समाजवाद : संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणणारी विचारप्रणाली. उत्पादन, विभाजन आणि विनिमय यांची साधने जनतेच्या म्हणजे समाजाच्या मालकीची व्हावीत, प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणांची जोपासना करण्याची समान संधी दिली जावी व त्यातून समाजाच्या उत्पादनशक्तीचा विकास व्हावा, ही तत्त्वे तीत अध्याह्त आहेत. दारिद्रय आणि शोषण संपुष्टात आणून न्याय्य पातळीवर समाजाची पुनर्रचना करणे व मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचे आवाहन समाजवादाच्या संकल्पनेत अभिप्रेत आहे. थोडक्यात समाजवादी विचारसरणीने समता व न्यायावर आधारित नव्या समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला. या विचारप्रणालीच्या पुरस्कर्त्यांच्या मते व्यक्तिहितापेक्षा समाजहित महत्त्वाचे आहे. औदयोगिक कांती, त्या क्रांतीनंतर निर्माण झालेली आर्थिक विषमता आणि व्यक्तिवाद व भांडवलशाही या सर्वांच्या प्रतिकियेतून समाजवादी विचार निर्माण झाला. भांडवलशाही समाजरचना जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा तिच्या अर्थव्यवस्थेतील दोषांमुळे त्याची प्रतिकिया म्हणून एकोणिसाव्या शतकात समाजवादाचा विचार पुढे आला आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत अधिकारांवर आधारलेली लोकशाही कांती घडून आली. समाज-वाद हा सोशलिझम या इंगजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असून सोशॅलिझम या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘ सहकार ’ असा आहे. समाजवादाची व्याख्या अनेकांनी केली आहे. एका फेंच वृत्तपत्राने १८९२ मध्ये समाजवादाच्या वेगवेगळ्या सहाशे व्याख्या प्रसिद्ध केल्या. समाजवाद हा कोणाला आर्थिक क्षेत्रात आणावासा वाटतो, तर काही विचारवंत समाजवादाला समाजरचनेचा प्रकार मानतात तर कोणी उदयोगधंदयांचे राष्ट्नीयीकरण केले, म्हणजे समाजवाद साध्य झाला असे मानतात. समाजवादाच्या अनेक व्याख्या करण्यात येतात पण समाजवादाच्या संकल्पनेत मुख्यत: खालील तत्त्वांचा समावेश होतो. सर्व स्त्री-पुरूषांत समानता स्थापन करणे, उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची करून त्यांचे न्याय्य वितरण करणे. वितरणाचे सूत्र प्रत्येकास त्याच्या कामाप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे दाम देणे, समाजातील उत्पादक-शक्तीचा विकास घडवून आणणे आणि त्याव्दारा मानवी विकासास नव्या पातळीवर नेणारा वर्गविहीन व राज्यविहित समाज स्थापन करणे, समाजवादाचा उद्देश साम्यवादी समाजाची स्थापना करणे हा असतो.

समाजवाद ही संज्ञा प्रथम १८३० मध्ये तर काहींच्या मते १८२७ मध्ये प्रचारात आली. तिचा अनुकमे उल्लेख शार्ल फूर्ये &ampआणिnbsp⇨आंरी द सँ-सीमाँ या फेंच राजनीतिज्ञांनी केला. पुढे इंग्लिश उदयोगपती व विचारवंत आणि समाजसुधारक ⇨ रॉबर्ट ओएन याने या शब्दाचा वापर ‘ को-ऑप-रेटिव्ह मॅगेझीन ’ मध्ये केला. पुढे ओएनने सामाजिक पुनर्रचनेसंबंधीचा द फ्यूचर मॅन्स गार्डियन हा गंथ लिहिला (१८३३). त्याने उत्पादनसाधने सामुदायिक मालकीची झाली पाहिजेत, असा आगह धरला. सहकाराच्या तत्त्वावर त्याचा विश्वास होता एवढेच नव्हे, तर अशा प्रकारची कृती व प्रयोग त्याने आपल्या न्यू लानार्क मिल्स ( ग्लासगो ) मध्ये केला तथापि शास्त्रशुद्ध समाजवादी विचारांची मांडणी करण्याचे श्रेय ⇨ कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) या जर्मन विचारवंताकडे जाते. मार्क्सच्या विचारात स्थलकालानुरूप फेरफार करून ⇨ न्यिकलाय लेनिन (१८७०-१९२४) याने रशियन राज्यक्रांती समाजवादी समाज स्थापन करण्याचा प्रयोग रशियात केला, तसेच चीनमध्ये १९४९ नंतर ⇨ माओ-त्से-तुंग याने ही विचारसरणी कार्यवाहीत आणली. पश्चिम यूरोपातील लोकशाही  देशांत ⇨ हॅरल्ड लास्की,  ⇨ सिडनी वेब,  ⇨ जी. डी. एच्. कोल, ⇨ क्लेमंट ॲटली, बेव्हन प्रभृती राजकीय विचारवंतांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला. स्वीडन, नॉर्वे, फिनलँड या देशांत अनेक वर्षांपासून समाजवादी पक्षांच्या राजवटी होत्या.

समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार फार प्राचीन काळी ⇨ प्लेटो ( इ. स. पू. ४२८-३४८) या थोर गीक तत्त्वज्ञ व विचारवंताने द रिपब्लिक या गंथात इ. स. पू. चौथ्या शतकात मांडला होता. प्राचीन गीसमध्ये समाजवादी विचार प्रभावी होता, पण प्लेटोने आपल्या रिपब्लिक या गंथात आदर्श amज्याVrc सत्ताधारी पालक वर्गासाठी साम्यवादाची कल्पना मांडली आहे. यात पालक वर्गासाठी खाजगी मालमत्ता व कुटुंबसंस्था नसेल पण ही व्यवस्था मोजक्याच लोकांसाठी होती. त्यानंतर इंग्लंडमधील यादवी युद्धाच्या काळात लेव्हलर्स ( सामाजिक भेदभाव नष्ट करू इच्छिणारे ) आणि डिगर्स ( अन्न आणि संपत्तीची समसमान वाटणी मागणारे सामान्य लोक ) यांनी समाजवादी विचार मांडले. त्यांचा काल स्थूलमानाने सतरावे शतक होय. तत्पूर्वी सोळाव्या शतकात ⇨ टॉमस मोर (१४७८-१५३५) या इंगज मानवतावादी लेखकाने यूटोपिया नामक गंथात एका काल्पनिक आदर्श समाजाचे चित्र रेखाटले आहे (१५१६). त्यात आदर्श किंवा सर्वसुखयुक्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे काल्पनिक राज्य गृहीत धरले आहे. आदर्श राज्य कसे असावे, आदर्श समाजरचना कोणत्या स्वरूपाची असावी, यासंबंधीच्या कल्पना टॉमस मोरने विस्ताराने मांडल्या आहेत. आदर्श समाजकल्पना हे एक प्रकारचे स्वप्नरंजन आहे तथापि आदर्शाकडे झेप घेण्याची मानवी प्रवृत्ती शतकानुशतके कशी टिकून आहे, हे यावरून स्पष्ट होते. विचारवंतांनी केवळ आदर्श समाजाचे चित्र रंगविण्यासाठी कल्पनाविहार केला आहे, असे नाही जॉर्ज ऑर्वेलने नाइन्टीन एटीफोर ह्या गंथात (१९४९) अमाप तांत्रिक सामर्थ्याचा वापर करून आणि असत्याचा पद्घतशीरपणे उपयोग करून, व्यक्तिजीवनाचे सर्वंकष नियंत्रण करणाऱ्या सत्ताधीशाच्या तावडीत सापडलेल्या समाजाचे विदारक चित्रण आहे. भविष्यात सत्य होऊ शकेल, असे एक सामाजिक दु:स्वप्न ऑर्वेलने रंगविले आहे. पुढे सतराव्या शतकात टी. कॅम्पनेल्ल या राज्यशास्त्रविषयक मीमांसकाने सिटी ऑफ द सन या गंथात समाजवाद या संकल्पनेविषयी चर्चा केली आहे (१६२३). याशिवाय प्रबोधनकालीन अनेक लेखकांनी या संकल्पनेचा ऊहापोह केला असून, फेंच राज्यक्रांती दरम्यान व तत्पूर्वी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत मानवी अधिकारांच्या उद्घोषांबरोबरच त्यांच्या स्थापनेकरिता आवश्यक अशी समाजरचना स्थापिणे आवश्यक आहे, अशी विचारसरणी दृढमूल झाली होती. ही समाजरचना शुद्ध व न्याय्य होय, असाही विचार त्यातून पुढे आला. माणसाची माणसाने चालविलेल्या, पिळवणुकीच्या पद्धतीवर आधारलेल्या, उच्च्नीच वर्गवारी असलेल्या समाजरचनेचा अंत करणे युक्त होय, असा विचार समाजवादी विचारसरणीच्या मूळाशी