देव, शंकरराव दत्तात्रेय : (२८ जानेवारी १८९५–३० डिसेंबर १९७४). महाराष्ट्रातील एक थोर काँग्रेस कार्यकर्ते, गांधीवादी व सर्वोदय नेते. शंकररावांचा जन्म भोर (जि. पुणे) येथे झाला. त्यांचे मूळगाव बावधन (ता. वाई, जि. सातारा). तेथे त्यांचे आजोबा शेती करीत. त्यांचे वडील दत्तोपंत हे पुण्याला आचाऱ्याचा धंदा करीत असत. आई गंगूबाई, शंकरराव अडीच वर्षांचे असताना वारल्या. शंकररावांचे प्राथमिक शिक्षण भोर येथे त्यांच्या आईच्या काकूने केले. पुढे बावधन येथे शिक्षण घेतल्यावर चुलत्यांनी १९०६ मध्ये शिक्षणासाठी त्यांना पुण्यास नेले. पुणे, बडोदे, मुंबई येथे शिक्षण घेऊन ते बी. ए. झाले (१९१८). त्यानंतर त्यांनी एल्एल्. बी. होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या काळात त्यांचा विनोबा भावे, न. वि. गाडगीळ, छगनलाल जोशी वगैरेंशी निकटचा संबंध आला. पुढे ते म. गांधीच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले. तत्पूर्वी ते चंपारण्यात म. गांधींनी खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ चालविली असता तेथे गेले. म. गांधींचा व त्यांचा परिचय गंगाधरराव देशपांडे यांच्या मध्यस्थीने मणिभवनमध्ये झाला. १९२० पासून ते पुण्यास लोकसंग्रह दैनिकात उपसंपादक म्हणून काम करू लागले. सेनापती बापटांसमवेत पुण्याजवळील मुळशी सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला (१९२३). त्याकरिता त्यांना तुरुंगवास व फटक्यांची शिक्षा भोगावी लागली. पुढे त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दलही त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यांनी आपल्या संघटनचातुर्याने व ओजस्वी वक्तृत्वाने सारा महाराष्ट्र जागृत केला. महाराष्ट्रात प्रांतिक काँग्रेस समिती सुरू केली. ब्रिटिशांच्या फोडा व झोडा या धोरणासंबंधी स्वराज्यामधील त्यांनी लिहिलेल्या लेखांबाबत त्यांना पुन्हा दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले (१९३०). १९३६ मध्ये ते काँग्रेस कार्यकारिणीचे सभासद झाले. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. नंतर थोड्या दिवसांतच ते अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस झाले (१९४६–५०). १९४१ सालातील वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली. संविधान समितीचे सदस्य, हंगामी संसद सदस्य, काँग्रेसच्या निवडणूक मंडळाचे सदस्य, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष वगैरे विविध प्रकारची जबाबदारीची कामे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ते १९५० मध्ये हरले व त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून जवळजवळ संन्यास घेतला. पुढे ते आचार्य विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत सहभागी झाले. त्यांनी तमिळनाडू व केरळ या राज्यांत पदयात्रा काढली. ते राजकीय नेते असले, तरी त्यांची वृत्ती आध्यात्मिक होती. ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषदे यांचा सखोल व्यासंग त्यांनी केला होता. विनोबांच्या सर्व सेवासंघात असताना १९६२ च्या चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर ते महात्माजींच्या अहिंसा तत्त्वाप्रमाणे काही सरकाऱ्यांसोबत पीकिंग यात्रेसाठी निघाले. त्या वेळचा पूर्व पाकिस्तान. ब्रह्मदेश हे त्यांना प्रवेश देईनात. तथापि हिमालयाच्या पायथ्याशी त्यांनी पायी दीर्घ प्रवास केला. अखेर या प्रवासामुळे त्यांची प्रकृती ढासळली, ती अखेरपर्यंत सुधारली नाही. या आक्रमणापूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रभागी होते पण एका बाजूला काँग्रेस श्रेष्ठी व दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील जनता या दोहोंमध्ये त्यांना सुवर्णमध्य साधता येईना. महाराष्ट्रात दंगेधोपे सुरू झाले व चळवळीस हिंसक स्वरूप प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी उरळी कांचन येथे ३० दिवसांचे उपोषण केले.
त्यांनी सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला काढून तीतून उत्तम वैचारिक पुस्तके प्रसिद्ध केली. उपनिषत्सार व भगवान बुद्ध ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. याशिवाय गांधीजींच्या अनेक पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले. त्यांनी विपुल स्फुटलेखनही केले. नवभारत हे वैचारिक मासिक त्यांनी काढले (१९४७). त्याचे ते अनेक वर्षे संचालक होते (१९४७–५६). याशिवाय स्वराज्य साप्ताहिक (१९२५) व लोकशक्ती दैनिक (१९३८) ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. त्यांच्या प्रोत्साहनाने व त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे समाज प्रबोधन संस्था स्थापन झाली. त्या संस्थेतर्फे समाज प्रबोधन पत्रिका नावाचे द्वैमिसिक नियमित निघत असते. समाज प्रबोधनाच्या कार्यकर्त्यांनी १९७३ मध्ये शंकररावांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त भारतीय प्रबोधन नावाचा अभिनंदग्रंथ त्यांना अर्पण केला.
अखेरच्या दिवसांत शंकरराव सासवड येथील त्यांनी सुरू केलेल्या आश्रमात रहात होते. गांधीजी व काँग्रेस यांकरिता त्यांनी लक्षावधी रुपयांचा फंड गोळा केला. त्यांनी आजन्म ब्रह्मचर्यव्रत पाळले. महात्माजींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. ते आत्मचरित्र व संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यांवर लिहीत होते. यांपैकी त्यांचे आत्मचरित्र दैव देते पण कर्म नेते (संपा. प्रेमा कंटक, १९७६) त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले.
शेवटी त्यांची प्रकृती फारच बिघडली. उपचारांसाठी पुणे येथील जहांगीर नर्सिग होममध्ये त्यांना हलविण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झाले.
संदर्भ : कंटक, प्रेमा, सत्याग्रही महाराष्ट्र, सासवड, १९४०.
देशपांडे, सु. र.
“