पं. जवाहरलाल नेहरू

नेहरू, जवाहरलाल मोतीलाल : (१४ नोव्हेंबर १८८९–२७ मे १९६४). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील ⇨ मोतीलाल नेहरू एक नामांकित व राष्ट्रीय लढ्यातील एक ज्येष्ठ पुढारी होते. आपल्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी पैसा व प्रतिष्ठा मिळविली होती. जवाहरलालांची आई स्वरूपराणी धार्मिक वृत्तीची होती. आईकडून आणि मावशी बिबीअम्माकडून जवाहरलालादी मुलांना रामायणमहाभारतातील कथा आणि सदाचाराची शिकवण यांचा लाभ झाला. मोतीलाल यांना अनिष्ठ रूढी व धार्मिक बाबतीत फारशी आस्था नव्हती. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. त्यांपैकी फर्डिनांट टी ब्रुक्स या शिक्षकाने जवाहरलालांमध्ये विज्ञानाची व वाचनाची आवड निर्माण केली. शिवाय ब्रुक्स स्वतः थिऑसॉफिस्ट आणिॲनी बेंझट यांचे शिष्य होते. त्यामुळे जवाहरलाल यांच्या कोवळ्या मनावर काही काळ थिऑसॉफीचा प्रभाव होता. त्यांचे मन प्राचीन धर्मग्रंथांकडे आकृष्ट झाले. त्यांनी उपनिषदे, भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचे वाचन केले. पंडितजींचे एकूण बालपण काहीशा संमिश्र सांस्कृतिक वातावरणात पार पडले घरातील पश्चिमी वळणाची राहणी, आई व मावशी यांचे पारंपारिक संस्कार, उत्तर भारतीय उच्च वर्गांत टिकून राहिलेल्या खानदानी, मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आणि वडिलांकडून लाभलेला अनिष्ठ सामाजिक रूढींबद्दलचा बंडखोरपणा इ. कारणांनी व आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाने पंडितजींचे मत कोणत्याही एकान्तिक विचारधारेपासून अलिप्त राहिले व त्यास एक उदार सहिष्णू वळण लागले.

शिक्षण : घरी प्राथमिक तयारी झाल्यानंतर जवाहरलाल पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले(१९०५). इंग्लंडमधील हॅरो या प्रसिद्ध विद्यालयात दोन वर्षे शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ट्रिनिटी महाविद्यालयात (केम्ब्रिज विद्यापीठ) ते दाखल झाले (१९०७). हॅरो येथे असताना त्यांना बक्षिस म्हणून ट्रीव्हेल्यन लिखित गॅरिबॉल्डीच्या चरित्राचा एक भाग मिळाला. या चरित्राचे इतर खंडही त्यांनी मिळविले. काव्हूर, मॅझिनी व गॅरिबॉल्डी यांप्रमाणे आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करावे, अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. यावेळी भारतात वंग-भंग चळवळ जोरात होती. परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार व सशस्त्र क्रांती हा केंब्रिज विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांचा एक चर्चेचा विषय होता. त्यावेळचे सारे विद्यार्थी लो. टिळक पक्षाचे म्हणजे जहाल राष्ट्रवादी होते. पंडितजीही त्याला अपवाद नव्हते. या सुमारास त्यांनी श्यामजी कृष्णवर्मा, गोपाल कृष्ण गोखले, बिपिनचंद्र पाल इ. राष्ट्रीय नेत्यांची भाषणे ऐकली. १९०५ च्या रूसो-जपानी युद्धाचा त्यांच्या मनावार परिणाम झाला. भूशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र हे तीन विषय घेऊन ते दुसऱ्या वर्गात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली व हिंदुस्थानला परतले (१९१२). या सात वर्षांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात, त्यांनी बर्नार्ड शॉ. लौ डिकिन्सन, आयव्हॅन ब्लॉक, हॅवलॉक एलिस, एबिंग क्रॉफ्ट, ओटो व्हायनिंजर, ऑस्कर वाईल्ड, वाल्टर पेटर इ. प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचली. त्यांच्या मनावर इंग्लंडमधील उदारमतवादाचाही खोल ठसा उमटला. फेबियन समाजवादी चळवळीकडे आणि इतर समाजवादी विचारांकडे ते आकृष्ट झाले.