आहे. समाजवादी कांती घडवून आणणे आवश्यक आहे, असे मानणाऱ्या विचारवंतांनी, समाजनेत्यांनी समाजवादाच्या स्थापनेकरिता सिद्घ व्हावे, असा विचार पश्चिम यूरोपात प्रसृत होऊ लागला. त्यांतील काही समाजवादी असेही म्हणू लागले की, समाजरचनेचा केवळ आर्थिक पाया बदलून मानवी पिळवणूक थांबणार नाही त्याकरिता राज्य विसर्जन करणे आवश्यक आहे. समाजवादाचे विविध प्रकार एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत यूरोपीय देशांतून प्रसृत झालेले आढळतात. त्यांत समाजवादाचे काही उपप्रवाह आढळतात. फान्स व स्पेनमध्ये श्रमिक संघवादाची वाढ झाली. इंग्लंडमध्ये १८८० नंतर फेबिअन समाजवादी चळवळीचा प्रभाव वाढला. फेबिअन सोसायटी व मजूरपक्ष यांना रक्तरंजित कांतीतून उगम पावणारा समाजवाद मान्य नव्हता. त्यांना लोकशाही समाजवाद अभिप्रेत होता. ⇨ प्यॉटर कपॉटक्यिन आणि ⇨म्यिकईल बकून्यिन यांनी स्वातंत्र्य, समता व  बंधुत्व या नैतिक आदर्शवादाचा आविष्कार करणारा अराज्यवाद पुरस्कृत केला समाजवाद किंवा साम्यवाद या ध्येयवादांप्रमाणेच अराज्यवादhr मानव व समाज यांच्या तात्त्विक मीमांसेवर आधारलेला आहे. अराज्यवादmV शास्ता, शासनयंत्रणा किंवा दंडशक्ती यांपैकी कशाचीच जरूरी नसते तथापि समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या लोकशाही राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या कामगार संघटना व त्यांनी हाती घेतलेल्या चळवळी, ह्यांतून भांडवलशाही व तिला संरक्षण देणाऱ्या शासनसंस्थेला आव्हान दिले जात असले, तरी तीत राज्यसंस्था कायमची मोडून टाकावयाची, असा अगदी आत्यंतिक सैद्धांतिक आगह जरी नसला, तरी राज्य स्वरूप बदलले पाहिजे व ते आपल्याला पाहिजे तसे करून घेतले पाहिजे आणि असे करणे शक्य आहे, हा विश्वास मात्र निश्चित असतो. राज्यसंस्थेशिवाय समाज खरोखरीच सुरळीत चालू शकेल काय ? समाजवादात व्यक्तिस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य अशी लोकशाहीला अभिप्रेत असलेली सर्व मूल्ये लोकसत्ताक स्वरूपाची समाजवादी शासनसंस्थाच जोपासू शकेल, असा समाजवादी विचारवंतांना विश्वास वाटतो, तर फेडरिक मॉरिस व चार्ल्स किंग्जली यांनी दुसऱ्या टोकाचा क्रिश्चन  सोशलिझम हा विचार इंग्लंडमध्ये मांडला आणि त्याचा प्रसार-प्रचारही केला. क्रिस्ती धर्म व समाजवाद यांचा मेळ घालण्याचा तो प्रयत्न होता. पुढे तो विचार यूरोप व अमेरिकेत पसरला. इंग्लंडमध्ये जी. डी. एच्. कोल हा व्यवसाय संघवादाचा मुख्य प्रणेता होता. जगातील बहुसंख्य राष्ट्रांत समाज-वादी विचार कामगार संघाच्या स्वरूपात रूजले. कामगार संघांनी शासना-वर प्रभाव पाडून आपले हक्क प्रस्थापित करण्यात काही प्रमाणात यश मिळविले आहे.

