रॅल्फ

बंच, रॅल्फ जॉन्सन : (७ ऑगस्ट १९०४-९ डिसेंबर १९७१). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अमेरिकन राजनीतिज्ञ व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा पहिला निग्रो मानकरी. एका सामान्य नाभिक कुटुंबात डिट्रॉइट (मिशिगन) येथे जन्म. बालपणीच त्याचे आईवडील वारले. रॅल्फ व त्याची बहीण यांचा सांभाळ त्याच्या आजीने केला. विद्यार्थीदशेत हरतऱ्हेची कामे करून त्याने शिक्षण पुरे केले. पुढे शिष्यवृत्ती मिळवून तो कॅलिफोर्नियातील (लॉस अँजेल्स) विद्यापीठातून पदवीधर (१९२७) व नंतर एम्.ए पीएच्.डी. (१९३४) झाला. त्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठात त्याने काम केले (१९२८-१९४२). १९३० साली रूथ हॅरिस या आपल्या विद्यार्थिनीबरोबर त्याने विवाह केला. १९५० मध्ये राज्यशास्त्र विद्याशाखेचा अध्यक्ष म्हणून हार्व्हर्ड विद्यापीठात त्याची नियुक्ती झाली परंतु संयुक्त राष्ट्रांतील कामामुळे त्याने १९५२ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशनमध्ये असताना स्वीडिश समाजशास्त्रज्ञ कार्ल गन्नार मीर्दाल याला अमेरिकेतील वंशभेदाच्या समस्येवरील संशोधन कार्यात मुख्य मदतनीस म्हणून बंचने मोलाचे साह्य केले. (१९३८-४०). या संशोधनावर आधारलेले मीर्दालचे ॲन अमेरिकन डिलेम्मा (१९४४) हे पुस्तक मार्गदर्शक आहे.

बंच १९४४ मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात अधिकारी होता. संयुक्त राष्ट्रांची सनद करण्यासाठी डंबार्टन ओक्स व सॅनफ्रॅन्सिस्को येथील परिषदांत त्याने भाग घेतला. १९४७ मध्ये त्र्यूग्व्हे ली याच्या विनंतीवरून तो संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयात विश्वस्त विभागाचा संचालक झाला. तेथे अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांत त्याच्याकडे महत्त्वाची कामगिरी सोपविण्यात आली. संयुक्त राष्ट्रांतर्फे पॅलेस्टाइनच्या फाळणीसंबंधी त्याने मध्यस्थी केली. त्याच्या योजनेनुसार १९४८-४९ मध्ये अरब राष्ट्रे व इझ्राएल यांच्यात अप्रत्यक्षरीत्या बोलणी होऊन शांतता तह झाला. या कामगिरीबद्दल त्याला १९५० चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस डाग हामारशल्ड याचा मदतनीस म्हणून त्याने काम केले. १९५६ मध्ये ईजिप्त-इझ्राएल संघर्षाचे वेळी आणि संयुक्त राष्ट्रांतर्फे बेल्जियम काँगोत सुव्यवस्था व शांतता स्थापण्यासाठी १९६० मध्ये जे शांतता पथक पाठविण्यात आले, ते संघटित करण्यात बंचने विशेष प्रतिनिधी या नात्याने महत्त्वाचे कार्य केले. पुढे त्याची अवर सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९६४ मध्ये सायप्रसमध्ये असेच शांतता पथक पाठविण्यात त्याने ऊ थांट यांना साह्य केले. त्याला अनेक मान-सन्मान मिळाले. त्याच्या कार्याबद्दल अध्यक्ष जॉन केनेडी यांनी त्यास स्वातंत्र्य-पदक दिले होते (१९६३). त्याचे वर्ल्ड व्ह्यू ऑफ रेस (१९३६) हे पुस्तक खूप गाजले. बंचला अमेरिकन समाजातील वर्णभेद मान्य नव्हता. यासाठी नागरी हक्क मोहिमेत त्याने सक्रिय भागही घेतला (१९६५). १९७० मध्ये त्याने आपल्या पदाचा प्रकृती अस्वास्थ्यनिमित्त राजीनामा दिला. न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Boyd, J. M. United Nations Peace-Keeping Operations : a Military and Political Appraisal, New York, 1971.

2. young, M. B. The Picture Life of Ralph J. Bunche, London, 1968.

देशपांडे, सु. र.