सत्ता समतोल : (बॅलन्स् ऑफ पॉवर). आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक राष्ट्र किंवा राष्ट्रांचा समूह दुसऱ्या एखादया राष्ट्रापासून अथवा राष्ट्रांच्या समूहापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपली शक्ती, दुसऱ्या बाजूच्या तोडीस तोड राहण्यासाठी जे धोरण अवलंबिते, त्याला सत्तासमतोल असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करताना सत्तासमतोलाची संकल्पना अभ्यासली जाते. अशा प्रकारची सत्तासमतोलाची परिस्थिती टिकवून तिच्याव्दारे आपले हित साधण्यासाठी विविध देश सत्तासमतोलाचे धोरण राबवीत असतात. म्हणजेच सत्तासमतोल ही आंतरराष्ट्रीय संबंधांची प्रत्यक्ष वा वांच्छित अवस्था आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांच्या परराष्ट्र धोरणांचा तो एक घटकही असू शकतो. एखादया सामर्थ्यशाली देशाने प्रस्थापित सत्तासंबंधांवर परिणाम होईल, असे धोरण राबविण्याचा प्रयत्न केल्यास, अन्य सामर्थ्यशाली देश त्याला प्रतिशह देऊन आहे ती स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात हे सत्तासमतोलाचे धोरण होय.

सत्तासमतोल ही संकल्पना मुख्यत: यूरोपीय देशांतील सत्तासंबंधांतून उदयास आली. साधारणत: एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंत यूरोपातील सर्व देश जागतिक शांतता टिकविण्यासाठी अशा धोरणाचा पुरस्कार करीत होते. या काळात ही सत्तासमतोलाची व्यवस्था लवचिक व स्थिर राहण्यासाठी ब्रिटनने बजावलेली संतुलकाची (बॅलन्सर) भूमिका महत्त्वाची होती.

विसाव्या शतकात जागतिक सत्तासमतोलाच्या रचनेत मोठया प्रमाणात बदल घडून आले. यामुळे यूरोपात प्रस्थापित झालेली सत्तासमतोलाची संरचना उध्वस्त झाली. विसाव्या शतकाच्या आधी जगात सत्तासमतोलाच्या अनेक स्वतंत्र व अलग अशा व्यवस्था अस्तित्वात होत्या तथापि विसाव्या शतकाच्या आरंभी झालेल्या पहिल्या महायुद्धामुळे राजकीय समीकरणे बदलून जगातल्या बहुसंख्य राष्ट्रांचे एकाच सत्तासमतोलाच्या व्यवस्थेत सामिलीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे सामिलीकरण पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया व अमेरिका यांची जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याविरूद्ध जी युती झाली, तिथून सुरू झाले. तसेच दुसऱ्या महायुद्धापर्यंतही ही प्रक्रिया सुरूच राहिली. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस सत्तासमतोलाच्या संरचनेतील परंपरेने प्रस्थापित झालेल्या पश्चिम आणि मध्य यूरोपातील राष्ट्रांचा प्रभाव होऊन अ-यूरोपीय अशा दोनच राष्ट्रांचा प्रभाव या संरचनेमध्ये राहिला. ती राष्ट्रे म्हणजे सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने होय. अमेरिका व पश्चिम यूरोपीय राष्ट्रांमधील ‘नाटो ’ हा लष्करी करार आणि सोव्हिएट युनियनच्या नेतृत्वाखालील ‘ वॉर्सा करार ’ ही या सत्तासमतोलाचीच अपत्ये होत.

पुढे चीनने सोव्हिएट रशियाच्या प्रभावापासून फारकत घेऊन, त्या राष्ट्राविरूद्ध पवित्रा घेतल्याने सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्यामधील व्दिधुवीय सत्तासमतोलाची स्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली. १९९१ मध्ये सोव्हिएट युनियनचे विघटन झाल्यानंतर यूरोपीय सत्ता समतोलाची संकल्पना तात्पुरती तरी असंबद्ध ठरली कारण विघटनानंतर एका नव्या रूपात अस्तित्वात आलेल्या सार्वभौम रशियाने सुरूवातीला पश्र्चिम यूरोप आणि अमेरिका यांच्या आर्थिक आणि राजकीय कल्पनांचा स्वीकार केला.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तिसऱ्या जगाच्या उदयामुळे पूर्वीइतके सत्तासमतोलाला महत्त्व उरले नाही आणि हे तत्त्व कालबाह्य झाल्याची टीका होऊ लागली. कारण तिसऱ्या जगातील बहुतांश राष्ट्रांनी या दोन महासत्तांच्या कह्यात जाण्याऐवजी आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततावादी धोरण पसंत केले परंतु महासत्तांमधील स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, लष्करी आघाड्यांची निर्मिती ह्या मार्गांनी सत्तासमतोलाचे धोरणच राबविले जाते, असाही दावा केला जातो.

तात्त्विकदृष्टया सत्तासमतोल या संकल्पनेचा उदय जागतिक शांतता टिकविण्यासाठी झाला असला, तरी सत्तासमतोलाच्या राजकारणात लहान आणि दुर्बल देशांपेक्षा सामर्थ्यशाली देशांचीच भूमिका निर्णायक असते आणि ह्या राजकारणाचा लाभही त्यांनाच होतो. जागतिक शांतता टिकविण्याचा कायमस्वरूपाचा किंवा खात्रीशीर मार्ग म्हणून सत्तासमतोलाचे तत्त्व फारसे यशस्वी झाल्याचे दिसत नाही.

संदर्भ : 1. Bowle, John, Western Political Thought, New York, 1961.

2. Morgenthou, Hans J. Politics among Nations the Struggle For Power and Peace, New York, 1963.

3. Prakash, Chandra, International Relations, New Delhi, 1983.

केंद्रे, किरण