भारतात समाजवादी विचार पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण व डॉ. लोहिया यांनी मांडले. त्यांच्या विचारांवर म. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कार्ल मार्क्स (१८१८-८३) याने कामगारांची राज्यक्रांती, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, कामगारवर्गाची हुकूम-शाही यांची चर्चा केली. त्याच्या विचारांचे तपशीलवार वर्णन कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो (१८४८) आणि कॅपिटल या गंथांत आढळते. त्याचे म्हणणे असे की, समाजवाद हा नैतिक दृष्टय युक्त असला, तरी समाजवादी कांती केवळ सदिच्छेने आणि विचारपरिवर्तनाने घडू शकत नाही. त्याला अनुकूल अशी सामाजिक परिस्थिती उत्पन्न व्हावी लागते. मध्ययुगीन सरंजामशाहीतून समाजवाद जसा उत्पन्न होऊ शकत नाही, तशी भांडवलशाही समाजरचना जोपर्यंत नाहीशी होत नाही, तोपर्यंत समाजवादी कांती होऊ शकत नाही. सामाजिक कार्यकारणभावाचा नियम उल्ल्घून काहीही करता येणे माणसास अवघड आहे. मार्क्स म्हणतो की, आतापर्यंतचे समाजवाद हे यूटोपियन धर्तीचे म्हणजे अवास्तव कल्पनारंजित आहेत. त्याचा समाजवाद हा वैज्ञानिक समाजवाद आहे. मार्क्सच्या वैज्ञानिक समाजवादाची उपपत्ती थोडक्यात अशी आहे :


