म्यूनिक करार : जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व इटली या देशांमध्ये म्यूनिक येथे दुसऱ्या महायुद्धापूर्वी २९–३० सप्टेंबर १९३८ रोजी झालेला प्रसिद्ध करार. जर्मनीत नाझी पक्षाचे वर्चस्व वाढून हिटलर सर्वसत्ताधीश झाल्यानंतर जर्मन बहुसंख्य असलेला प्रदेश जर्मनीत विलीन व्हावा, असा त्याचा दावा होता. म्हणून चेकोस्लोव्हाकियातील सूडेटन या भूप्रदेशावर त्याने जर्मनीचा हक्क सांगितला आणि तो न मिळाल्यास त्याने संघर्षाची तयारी दर्शविली. जागतिक विशेषतः यूरोपीय शांततेला असलेला हा धोका टाळावा, म्हणून ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान आर्थर नेव्हिल चेंबरलिन, फ्रान्सचा पंतप्रधान एद्‌वार दलादिये, इटलीचा पंतप्रधान बेनितो मुसोलिनी आणि जर्मनीचा चॅन्सेलर ॲडॉल्फ हिटलर यांमध्ये म्यूनिक शहरी वाटाघाटी होऊन हा करार झाला (३० सप्टेंबर १९३८). या करारान्वये चेकोस्लोव्हाकियास आपला एक तृतीयांश देश आणि त्याचबरोबर आपली बहुतेक महत्त्वाची औद्योगिक केंद्रे व संरक्षक किल्लेकोट गमवावे लागणार होते. सर्व जर्मनांना एकछत्राखाली आणण्याची प्रतिज्ञा सूडेटन भूप्रदेश मिळाल्यावर पुरी होईल व यूरोपच्या बाबतीत आपणास प्रादेशिक आकांक्षा उरणार नाही, या हिटलरच्या आश्वासनावर विसंबून हा करार रशिया वगळता चार बड्या राष्ट्रांनी मान्य केला व एका कर्तबगार, हिम्मतवान छोट्या राष्ट्राचा बळी दिला. चेंबरलिन इंग्लंडला परतल्यावर ‘आता यूरोपात शांतता भंग पावणार नाही’, अशी त्याने घोषणा केली. इंग्लंड-फ्रान्स या दोन देशांत युद्धास आवश्यक ती लष्करी तयारी नव्हती, म्हणून त्यांनी बचावात्मक भूमिका स्वीकारून या करारास संमती दर्शविली, अशीही टीका काहींनी केली आहे.

एक वर्षाचे आतच हिटलरने मार्च १९३९ मध्ये सर्व चेकोस्लोव्हाकिया पादाक्रांत केला आणि दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. यामुळे म्यूनिक करार हे लाचार, निष्फळ शरणागतीचे एक प्रतीक होऊन बसले. इतिहासात हा युगप्रवर्तक टप्पा ठरला. रशियाला डावलल्याने त्याने पाश्चात्य राष्ट्रांशी असलेले सहकाराचे धोरण बदलेले. हिटलरचा आत्मविश्वास वाढून तो महायुद्धास प्रवृत्त झाला.

पहा : महायुद्ध, दुसरे.

संदर्भः 1. Fleming, D. F. The Cold War Its Origins, Toronto, 1961.

            2. Foreign and Commonwealth office, Documents on British foreign policy, 3rd series Vol.2, 1972.

शहाणे, मो. ज्ञा.