स्वातंत्र्य चळवळीतील कार्य : जवाहरलाल १९१२ मध्ये शिक्षण संपवून भारतात परत आले. काही काळ वकिली करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्यांचे मन रमले नाही. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना राजकारणात आस्था वाटू लागली होती. या काळात त्यांनी पुष्कळ वाचन केले. लौ. डिकिन्‌सन व मेरिडिथ टाऊनझेंड या ग्रंथकारांच्या विचारांचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला. इंग्लंडमधून वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नांबद्दलची तळमळ दिसून येते. भारतात परतल्यानंतर त्यांची पहिली काही वर्षे तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात गेली. मवाळांचे नुसत्या भाषणांवर भर देणारे राजकारण त्यांना पसंत नव्हते पण निश्चित कृतीचा मार्गही सापडत नव्हता. या काळात ८ फेब्रुवारी १९१६ मध्ये त्यांचा कमल कौल या दिल्लीतील स्वजातीय युवतीबरोबर विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. त्यांपैकी⇨इंदिरा गांधी (१९१७) भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या, तर दुसरा मुलगा (१९२७) जन्मःतच मरण पावला. कमला नेहरूंनी इतर कुटुंबियांबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. कारावासातील जीवन व क्षयरोग यांमुळे ऐन उमेदीत त्या मरण पावल्या (१९३६). तत्पूर्वी लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात जवाहरलाल यांची गांधीजीशी पहिल्यांदा भेट झाली (१९१६). अन्यायाचा नुसता निषेध करून उपयोग नाही, तर त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि हा प्रतिकार अहिंसात्मक असला पाहिजे,या गांधीच्या सूत्राने ते त्यांच्याकडे विशेष आकर्षित झाले.ब्रिटीश सरकारशी लढताना भीती वा द्वेष यांना थारा देतो कामा नये, हा गांधीजींचा दंडकही त्यांना पटला.

पंडितजींचा काँग्रेसशी घनिष्ठ संबंध १९१९ सालापासून आला. पहिल्या महायुद्धकाळात भारताचे अपरिमित शोषण करण्यात आले होते. भारताने महायुद्धात केलेल्या साहाय्याचा कृतघ्न मोबदला म्हणूनच की काय, जुलमी रौलट कायदा करण्यात आला व जालियनवाला बागेत अमानुष हत्या करण्यात आली. १९१९ मध्ये एक रात्री रेल्वेने प्रवास करीत असताना जवाहरलालांच्या डब्यातच जनरल डायर (जालियनवाला बागेतील हत्याकांड करणारा) बसला होता. त्याचे एकूण अत्याचारांविषयीचे रसभरित वर्णन जवाहरलालांनी ऐकले. ते ऐकून जवाहरलाल हादरले व तेथून पुढे ते कट्टर साम्राज्यविरोधी बंडखोर बनले. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने जी बिनसरकारी चौकशी समिती नेमली होती, त्या समितीला पंडितजींनी साहाय्य केले. गांधीजींनी १९२१ मध्ये असहकाराची चळवळ सुरू करताच जवाहरलालना प्रथम अटक झाली. तुरुंगात जाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तेव्हापासून त्यांच्या तुरुंगयात्रा सुरू झाल्या. पुढील २५ वर्षांत ते अनेक वेळा तुरुंगात गेले व एकूण पंधरा वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. त्यांचा अखेरचा तुरुंगवास १९४२ च्या छोडो भारत चळवळीच्या वेळी घडला. त्या वेळी अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांनी जवळजवळ तीन वर्षे काढली.

जवाहरलालांना प्रथम १९२३ मध्ये काँग्रेसचे सरचिटणिसपद देण्यात आले. दोन वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. या काळात ते अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष होते पण पक्षाचे कार्य व नगरपालिका या दोन्ही गोष्टींत त्यांना पक्षकार्य महत्त्वाचे वाटले. म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्याची पत्नी आजारी पडली आणि ते औषधोपचार व हवापालट यांकरिता स्वित्झर्लंडला गेले (१९२६). भारतात परत आल्यानंतर पुढे १९२७ सालीही त्यांना आणखी दोन वर्षे काँग्रेसच्या सरचिटणिसपदाची जबाबदारी सांभाळावी लागली. १९२७ साली ब्रूसेल्स येथे झालेल्या पद‌दलित राष्ट्रांच्या परिषदेला ते हजर राहिले. परिषदेनंतर त्यांनी यूरोपचा व रशियाचा दौरा केला. ही आंतरराष्ट्रीय परिषद व यूरोप-रशियाचा दौरा हा त्यांचा जागतिक राजकारणातील पहिला अनुभव होता. रशियात जाऊन साम्यवादी जग त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. त्यांचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन घडण्यास या अनुभवांचा उपयोग झाला.

