बहिष्कार : बहिष्कार म्हणजे बाहेर घालविणे. एखाद्या व्यक्तीस, व्यक्तिसमूहास अथवा देशास त्याने एखादा नियम, रूढी किंवा दंडक मोडल्याबद्दल शिक्षा म्हणून किंवा त्याने तो नियम पाळावा म्हणून वाळीत टाकणे त्याच्याशी संपर्क तोडणे. समूहातील एखाद्यास समूहाबाहेर घालविणे, आधीच बाहेर असणाऱ्यास समूहात प्रवेश नाकारणे किंवा एखादी गोष्ट न स्वीकारणे. या संज्ञेस धार्मिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय पदर आहेत. इंग्रजीतील बायकॉट, एक्सकम्युनिरेशन किंवा ऑस्ट्रॅसिझम यांसाठी हा प्रतिशब्द म्हणून वापरण्यात येतो. १८८० मध्ये आयर्लंडमधील एक सारावसुली अधिकारी (लॅण्ड एजंट) कॅप्टन चार्लस याच्या जमिनीवरून कुळांना काढून टाकण्याचा निषेध म्हणून त्याच्या नोकरांनी त्याच्याशी असहकार पुकारला. त्यावरून ‘बायकॉट’ हा शब्द रूढ झाला. धर्मातून किंवा जातीतून बहिष्कृत करणे, म्हणजे एक्सकम्युनिकेशन होय. प्राचीन अथेन्स नगरात एखाद्या प्रमुख नागरिकास १० वर्षासाठी हद्दपार करण्यासाठी जे मतदान घेण्यात येई, त्यातील ‘मतपत्रिकेस’ (ऑस्ट्रॅक) अनुलक्षून ऑस्ट्रॅसिझम ही संज्ञा बनली.

 

बहिष्कार, धार्मिक व सामाजिक : एखाद्या जनसमूहाच्या विशिष्ट सभासदाने त्या जनसमूहाची शिस्त पाळली नाही, तर त्या स-भासदाला त्या जनसमूहातून बाहेर काढण्याचे कृत्य म्हणजे बहिष्कार वा वाळीत  टाकणे होय. बहिष्कृत व्यक्तीला सामाजाच्या बाकीच्या सभासदां-पासून अलग पाडणे आणि समाजाकडून मिळणाऱ्या लाभांपासून मिळ-णाऱ्या लाभांपासून तिला वंचित करणे, हे बहिष्कारामागाचे सर्वसामान्य तत्त्व असते. शारीरिक दंड, संपत्ती जप्त करणे. इ. शिक्षा आणि बहिष्कार यांमध्ये संकल्पनात्मक भेद आहे. शिक्षा झालेली व्यक्ती समाजापासून फारशी अलग पडलेली नसते पण बहिष्कृत व्यक्तीला मात्र एकाकीपणाचे तीव्र दुःख भोगावे लागते. मानवाचे समाजावलंबित्व सिद्ध करणारी आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रेरणांवर मर्यादा घालणारी अशी ही प्रथा आहे.

विवाहादी आचारांच्या बाबतीत आपल्या जातिजमातीचे वा धर्माने घालून दिलेल्या नियमांचा भंग करणे, आपल्या जातिजमातीबाहेरील व्यक्तीशी वा भ्रष्ट व्यक्तीशी संबंध ठेवणे, धर्मगुरूशी दुर्वर्तन करणे, नास्तिकता, पावित्र्य विडंबन, पाखंड, व्यभिचार, निषिद्ध पंथात प्रवेश इ. कारणांनी व्यक्तीला बहिष्कृत केले जाते. बहिष्कृत करण्याचा अधिकार धर्मगुरू, पुरोहित, जमातप्रमुख, पंचायत इत्यादींना असतो. बहिष्कृत व्यक्तीशी भोजनादी व्यवहार न करणे, तिला अस्पृश्य मानणे, इतरांनी केलेल्या विवाहादी समारंभांत भाग घेण्यास तिला मनाई करणे, तिच्याकडील समारंभात इतरांनी भाग न घेणे, नातेवाईकांनाही तिच्याशी संबंध तोडावयास लावणे इ. प्रकारे तिची कोंडी केली जाते. म्हणूनच बहिष्काराला ‘हुक्कापाणी बंद करणे’ असेही म्हणतात. आदिवासी लोक बहिष्कृताला युवागृहांत (घोटुल इत्यादींमध्ये) प्रवेश देत नाहीत. ख्रिस्ती धर्मात बहिष्कृताने पश्र्चात्ताप व्यक्त केला नसेल, तर त्याच्यावर ख्रिस्ती पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली जात नसे. एकंदरीत बहिष्कार हे जमातप्रमुख वगैरेंच्या हातातील व्यक्तीला शरण  आणू  शकणारे  व  त्यांचे  ऐहिक  हितसंबंध  जपणारे  असे एक  प्रभावी शस्त्र असून त्याचा अनेकदा दुरूपयोगी करण्यात आला आहे.

