अय्यर, सर सी. पी. रामस्वामी: (१२ नोव्हेंबर १८७९–२९ सप्‍टेंबर १९६६). विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेले एक श्रेष्ठ भारतीय पुढारी. मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेज व लॉ कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले व १९०३ मध्ये त्यांनी मद्रास येथेच वकिली सुरू केली. १९२० मध्ये त्यांनी मद्रास प्रांताचे महा-अधिव्यक्ता म्हणून काम केले.

सर सी. पी. रामस्वामी अय्यर

राजकीय क्षेत्रात त्यांनी अर्धशतकाहून अधिक काळपर्यंत कार्य केले. १९१७-१८ मध्ये भारतीय काँग्रेसचे ते कार्यवाह होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर १९२३ ते २८ पर्यंत मद्रास प्रांताचे कायदामंत्री म्हणून व १९३१, १९३२ व १९४२ ह्या साली गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांत सभासद ह्या नात्याने त्यांनी काम केले. तत्पूर्वी १९२६ व १९२७ मध्ये राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते.

संस्थानी प्रश्नांचे ते तज्ञ होते. कोचीन संस्थानातर्फे त्यांनी बटलरसमितीपुढे हिंदी संस्थानांची बाजू मांडली. नरेंद्र-मंडळाने नेमलेल्या समितीचे (१९३३) अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. काश्मीर संस्थानचे संविधानही त्यांनी तयार करून दिले (१९३४). त्रावणकोर संस्थानचे १९३६ ते ४७ ह्या काळात ते दिवाण होते. त्रावणकोरच्या महाराजांनी ‘सचिवोत्तम’ अशी पदवी देऊन त्यांचा त्या वेळी सन्मानही केला.

त्रावणकोर (१९३७), अन्नमलई (१९५३) व बनारस (१९५४–५६) ह्या विद्यापीठांचे ते उपकुलगुरू होते. विद्यापीठ-अनुदान-आयोगाचेही ते काही काळ सभासद होते.

ब्रिटिश सरकारने सी. आय. ई. (१९२३), के. सी. आय. ई. (१९२४) व के. सी. एस. आय. (१९४१) अशा पदव्या त्यांना बहाल केल्या होत्या. विविध विषयांवरील त्यांची व्याख्याने व लेख दोन खंडांत प्रसिद्ध करण्यात आले आहेत (१९४५). ते लंडन येथे मृत्यू पावले.

नरवणे, द. ना.