जवाहरलाल यूरोपमधून परत आले, त्यावेळी भारतात सायमन आयोगाविरोधी निदर्शनांची लाट उसळली होती. जवाहरलालांनी लखनौ येथे निदर्शनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीमार केला. यावेळी क्राँग्रेसच्या ध्येयाबाबत ‘वसाहतीचे स्वराज्य’ की ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ असा वाद चालू होता. जवाहरलाल इतर अनेक तरुण नेत्यांप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्य या मताचे होते. सुभाषचंद्र बोस व इतर तरुण यांच्या सहकार्याने त्यांनी ‘इंडियन इंडिपेंडन्स युथ लीग’ ही संस्था काढून देशभर संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. त्याचा परिणाम १९२९ च्या लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राने संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली. या संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेची सांगता पंडितजींच्याच नेतृत्वाखाली १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजता देशाने केली. इतिहासात असा अपूर्व योगायोग क्वचितच आढळतो.

काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील संघटित कामगार चळवळींशी जवळचा संबंध आला. १९३० साली गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहात जवाहरलालांना तुरुंगवास भोगावा लागला. १९३३ साली त्यांना नाभा संस्थान सोडून जाण्याचा हुकूम झाला, तेव्हापासून त्यांनी संस्थानी प्रजेच्या चळवळीतही भाग घेण्यास सुरुवात केली. पुढे ते अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषदेचे अध्यक्ष झाले. संस्थानी मुलखातील प्रजेलाही स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्याबरोबर घेतले पाहिजे व संस्थानी प्रजेचा लढा आणि स्वातंत्र्याची राष्ट्रीय चळवळ यांचा निकट संबंध असावा, असे त्यांचे मत होते.

लखनौ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून १९३६ साली त्यांनी समाजवादाचा पुरस्कार केला. १९२६–२७ मधील यूरोप-रशियाच्या दौऱ्यापासूनच ते समाजवादाकडे आकृष्ट झाले होते. पुढे मार्क्सवादाचाही त्यांनी अभ्यास केला परंतु पोथीनिष्ठ समाजवाद अथवा मार्क्सवाद त्यांना पसंत नव्हता. त्यांच्या विचारांची घडण एकान्तिक स्वरूपाची नव्हती. निदान तीन वेगवेगळे स्रोत त्यांच्या विचारात मिसळलेले दिसतात. प्रथम त्यांच्या मनावर पाश्चात्त्य देशांतील उदारमतवादाचा व त्यांत अनुस्यूत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेचा प्रभाव पडला. त्यांनी फेबियन समाजवादाचा अभ्यास केला होता आणि त्यामुळे लोकशाही व समाजवाद यांची सांगड घातली पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. पुढे गांधीजींशी निकट संबंध आल्यानंतर त्यांच्याही काही कल्पना त्यांनी आत्मसात केल्या विशेषतः गांधीजींचा साधनशुचितेचा आग्रह आणि अहिंसेचा मार्ग हे त्यांनी स्वीकारले. तसेच गांधींजींचा जीवनाकडे पाहण्याचा नैतिक दृष्टीकोणही त्यांना मान्य होता. व्यक्तिस्वातंत्र्यावरील दृढ श्रद्धा आणि गांधीजीप्रणीत साधनशुचिता मनात रूजल्यामुळेच कम्युनिस्टांचे मार्ग त्यांना हिंसेचे व अत्याचाराचे वाटत. मार्क्सचे बौद्धिक ऋण मान्य करूनही ‘जीवन हे एखाद्या सिद्धांताच्या चौकटीत कोंडून ठेवता येत नाही,’ असे ते म्हणत. पुढेपुढे त्यांना मार्क्सवाद हा कालबाह्य झाला आहे, असेही वाटू लागले होते. या सर्व विचारांचा संकलित परिणाम असा झाला की, त्यांचा समाजवाद राष्ट्रीय क्रांतीशी एकनिष्ठ व मानवतावादाने संस्कारित झाला होता. त्यांच्या समाजवादाने प्रथम स्वराज्याच्या कल्पनेला आर्थिक आणि सामाजिक आशय प्राप्त करून दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय राष्ट्रवादाला त्यांनी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोणाचा संदर्भ दिला. भारतातील राष्ट्रवाद अतिरेकी न होण्यास गांधीजींचा मानवतावाद जसा कारणीभूत आहे, तसाच नेहरूंचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोणही आहे.