नियमभंग करणारी व्यक्ती भ्रष्ट मानली जाते. ही व्यक्ती भ्रष्टतेची वाहक असल्यामुळे म्हणजेच तिची भ्रष्टता संसर्गजन्य असल्यामुळे तिच्या सहवासाने बाकीचा समाज भ्रष्ट व संकटग्रस्त होऊ नये, म्हणून तिला बहिष्कृत केले जाते. अशा व्यक्तीला बहिष्कृत करणे म्हणजे बाकीच्या समाजाला शुद्ध ठेवून त्याचे रक्षण करणे होय. बहिष्कृत व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही बहिष्कृत केले जाते. अशा रीतीने बहिष्कार हा तत्त्वतः भ्रष्टतारोधक व समाजसंरक्षक असून व्यवहारतः मात्र तो व्यक्तीला दिलेली शिक्षाच होय. प्रायश्र्चित्तामुळे भ्रष्टता जाऊन शुद्धता येते अशी समजूत असल्यामुळे प्रायश्र्चित, पश्र्चात्ताप, दंड भरणे, जातीतील सर्वाना भोजन देणे, तीर्थयात्रा इ. मार्गानी बहिष्कृत व्यक्तीला पुन्हा समाजजीवनात प्रवेश मिळू शकतो. तात्पुरता व कायमचा आणि अंशिक व संपूर्ण असे बहिष्काराचे विविध प्रकार संभवतात. कोणता नियम मोडला, तो जाणून बुजून मोडला वा नाही, तो किती वेळा मोडला इत्यादींवरून बहिष्काराचा प्रकार व तीव्रता ठरत असे.

 

बहिष्कारामुळे नीतिमत्ता वाढते, नियमपालन घडते, कर्तव्याची जाणीव वाढते, समाज व धर्म यांचे रक्षण होते, व्यक्तीला सुधारण्याची संधी मिळते इ. प्रकारे बहिष्काराचे फायदे सांगितले जातात. याउलट बहिष्कार हा पाखंडी व्यक्तीला अधिक पाखंडी बनविणारा व धर्माविरूद्ध आहे, असे मानून त्याला विरोधही करण्यात आला आहे. विविध देशांतील समाजसुधारक व धर्मसुधारक यांनी बहिष्काराची पर्वा न करता समाज व धर्म सुधारणांचे महान कार्य केले आहे.

ग्रीक, रोमन व हिंदू लोकांत ही प्रथा होती. यहुदी लोकांत एक दिवसाचा, सात दिवसांचा व अनिश्र्चित कालाचा असे बहिष्काराचे तीन प्रकार होते. वारूक स्पिनोझा, उर्येल अशोस्ता इत्यादींना यहुदी धर्मगुरूंनी बहिष्कृत केले होते. युखॅरिस्टमधून वगळणे हे ख्रिस्ती बहिष्काराचे सर्वसामान्य स्वरूप होय. रोमन कॅथलिक चर्चने असह्य आणि सह्य असे बहिष्काराचे दोन प्रकार मानले आहेत. जर्मनीचा राजा चौथा हेन्री (१०५०-११०६), इंग्लंडचा राजा आठवा हेन्री (१४९१-१५४७), पहिला नेपोलियन (१७६९-१८२१), इटलीचा दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल (१८२०-७८) इत्यादींना बहिष्कृत करण्यात आले होते, प्रॉटेस्टंट चर्चनी सामान्यतः बहिष्काराची प्रथा सोडून दिली आहे. १९६२-६५ या काळातील दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर रोमन कॅथलिक चर्चमधील बहिष्काराचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. बहुसंख्य आदिम जमातींमध्ये बहिष्काराची प्रथा आहे. मध्ययुगात बहिष्कारामुळे व्यक्तीला नागरी हक्कही गमवावे लागत असत परंतु आधुनिक काळात तसे होत नसल्यामुळे बहिष्काराची तीव्रता कमी झाली आहे.


सर्वसाधारणपणे प्रचलित मूल्यांनुसार निषिद्ध कृत्यास प्रतिबंध म्हणून बहिष्कार हे शस्त्र वापरले जात असले, तरी संक्रमणावस्थेत जेव्हा समाजसुधारक बहिष्कृत होण्याचा धोका पतकरून या मूल्यांस आव्हान देऊ लागतात, तेव्हा हळूहळू त्या मूल्यांची प्रामाण्यता कमी होऊन सामाजिक बदल घडून येऊ लागतात. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांमुळे झालेले सामाजिक बदल, हे याचे प्रमुख उदाहरण होय.

