अशोकचक्र: भारताच्या राष्ट्रचिन्हावर व राष्ट्रध्वजावर असलेले चक्र. हे सारनाथ येथील उत्खननात सापडले. सारनाथ येथील वस्तुसंग्रहालयात ⇨अशोकस्तंभाचे अवशेष आहेत. त्या स्तंभावरील चार सिंहांच्या पायाखालील बैठकीच्या चित्रमालिकेत हत्ती, सिंह, घोडा व बैल असे प्राणी असून दोन प्राण्यांमध्ये चोवीस आरे असलेले एकेक चक्र आहे, त्यास ‘अशोकचक्र’ म्हणतात. हे चक्र, “सत्यधर्माचे व शांततामय परिवर्तनाचे प्रतीक” आहे, असे वर्णन भारतीय तत्त्वज्ञानी डॉ. राधाकृष्णन्‌ ह्यांनी केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी ह्या चक्रास ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक’ असे संबोधिले आहे.

नरवणे, द. ना.