सिंह, सत्येंद्र प्रसन्न : (२४ मार्च १८६३ – ५ मार्च १९२८). भारतातील एक ख्यातनाम विधिज्ञ, नेमस्त राजकारणी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांचा जन्म बिहारमधील बीरभूम जिल्ह्यातील रायपूर या गावी सिथीकांता सिंह आणि मनमोहिनीदेवी या दांपत्यापोटी झाला. वडील सिथीकांता हे ईस्ट इंडिया कंपनीत सदर अमीन होते. सत्येंद्र यांचे प्रारंभीचे शिक्षण मित्र पाठशाळा (रायपूर) आणि बीरभूम शासकीय विद्यालयात झाले. ते मॅट्रिक (१८७७) आणि इंटरमीजिएट (१८७९) परीक्षा प्रेसिडेंसी कॉलेज कोलकाता (तत्कालीन कलकत्ता) येथून पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. पदवी घेण्यापूर्वीच ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले (१८८१) आणि लिंकन्स इनमधून बार ॲट लॉ झाले (१८८४). त्यांनी कोलकात्यात वकिलीस सुरुवात केली. तत्पूर्वी काही काळ त्यांनी कोलकात्याच्या सिटी कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यांना वकिली व्यवसायात प्रतिष्ठा, पैसा व लोकप्रियता लाभली. त्यामुळे त्यांची स्टॅन्डिंग काउन्सेल (स्थायी सल्लागार) या पदावर ब्रिटिश शासनाने नियुक्ती केली. त्यानंतर त्यांच्याकडे बंगालचे महाधिवक्तापद आले (१९०५). ते या पदावर नियुक्त झालेले पहिले भारतीय महाधिवक्ता होत. याच सुमारास बंगालची फाळणी झाली. या फाळणीचे विरोधक आणि ब्रिटिश अधिकारी हे दोन्हीही त्यांचे मित्र होते तथापि त्यांनी ब्रिटिश शासकीय धोरणावर टीका केली आणि असे निदर्शनास आणले की, या फाळणीमुळे शासनाविरुद्घची कटुता दीर्घकाळ टिकून राहील. पुढे त्यांची गव्हर्नर-जनरलच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली (१९०९). या ठिकाणीही ते पहिलेच भारतीय होत. लॉर्ड मिंटो या व्हाइसरॉयने त्यांच्या कामाविषयीचे समाधान सातवा एडवर्ड याला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. या मंडळात असताना त्यांनी वृत्तपत्रीय बिलाच्या संदर्भात मतभेद झाल्यामुळे राजीनामा दिला होता परंतु गव्हर्नरच्या विनंतीवरुन तो मागे घेतला.

त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांत जेम्स ब्राइस, फ्रेडरिक हॅरिसन, ॲनी बेझंट, विल्यम वेडरबर्न, रवींद्रनाथ टागोर इ. दिग्गज व्यक्ती होत्या. रवींद्रनाथ टागोरांमुळे ते ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाले. त्यांच्या मुलींची लग्ने ब्राह्मो कुटुंबांतील व्यक्तींशी झाली होती. ते प्रागतिक विचारसरणीचे असल्यामुळे त्यांचा जातीयवादाला विरोध होता, तद्वतच अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. स्त्रीस्वातंत्र्याचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. प्राथमिक व तांत्रिक शिक्षण सक्तीचे असावे, ह्या मताचे ते होते. कृषिक्षेत्रात यांत्रिक अवजारांचा उपयोग करुन त्यात सुधारणा व्हावी असे त्यांना वाटे.

सत्येंद्र हे तत्कालीन राजकारणात नेमस्त व मवाळ होते. संवैधानिक कार्यविधी पद्घतीवर त्यांचा अधिकतर विश्वास होता. त्यांना साम्राज्यांतर्गत स्वायत्तता अभिप्रेत होती मात्र ती सशस्त्र क्रांतीद्वारे हस्तगत करण्याऐवजी सामोपचाराने हळुहळू प्रगती करुन मिळवावी, या मताचे ते होते. ते एकदा म्हणाले होते की, ‘ब्रिटिशांची अधिसत्ता नसताना भारताची स्वराज्याची कल्पना ही संकल्पनाच कशीशी वाटते’. त्यांची ब्रिटिशांच्या सत्तेवर दृढ निष्ठा होती आणि ब्रिटिशांनी या देशात शांतता, सुरक्षितता, निःपक्षपाती प्रशासन आणि स्थिर शासन प्रस्थापित केले, असा त्यांचा समज होता. त्यांच्या मते भारतीयांना आपल्या देशावर राज्य करण्याचा हक्क आहे परंतु Reward of Loyalty म्हणून नव्हे.

