हणून ते प्रयत्नशील होते. १९१२ च्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते चिटणीस होते. नागपूर येथील अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले (१९३६). त्यांचे लेखन हिंदी व इंग्रजीत आहे. बापू के कदमोंमें (१९५०), साहित्य, शिक्षा, और संस्कृती (१९५२), भारतीय शिक्षा (१९५३), चंपारणमें महात्मा गांधी (१९१८), मेरे यूरोप के अनुभवआत्मकथा (१९४७) हे त्यांचे हिंदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. इकॉनॉमिक्स ऑफ खादी (१९२६) आणि डिव्हायडेड इंडिया (१९४६) ही त्यांची इंग्रजी पुस्तके. साधी, सरळ, ओघवती भाषाशैली आणि सुस्पष्ट मांडणी हे त्यांचे लेखन विशेष होत. यांव्यतिरिक्त त्यांनी वृत्तपत्रातुन स्फुटलेखनही केले. सर्च लाईट या पाटण्याच्या इंग्रजी दैनिकाचे ते संस्थापक होते. येथील लॉ विकली या साप्ताहिकाशीही त्यांचा संबंध होता. त्यानंतर त्यांनी देश नावाचे हिंदी नावाचे साप्ताहिक चालू केले (१९२०).

राजेंद्रबाबूंना अनेक मान सन्मान मिळाले. भारतातील अलाहाबाद, पाटणा, सागर, म्हैसूर, दिल्ली, काशी इ. विद्यापीठांनी डि. लीट्. ही सन्मान्य पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. भारत सरकारने भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला (१९६२).

राजेंद्रबाबूंचे वयक्तिमत्त्व सर्वस्पर्शी आणि विशाल होते ते. धर्मनिष्ठ व परंपराभिमानी होते. पण रूढीप्रिय नव्हते. काळाच्या ओघाबरोबर आपले रीतिरिवाज बदलले पाहिजेत व समतेवर व माणुसकीवर आधारित नवसमाजाची घडण झाली पाहिजे, या मताचे ते होते. नेहरूंच्या समाजवादी विचारांपासून ते दूरच राहिले. त्यांच्यावर म. गांधींची धोरणे व मूल्ये यांचा खोलवर प्रभाव होता. सौजन्य, विद्वत्ता, आणि कार्यनिष्ठता यांमुळे ते सामान्यांत अत्यंत लोकप्रिय झाले. यांमुळेच म. गांधी त्यांना ‘अजातशत्रू’ म्हणत.

संदर्भ : 1. Darbar, Gyanwati, Partrait of a President, 2 Vols., 1947 &amp 1976.

2. Handa, R. L. Rajendra Prasad : Twelve Years of Trumph and Despair, Delhi, 1977.

3. Panjabi, K. L. Rajendra Prasad, Calcutta, 196०

4. Sen, S.P. Ed. Dictionary of National Biography, Calcutta, १९७४.

५. कवडी, नरेश, अनु. राजेंद्रप्रसाद: आत्मकथा, नवी दिल्ली, १९५८.

देशपांडे, सु. र.