बहिष्कार, राजकीय : भारतात १९०५ साली लॉर्ड जॉर्ज नाथॅन्येल कर्झनने बंगालची फाळणी केल्यावर त्या कृत्याचा निषेध म्हणून आणि ती रद्द ठरविण्यासाठी काँग्रेसमधील जहालमतवाद्यांनी विलायती मालावर बहिष्कार घालावा याचा आग्रह धरला. लोकमान्य टिळकांनी याचा आपल्या चतुःसूत्रीमध्ये अंतर्भाव केला. परदेशी मालामध्ये परदेशी कापडावर भर होता. त्यामुळे स्वराज्याच्या चळवळीत बहिष्काराच्या कार्यक्रमाचा परदेशी कापडाची होळी करणे, हाही एक भाग बनला. नंतर महात्मा गांधीनी त्याला व्यापक रूप दिले आणि आपल्या असहकाराच्या चळवळीत सामावून घेतले परंतु परदेशी कापडाची होळी करणे त्यांना मान्य नव्हते, सरकारी शिक्षणसंस्थांवर विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी, न्यायालयांवर वकिलांनी, विधिमंडळावर नेत्यांनी बहिष्कार घालावा, असे त्यांनी आवाहन केले. स्वातंत्र्योत्तर काळातही याचा राजकीय शस्त्र म्हणून वेळोवेळी उपयोग केल्याचे दिसून येते.

 

आंतरराष्ट्रीय राजकारणातही हा उपाय बराच रूढ झाल्याचे दिसून येते. ब्रिटिश सरकारने स्टँप अँक्ट (१७६५) हा कायदा मंजूर केल्यावर अमेरिकन वसाहतींतील लोकांनी त्याचा निषेध म्हणून ब्रिटिश मालावर बहिष्कार घातला तर अमेरिकेतील चिनी लोकांना दिल्या जाणाऱ्या अन्यायतकारक वागणुकीचा निषेध म्हणून चीनमधील लोकांनी अमेरिकन मालावर बहिष्कार घातला होता (१९०५). अरब लीगच्या सदस्यांनी इझ्राएलशी व्यापार करणाऱ्या सर्व कंपन्यांवर बहिष्कार घालावयाचे ठरविले होते (१९४८). राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्रे या दोन्ही संस्थांना आक्रमक राष्ट्रांविरूद्ध जी कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत त्यांत आर्थिक व राजनैतिक संबंध तोडून त्या देशास वाळीत टाकणे, हा प्रमुख अधिकार आहे. १९३५ साली इटलीविरूद्ध राष्ट्रसंघाने या शस्त्राचा वापर केला, तर युद्धोत्तर काळात साम्यवादी चीनविरूद्ध अमेरिका व दोस्त राष्ट्रांनी बराच काळ हे शस्त्र वापरले. दक्षिण र्होडेशिया या वसाहतीचा तेथील श्वेतवर्णियांनी कबजा घेतल्यावर त्यावर बहिष्कार घालण्याचे संयुक्त राष्ट्रांनी ठरविले. इझ्राएल आणि त्याला मदत करणाऱ्या देशांविरूद्ध तेलपुरवठा करण्याबाबत बहिष्कार घालण्याचे धोरण अरब राष्ट्रांनी १९७३ नंतर बऱ्याच अंशी परिणामकारकपणे वापरले आहे.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बहिष्काराचे उत्तम उदाहरण म्हणजे द. आफ्रिकेच्या वर्णभेदाच्या धोरणाचा निषेध म्हणून त्यावर आशियाई-आफ्रिकी देशांनी टाकलेला बहिष्कार. विशेषतः अमेरिकेत आर्थिक क्षेत्रात औद्योगित संघटना किंवा गिऱ्हाईक वा उपभोक्ते याचा वापर करताना दिसतात. थोड्या व्यापक अर्थाने कारखान्यांतील संप, निरोधन यांचाही समावेश या तंत्रात करता येईल.

बहिष्कृत व्यक्ती अथवा देश हा बहिष्कार घालणार्यांरवर किती प्रमाणात अवलंबून आहे त्याला (बहिष्कार घालणार्यांखच्या) नैतिक मूल्यांची किती चाड आहे आणि बहिष्कार किती प्रमाणात कार्यक्षम आहे, यांवर अर्थातच या उपायाची परिणामकारकता अवलंबून राहील.

साळुंखे, आ. ह. मोरखंडीकर, रा. शा.