विजयालक्ष्मी पंडितपंडित, विजयालक्ष्मी : (१८ ऑगस्ट १९००– ). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आशियाई अध्यक्षा. त्यांचा जन्म सधन नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव स्वरूपकुमारी. वडील मोतीलालजी यांचा पाश्चात्य विचारांकडील कल व आई स्वरूपराणी यांची भारतीय संस्कृतीवरील निष्ठा यांच्या संमिश्र वातावरणात त्यांचे बालपण गेले. इंग्रजी अध्यापकांद्वारे घरीच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.  काही काळ पुढील शिक्षणासाठी त्या स्वित्झर्लंडमध्ये होत्या. मोतीलाल व बंधू जवहरलाल हे रा ज का र णा त असल्यामुळे घरीच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. त्यांचा विवाह रणजित सीताराम पंडीत या मूळच्या महाराष्ट्रीय बॅरिस्टर बरोबर झाला (१९२१). रणजित पंडीत हे एक विद्वान व प्रसिद्ध वकील होते आणि नेहरू कुटुंबाशी संबंध आल्यानंतर ते राष्ट्रीय लढ्यात ओढले गेले . त्यांनी लग्‍नानंतर प्रथम कलकत्त्यास व पुढे अलाहाबाद येथे वकिली केली. त्यांनी मुद्राराक्षस, ऋतुसंहारराजतरंगिणी या सस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले. त्यांना चंद्रलेखा, नयनतारा आणि ऋतुविलासा या तीन मुली झाल्या. त्यांपैकी नयनतारा सहगल लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.

विजयलक्ष्मींच्या राजकीय जीवनास असहकाराच्या चळवळीपासून सुरुवात झाली. या चळवळीत त्या सहभागी झाल्या व त्यांना एक वर्षाचा कारावास भोगावा लागला. त्या अलाहाबाद नगरपालिकेत निवडून आल्या (१९३४). त्यानंतर त्यांची त्यावेळच्या संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली (१९३६) आणि लवकरच त्या स्थानिक स्वराज्य व आरोग्य खाते यांच्या पहिल्या महिलामंत्री झाल्या (१९३७) परंतु १९३९ मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. यानंतर ‘छोडो भारत’ या आंदोलनास प्रारंभ झाला व त्यात त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली (१९४२). नादुरुस्त प्रकृतीच्या कारणाने त्यांची नऊ महिन्यानंतर सुटका करण्यात आली. या परिस्थितीतही १९४३ मध्ये त्यांनी बंगाल दुष्काळ निवारण्याच्या कार्यात भाग घेतला. १९४४ साली रणजित पंडितांचे दम्याच्या विकाराने निधन झाले. हा आघात फार मोठा होता परिणामतः पुढील दोन वर्षे त्यांनी अमेरिकेत व्याख्यान दौरा काढला (१९४४–४६). भारतात परत आल्यानंतर पुन्हा त्यांनी स्थानिक स्वराज्य व आरोग्य खाते यांचे मंत्रिपद अंगीकारले. तत्पूर्वी १९४०–४२ मध्ये त्यांना अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होण्याचा मान मिळाला होता. १९४६ मध्ये त्यांची संविधान समितीच्या सदस्या आणि संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी मंडळाच्या नेत्या म्हणून निवड झाली. स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांनी १९४७, १९४८, १९५२, १९५३ व १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्रांत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९५३ मध्ये त्यांची आमसभेची अध्यक्षा म्हणून निवड झाली. रशिया (१९४९), अमेरिका (१९५१), ग्रेट ब्रिटन (१९५४–६२) इ. विविध देशांत भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल होत्या (१९६२–६३). जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर फूलपूर मतदार संघातून त्या लोकसभेवर निवडून आल्या (१९६४). १९६७ च्या निवडणुकीतही त्या लोकसभेवर निवडून आल्या, मात्र त्यांनतर खासदारकीचा राजीनामा देऊन समाजकार्यास त्यांनी वाहून घेतले (१९६८). १९७७ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेऊन आणीबाणीवर कडक टीका केली तथापि कोणतेही राजकीय पद स्वीकारले नाही.

अनेक भारतीय आणि विदेशी विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला. त्या संसदपटू व वक्त्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्फुटलेखन तसेच ग्रंथलेखन केले आहे. त्यांचा ‘फॅमिली बाँड’ हा ए स्टडी ऑफ नेहरू या पुस्तकातील लेख उल्लेखनीय आहे. सो आय बिकेम ए मिनिस्टर (१९३९), प्रिझन डेज (१९४६), द रोल ऑफ विमेन इन मॉडर्न वर्ल्ड (१९५७) व द इव्होल्यूशन ऑफ इंडिया (१९५८) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

संदर्भ : 1. Andrews, R. H. A Lamp for India : The story of Madame Pandit, New York, 1967.

    2. Brittain, Vera, Envoy Extraordinary, London, 1965.

    3. Guthric, Anne, Madame Ambassador : The Life of Vijaya Lakshmi Pandit, London, 1962.

देशपांडे, सु. र.