विशिष्ट आर्थिक उत्पादनपद्घत हा विशिष्ट समाजरचनेचा पाया असतो. त्या पायावर सामाजिक वर्गसंबंध आधारलेले असतात. सत्ताधारी वर्ग व सत्ताहीन वर्ग ही वर्गीय समाजरचनेची निर्मिती असते. उत्पादनाच्या साधनांच्या आधारे सत्ताधारी वर्ग राज्यसंस्था ताब्यात घेतो. राज्यसंस्था म्हणजे दंड-संस्था, जबरदस्ती करणारी संस्था. आर्थिक उत्पादनपद्धती बदलली म्हणजे समाजाचे वर्गसंबंध बदलतात सत्ताधारी वर्ग बदलतात. एक विशिष्ट आर्थिक उत्पानदपद्धती जोपर्यंत उत्कर्ष पावते, तोपर्यंत व त्यामुळे तिच्यावर आधार-लेली समाजपद्धती स्थिर राहते, सत्ताधारी वर्गही उत्कर्ष पावतो, ही गोष्ट आर्थिक पद्धती ढासळू लागली म्हणजे पिळला जाणारा वर्ग सत्ताधारी वर्गाच्या हातातील सत्ता हिसकावून घेतो व समाजकांती होते. वर्तमान भांडवलशाही समाजसंस्थेच्या अर्थोत्पादन पद्धतीचा पाया ढासळू लागेपर्यंत समाजवादी कांती होणार नाही. भांडवलशाहीतील कामगार वर्ग हा कांतिकारक वर्ग होय. या वर्गाच्या नेतृत्वाखाली सशस्त्र समाजवादी कांती जन्मालाल. येई कामगारांचे शोषण भांडवलदार वर्ग अतिरिक्त मूल्य निर्माण करून करतो. भांडवलशाही समाजव्यवस्थेत समाजाची विभागणी सत्ताधारी भांडवलशाही वर्ग आणि पिळला जाणारा कामगार वर्ग, अशीच राहणार असून याच कामगारवर्गात समाजातील बहुसंख्य व्यक्ती अधिकाधिक समाविष्ट होत जाणार श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील, गरीब अधिक गरीब होत जातील त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एका बिंदूपर्यंत उत्कर्ष होऊन ती अपकर्षास जाऊ लागेल. त्यामुळे कामगारवर्ग भांडवलशाही वर्गाच्या हातातील सत्ता काबीज करून कामगारवर्गाची हुकूमशाही स्थापन करील. भांडवलशाही वर्ग नष्ट होईपर्यंतच ही हुकूमशाही राहील. या हुकूमशाहीत  आर्थिक उत्पादन-साधने ही सामाजिक मालकीची होतील. हीच  समाजवादी कांती होय. खाजगी मालकीची आर्थिक उत्पादन-साधने  समाजाच्या मालकीची होणे, म्हणजेच समाजवाद होय. भांडवलशाही  नष्ट झाल्यावर उत्पादनशक्तीच्या विकासदरावर हळूहळू राजसत्ताही आपोआप संपुष्टात येऊन राज्यसत्ताविहीन समाजवादी समाजरचना म्हणजे साम्यवादी ( कम्यूनिझम ) समाजसंस्था उदयास येईल.

