ऊ थांट

थांट, ऊ : (२२ जानेवारी १९०९–२५ नोव्हेंबर १९७४). संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचे तिसरे महासचिव व ब्रह्मदेशाचे एक थोर राजकीय विचारवंत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील पान्टानॉ (माऊबिन जिल्हा) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ऊ पो निट व आईचे नान थाँग. नॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे त्यांनी रंगून विद्यापीठातून पदवी घेतली (१९२९) आणि नॅशनल स्कूलमध्येच ते शिक्षक व पुढे मुख्याध्यापक झाले. या वेळी ऊ नूंशी त्यांची मैत्री जमली. त्यांच्या प्रशासकीय जीवनास १९४३ पासून प्रारंभ झाला. प्रथम ते दुसऱ्या महायुद्धात जपान्यांना विरोध करणारे एक भूमिगत कार्यकर्ते म्हणून प्रसिद्धीस आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्याध्यापकाची नोकरी पतकरली (१९४३–४७). शिक्षण समितीचे सचिव, वृत्त संचालक, नभोवाणी खात्याचे संचालक, माहिती खात्याचे सचिव, पंतप्रधानांचे सचिव इ. विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांची प्रशासकीय हातोटी पाहून ऊ नूंनी १९५२ मध्ये महासभेच्या अधिवेशनास पाठविलेल्या शिष्टमंडळात त्यांची निवड केली. ब्रह्मदेशाचे संयुक्त राष्ट्रांतील कायमचे प्रतिनिधी म्हणून १९५७–६१ त्यांनी काम केले. ह्या काळात त्यांच्याकडे ब्रह्मी शिष्टमंडळाचे अध्यक्षपदही होते. अल्जीरियासाठी नेमलेल्या आफ्रो–आशियाई स्थायी समितीचे ते १९५७ मध्ये अध्यक्ष होते. आमसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची १९५९ मध्ये निवड झाली. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या विकासनिधीचे व काँगोच्या समझोता आयोगाचे ते १९६१ मध्ये अध्यक्ष होते. हामारशल्ड यांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रथम हंगामी महासचिव म्हणून (१९६१-६२) काम केले. पुढे महासचिव म्हणून त्यांची एकमताने ३० नोव्हेंबर १९६२ मध्ये निवड झाली व १९६६ मध्ये फेरनिवड झाली. त्यांच्या कारकीर्दीत काँगो–क्यूबा प्रकरणे, भारत–पाकिस्तान संघर्ष, अरब–इझ्राएल युद्ध व व्हिएटनाम यांसारख्या प्रश्नांमध्ये त्यांना लक्ष घालावे लागले. संयुक्त राष्ट्रे ही संघटना अधिक प्रभावी व आर्थिक दृष्ट्या बळकट कशी होईल यासाठी ते नेहमी प्रयत्‍नशील होते. शांततेसाठी ते अहर्निश झगडत. त्यांनी अनेक स्फुट लेख व काही पुस्तके लिहिली त्यांपैकी ब्रह्मीतून त्यांनी ब्रह्मदेशाचा दुसऱ्या महायुद्धानंतरचा इतिहास (३ खंड, १९६१), शहरांचा इतिहास (१९३०), राष्ट्रसंघ, ब्रह्मी शिक्षणपद्धती वगैरे स्वरूपाचे ग्रंथ लिहिले. त्यांचीं भाषणे टोअर्ड वर्ल्ड पीस (१९६४) या नावाने प्रसिद्ध झाली. ते न्यूयॉर्क येथे मरण पावले. भारत सरकारने त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्कार देऊन त्यांच्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा यथोचित गौरव केला (१९६५). ते निष्ठावान बौद्ध होते. त्यांची वृत्ती अहिंसावादी व कृती शांततावादी तडजोडीची होती.

संदर्भ: Bingham, June, U Thant : The Search for Peace, New York, 1966.

देशपांडे, सु. र.