सत्येंद्र हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे १८९६–१९१९ दरम्यान क्रियाशील सभासद होते. कोलकात्याच्या १८९६ च्या वार्षिक काँग्रेस अधिवेशनात त्यांनी अशी सूचना मांडली की, कोणत्याही भारतीय सत्ताधीशास/संस्थानिकास न्यायाधिकरणासमोर उघड चौकशी झाल्याशिवाय सत्ताभ्रष्ट करु नये. त्यांची इंडियन नॅशनल काँग्रेसच्या मुंबईच्या अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली (१९१५). या अधिवेशनात सु. ३६ ठराव संमत झाले. त्यांतून काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) आतापर्यंतच्या सर्व ठरावांचा सारांश समग्र रीत्या आलेला आढळतो. सत्येंद्र सिंह यांनी सुरुवातीच्या प्रतिक्रियात्मक अध्यक्षीय भाषणात, ‘भारत हे राष्ट्र अस्थिछेद झालेल्या रुग्णासारखे असून त्याच्या अवयवांचे कपचे निघाले आहेत’. त्यामुळे नवोदितांच्या आशा-आकांक्षांना उत्तेजित करण्याचे धोरण स्वीकारण्यावर भर देण्यात यावा. तसेच त्यांनी शासनाला असे आग्रहपूर्वक सांगितले की, भारतीय तरुणांना लष्करी प्रशिक्षणाच्या सवलती-सुविधा पुरवाव्यात, शिवाय कमिशन हुद्याच्या जागा खुल्या तत्त्वावर भराव्यात. मात्र सत्येंद्र यांनी काँग्रेसच्या एकूण कार्यपद्घतीत तसा फारसा रस घेतला नाही. ते पुढे अलिप्तच राहिले.

पहिले महायुद्घ सुरु झाले होते, तेव्हा ते इंग्लंडला भारतीय प्रतिनिधी म्हणून सेक्रेटरी ऑफ स्टेट यास इम्पिअरिअल परिषदेत मदतनीस म्हणून गेले. त्यांना स्थायी सभासद करण्यात आले (१९१८). पुढे त्यांना बॅरन करण्यात आले (१९१९). त्यांची अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदावर नियुक्ती झाली (१९१९). तेथून ते भारतात बिहार व ओरिसा या प्रांतांचे गव्हर्नर म्हणून आले (१९२०) परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले (१९२१). त्यांनी १९२५-२६ दरम्यान बेंगॉली या नियतकालिकाच्या संपादक मंडळावर काम केले. सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा सत्येंद्रांनी त्याचे स्वागत केले.

सत्येंद्रांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांना नाइटहुड (१९१४), प्रिव्ही काउन्सिलर (१९१९), के. सी. एस्. आय्. पदवी (१९२६) वगैरेंनी सन्मानित करण्यात आले. कृष्णचंद्र मित्र या महत-जमीनदाराच्या गोविंदमोहिनी या एकुलत्या एक कन्येशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना चार मुलगे व तीन कन्या होत्या. बेऱ्हमपूर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार ब्राह्मो पद्घतीच्या विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदर्भ : 1. Bhattacharya, Sachchidananda, A Dictionary of Indian History, Calcutta, 1967.

2. Pattabhi, Sitaramayya B. History of the Indian National Congress, Vol. I, New Delhi, 1969.

3. Sen, S. P. Ed. Dictionary of National Biography, Calcutta, 1974.

4. Zaidi, A. M. Ed. The Encyclopaedia of Indian National Congress, Vol. VI, 191115, New Delhi, 1998.

देशपांडे, सु. र.