कार्ल मार्क्सच्या वरील वैज्ञानिक समाजवादाविषयी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात की, ‘ कार्ल मार्क्सचा हा वैज्ञानिक समाजवाद एका अर्थी यूटोपियनच आहे. समाजपरिवर्तनाचा कार्यकारणभाव त्याने सांगितला. समाजवाद व साम्यवाद वा कम्यूनिझम हे ध्येयवाद सामाजिक जीवनाचे  उच्च्तम नैतिक ध्येयवाद आहेत. त्याकडे पीडित व त्रस्त माणसे आकर्षित होतात. आदर्शवादी विचारवंतही त्याने मोहित होतात. ही मोहिनी उदात्त व पवित्र आहे. विदयमान विज्ञाने सर्व मानवांच्या हितार्थ वापरली, तर जगातील दारिद्रय व दैन्य यांचा संपूर्ण अंत त्वरित होईल. हे सत्य आहे परंतु ह्या समृद्धीच्या ध्येयाकडे, समतेच्या क्रांतीकडे मानवसमाज जाईल की नाही, याचे गणित मात्र मांडता येत नाही ’ .

समाजवादाचे विविध प्रकार – उपप्रकार आणि कार्ल मार्क्सचा वैज्ञानिक समाजवाद, या सर्वांचा तात्त्विकदृष्टय विचार केला असता, विदयमान परिस्थितीत लोकशाही समाजवाद ही संकल्पना बरीच रूजली असून, तिचा स्वीकार सकृद्दर्शनी अनेक देशांनी केला आहे. उत्पादनसाधनांच्या व विनिमयाच्या सामाजिक मालकीतून आणि नियंत्रणातून जनसामान्यांच्या सामाजिक, आर्थिक न्यायासाठी लोकशाही घटनात्मक मार्गाने समाज संघटित करणारा सिद्धान्त व चळवळ म्हणजे लोकशाही समाजवाद होय, अशी व्याख्या इंग्लंडमधील समाजवादयांनी केली आहे. या समाजवादात न्याय, समता, समाजहित, सनदशीर मार्ग, सहकार्य आदी बाबींवर भर दिलेला दिसून येतो. लोकशाही मार्गाने समाजवाद आणण्यासाठी निवडणुका, संसद, शासनयंत्रणा इ. साधनांचा उपयोग करून समता व व्यक्तिस्वातंत्र्य या दोन्हींचा समन्वय साधण्याचा मार्ग सांगितलेला आहे. नफ्यावर आधारलेल्या व्यक्तिवादाला विरोध, खाजगी उत्पादनक्षेत्रावर नियंत्रण, मूलभूत हक्कांची जपणूक, समानतेचे तत्त्व, लोकशाहीचा पाया व्यापक करणे इ. मूलभूत तत्त्वांवर लोकशाही समाजवादी विचारप्रणाली उभी आहे. नवीन समाजरचना निर्माण करण्यासाठी लोकांची सदसद्विवेकबुद्धी जागृत करावी व त्यासाठी शिक्षण, चर्चा, विचार परिवर्तन या लोकशाही मार्गांचा अवलंब करावा, असे फेबिअन समाजवादी मानतात. संप, बहिष्कार, निरोधन यांसारखे मार्ग अंगीकारावेत असे व्यवसाय संघवादी मानतात, तर स्वयंशासनाची पात्रता असलेल्या कामगारांमुळे खरीखुरी समाजवादी व्यवस्था निर्माण करता येईल, असे श्रेणिसमाजवादी मानतात. लोकशाही समाजवादाच्या या विविध प्रकारांचा उदय व विकास देशकालपरिस्थितीनुसार निरनिराळ्या देशांमध्ये झालेला दिसतो. लोकशाही समाजवादात नैतिक मूल्यांना उच्च् स्थान असून कामगारवर्गाप्रमाणेच मध्यमवर्गाला सहभागी करून घेतले जाते शिवाय खाजगी संपत्तीवर कायदेशीर नियंत्रण ठेवले जाते. उदयोगधंद्यांचे राष्ट्नीयी-करणही केले जाते. लोकशाही समाजवादी हे समाजवादाच्या मूळ आदर्शांचा पुरस्कार करतात. त्यांच्या मते परिवर्तनाची प्रकिया ही अहिंसक मार्गाने, लोकशाही पद्धतीने आणि मंद गतीने चालू ठेवण्यात यावी. अर्थव्यवस्थे-  वर सार्वजनिक क्षेत्राचे नियंत्रण असावे. उत्पादनाच्या साधनांचे हळूहळू    सामाजिकीकरण करण्यात यावे.


भारतामध्ये लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसां-तर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पुढे १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर या समाजवादयांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली मात्र त्यात पुढे एकजुट राहिली नाही आणि १९७७ मध्ये समाजवादी पक्ष तत्कालीन जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर त्यांना फारसे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ( कार. १९४७ -६४) यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा व विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणे, हे काँगेसचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्ती-व्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो.

विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. कम्यूनिस्ट पक्ष-शासित साम्यवादी राजवटी, पश्चिम यूरोपातील कल्याणकारी राज्याची उत्तम प्रकारे अंमलात आणून जनतेला मोठया प्रमाणात सामाजिक सुरक्षा पुरविणाऱ्या लोकशाही समाजवादी राजवटी, भारतातील गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत राज्य ⇨ समाजवादास नकार देत जनतेच्या सहभागावर व विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत कारण समाजवादाने विविध देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचे स्वप्न दिले आहे.

पहा : अराज्यवाद आदर्शवाद उदारमतवाद औदयोगिक क्रांती फेबिअन समाजवाद भांडवलशाही मार्क्सवाद लोकशाही लोकशाही समाजवाद  साम्यवाद.

संदर्भ : 1. Cole, G. D. H. A History of Socialist Thought, 5 Vols, New York, 1953–60.

          2. Howe, Irving, Ed. Essential Works of Socialism, London, 1986.

          3. Laidler, Harry W. History of Socialism, London, 1968.

          4. Mehta, Asoka, Studies in Asian Socialism, Bombay, 1959.

          5. Outhwaite, William Bottomore, Tom, ED. The Backwell dictionary of Twentieth Century           Social Thought., New York, 1993.

          6. Pai, M. R. ED. Socialism in  India, Bombay, 1967.

          7. Scharpf, Fritz U. Crisis and Choice in  European  Social  democracy,  New York,  991. 

         8. Schumpeter, Joseph, CapitalismSocialism  and  democracy, London,  1987. 

         9.  Selucky,  Radoslav, Marxism, Socialism, Freedom, 1979.

      १०. गर्गे, स. मा. अनु. समाजवादी समाजरचना, पुणे, १९५६.

        ११. लिमये, माधव, अनु. समाजवादाचे भवितव्य, मुंबई, १९७८.

देशपांडे, सु. र.