हेग परिषदा : जागतिक शांतता आणि निःशस्त्रीकरण या उद्दिष्टांसाठी भरलेल्या दोन आंतरराष्ट्रीय परिषदा. या परिषदा नेदर्लंड्सच्या हेग (द हेग) या प्रशासकीय शहरात भरल्या होत्या. या सुमारास शांतता-वादी वातावरण निर्माण होत होते. त्याबरोबरच युद्धातील शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालू होती. त्या वेळी रशियाचा राजा दुसरा झार निकोलस याने १८९८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्याचे निश्चित करून अनेक देशांना निमंत्रणे धाडली पण तिचे अधिवेशन १८९९ मध्ये भरले. ही परिषद भरविण्याचा हेतू शस्त्रकपात करून शांतता प्रस्थापित करणे आणि शांततेच्या मार्गाने आंतरराष्ट्रीय तंटे मिटवणे, असा होता. या परिषदेत अमेरिका, आशिया व यूरोप खंडातील २६ राष्ट्रांनी भाग घेतला होता. तसेच प्रमुख मुत्सद्दीही हजर होते. मात्र या परिषदेत शस्त्रकपातीवर एकमत झाले नाही परंतु युद्धात काही शस्त्रांच्या वापरास बंदी घालण्याबाबत व आंतरराष्ट्रीय विधिसंहिता करण्याबाबत मतैक्य झाले. तसेच जमिनीवरील युद्धाचे नियम निश्चित केले गेले. १८६४ मध्ये जिनीव्हा येथे भरलेल्या जिनीव्हा युद्धसंकेत परिषदेने युद्धातील जखमी व रुग्ण यांसाठी केलेले नियम या परिषदेने नाविक युद्धाच्या बाबतीत स्वीकारले. युद्धात विषारी वायू व डमडम गोळ्या वापरू नयेत आणि फुग्यातून प्रक्षेपी (प्रोजेक्टाइल) शस्त्रांचा मारा करू नये, असे संकेत ठरविण्यात आले. 

 

दुसरी हेग शांतता परिषद १९०७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थीओडर रूझवेल्ट यांच्या प्रेरणेने भरली होती पण तिचे औपचारिक निमंत्रण अमेरिका, आशिया व यूरोप खंडांतील राष्ट्रांना झारने पाठविले होते. या परिषदेत ४४ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांपैकी एकोणीस केवळ अमेरिकेचे होते. या परिषदेत लॅटिन अमेरिकन राष्ट्रांनी प्रथमच भाग घेतला होता. शस्त्रकपातीसंबंधी ही परिषद काहीही प्रगती करू शकली नाही तथापि सुरुंग पेरणे, संरक्षित शहरांवर बाँबहल्ले करणे आणि बलाचा वापर करून परकीय कर्ज वसूल करणे, यांसंबंधी अनेक नियंत्रणे घालण्यात आली. युद्ध काळात तटस्थ राष्ट्रांचे हक्क काय असावेत, याविषयीनिश्चित धोरण ठरविण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय पारितोषिक, न्यायालयाची उभारणी आणि प्रत्यक्षात युद्ध सुरू करण्यापूर्वी ते जाहीर करण्यासंबंधी या परिषदेत एकमत झाले. कायम शांतता प्रस्थापित करण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून या परिषदांचे महत्त्व वादातीत आहे. या परिषदांनी घेतलेले निर्णय व मांडलेली तत्त्वे राष्ट्रसंघ व संयुक्तराष्टे्र या आंतरराष्ट्रीय संघटना उभारताना फार उपयोगी पडली.

पहा : निःशस्त्रीकरण. 

शिंदे, आ. ब.