मॅकमहोन रेषा : भारत आणि चीन यांच्या दरम्यानची वादग्रस्त उत्तरपूर्व सीमा. भूतानच्या पूर्वेकडील तवांग प्रदेशापासून ब्रह्मदेशाच्या सीमेवरील वालाँग प्रदेशापर्यंत सु. १,१५२ किमी. लांबीच्या सीमारेषेला मॅकमहोन रेषा  म्हटले जाते. सर ऑर्थर हेन्री मॅकमहोन (१८६२–१९४९) हे  ब्रिटिश सनदी अधिकारी होते. त्यांची बलुचिस्तानात महसूल आयुक्त म्हणून नेमणुक झाली (१९०१). तत्पूर्वी ड्युरँड मिशनबरोबर बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा निश्चित करण्यात त्यांनी भाग घेतला (१८९३). पुढे  परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी हिंदुस्थानात काम केले (१९११–१४). ऑक्टोबर १९१३ ते जुलै १९१४ दरम्यान सिमला येथे तिबेटी, चिनी आणि ब्रिटिश प्रतिनिधींची परिषद भरली होती. ह्या परिषदेमध्ये हिंदुस्थान आणि तिबेट यांच्या दरम्यान सीमारेषा ठरविण्यासाठी मुख्य ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून मॅकमहोन यांनी ही सीमा सुचविली आणि तिला तिबेटी प्रतिनिधींची मान्यता मिळविली. सदर सिमला परिषदेचा मुख्य हेतु चीन आणि तिबेट यांच्यातील वाद मिटविण्याचा होता.

त्यासाठी मॅकमहोन यांनी तिबेटचे इनर तिबेट (चीनच्या अधिपत्याखालील) आणि आउटर तिबेट (स्वतंत्र दलाई लामांच्या आधिपत्याखालील) असे दोन भाग सुचविले. दलाई लामांच्या आधिपत्याखालील तिबेटची त्यांनी जी दक्षिण सीमा सुचविली, तीच पुढे हिंदुस्थान आणि तिबेट यांची तसेच तिबेट आणि ब्रह्मदेश यांची सीमा बनली. ह्या ⇨ सिमला कराराला चिनी प्रतिनिधीने संमती दिली पण चीनच्या सरकारने संमती नाकारली.

हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आणि कम्युनिस्ट चीनने तिबेटवर आधिपत्य प्रस्थापित केल्यानंतर मॅकमहोन रेषा ही भारत आणि चीन यांच्यामधील सीमा बनली. १९१४ चा ब्रिटिश-तिबेटी समझोता हा दडपणाखाली आणि साम्राज्यवादी वर्चस्वाखाली झालेला आहे, असा युक्तिवाद करून लाल चीनने मॅकमहोन रेषा आंतरराष्ट्रीय सीमा मानण्यास नकार दिला. १९६२ च्या ⇨ भारत-चीन संघर्षास या रेषेबद्दलचा वाद कारणीभूत होता.

भूतानजवळ २७·४५ अक्षांशापाशी मॅकमहोन रेषा सुरू होते. ती उत्तरेकडे २९·२० अक्षांशापर्यंत जाऊन पुन्हा दक्षिणेकडे वळते आणि ब्रह्मदेशाजवळ २७·४० अक्षांशापाशी संपते. ९२ पू. रेखांश ते ९८·२५ पू. रेखांश पसरलेल्या मॅकमहोन रेषेमुळे बोमदिला, सेला, लाँगजू, तलोक पास या महत्त्वाच्या खिंडी भारताच्या नियंत्रणाखाली येतात. त्यामुळे संपूर्ण नेफा प्रदेशाचे आणि आसामचे संरक्षण करणे सुलभ जाते. खिंडी आणि डोंगररांगा यांच्यामुळे मॅकमहोन रेषा ही बव्हंशी नैसर्गिक सीमा बनली आहे. त्यामुळे मॅकमहोन रेषेविषयी भारत आणि चीन या दोघांनीही आग्रही भूमिका घेतलेली दिसते. अद्यापही ह्या सीमेबद्दल भारत आणि चीन ह्यांच्यात वाद असून भारत-चीन संबंध सुरळीत होण्यातील तो एक मुख्य अडथळा आहे.

संदर्भ : 1. Lamb, Alastair, The China India Border: The Origins of the Disputed Boundaries, London, 1964.

            2. Mehra, Parshotam, McMahonline and After, Delhi, 1974.

            3. Rao, G. N. The India-China Border: a Reappraisal, Bombay, 1968.

            4. Woodman, Dorothy, Himalayan Frontiers: a Political Review of British, Chinese, Indian and Russian Rivalries, London,1969. 

पळशीकर, सुहास