काँग्रेसने प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका लढविल्या (१९३६). मुख्यतः जवाहरलाल नेहरूंच्या तुफानी दौऱ्याने काँग्रेसला भरघोस यश मिळवून दिले. जवाहरलाल हे काँग्रेसला मते मिळवून देणारे जादूगरच ठरले. यावेळी यूरोपमध्ये फॅसिझम व नाझीवाद यांचा उदय झाला होता. स्पेनच्या लोकनियुक्त सरकारविरूद्ध जनरल फ्रँकोने हिटलर-मुसोलिनीच्या मदतीने बंड सुरू केले होते. त्यामुळे जवाहरलाल व्यथित झाले. फॅसिझम व नाझिवादाचे मानवतेला असलेले धोके त्यांनी बरोबर ओळखून भारतीय जनतेलाही सावध करण्याचे व शिक्षण देण्याचे कार्य केले. ते यूरोपच्या दौऱ्यावर गेले (१९३७). स्पॅनिश जनतेच्या युद्धात त्याना भाग घ्यावयाचा होता पण ते शक्य झाले नाही. इथिओपियावर मुसोलिनीने केलेल्या आक्रमणाविरुद्ध आपला तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी रोमच्या विमानतळावर मिळालेले मुसोलिनीचे भेटीचे निमंत्रणही धुडकावून दिले. फॅसिझमविरोधी लढ्यात ब्रिटन व फ्रान्स या लोकशाही देशांच्या बाजूने भारत उभा राहील, मात्र तो स्वतंत्र भारत म्हणूनच असे सहकार्य करू शकेल, हे त्यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते.

प्रांतिक निवडणुकांत अनेक प्रांतांत काँग्रेसला बहुमत मिळाले होते तरी बंगालमध्ये संमिश्र मंत्रिमंडळ बनविण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता व संयुक्त प्रांतात (उत्तर प्रदेश) मुस्लिम लीगने मंत्रिमंडळात जागा मिळण्याची मागणी केली होती. जवाहरलालांनी या दोन्ही प्रांतात संमिश्र मंत्रिमंडळे बनविण्याविरुद्ध भूमिका घेतली. येथून पुढे काँग्रेस-मुस्लिम लीग स्पर्धा तीव्र स्वरूपाची होऊन अखेर मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली.

सप्टेंबर १९३९मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा भारतात व काँग्रेसपुढे नवा पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळचे ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय नेत्यांची संमती न घेता भारताला महायुद्धात गुंतविले. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. महायुद्धासंबंधी काय भूमिका घ्यावयाची, हा प्रश्न महत्त्वाचा होता. जवाहरलाल नेहरूंची भूमिका अशी होती की, भारताने नाझीविरोधी युद्धात स्वतंत्र राष्ट्र म्हणून भाग घ्यावा. १९४० मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. दुसऱ्या क्रमांकाचे सत्याग्रही म्हणून जवाहरलालांची निवड झाली. त्यांना पकडण्यात आले व चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी न्यायालयात केलेल्या भाषणात ‘स्वातंत्र्य धोक्यात आहे प्राणपणाने त्याचे संरक्षण करा!’ असा स्फूर्तिदायक संदेश त्यांनी देशाला दिला. एक वर्षानंतर अन्य काँग्रेस नेत्यांच्या बरोबर त्यांचीही सुटका झाली.

जपानी फौजा हिंदुस्थानच्या सीमेवर १९४२ मध्ये पोहोचल्यानंतर ब्रिटिश सरकारने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना शिष्टाईसाठी पाठविले पण त्यांची योजना भारतातील सर्वच पक्षांनी झिडकारली आणि क्रिप्स शिष्टाई निष्फळ ठरली. महात्मा गांधीनी ‘छोडो भारत’ ची घोषणा दिली. ८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या मुंबईच्या खास अधिवेशनात जवाहरलाल यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाचा प्रस्ताव मांडला. ठराव मंजूर होताच रातोरात गांधीजीसकट सर्वच पुढाऱ्यांची धरपडक झाली. जवाहरलालांना वर्किंग कमिटीच्या सभासदांसह अहमदनगर किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले. तेथून त्यांची १५ जून १९४५ रोजी सुटका झाली.

ब्रिटनमध्ये मजूर पक्ष अधिकारावर आला (१९४६) व हिंदुस्थानचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन मंत्र्यांचे शिष्टमंडळ नेमण्यात आले. या शिष्टमंडळाने भारताच्या नव्या राज्यघटनेची योजना सुचविली. काँग्रेसने ही योजना स्वीकारली पण मुस्लिम लीगने ती प्रथम मान्य करून तिला विरोध केला. नवीन निवडणुका झाल्या त्यांत मुसलमानांच्या जवळजवळ सर्व जागा मुस्लिम लीगने जिंकल्या. व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी जुलै १९४६ मध्ये जवाहरलाल नेहरूंना हंगामी सरकार बनविण्यासाठी पाचारण केले. मुस्लिम लीग प्रथम या सरकारात सामील झाली नाही पण नंतर भूमिका बदलून सरकारमध्ये तिने आपले प्रतिनिधी पाठविले. प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेल्या संविधानपरिषदेत मात्र लीग सामील झाली नाही. बंगालमध्ये व इतरत्र भीषण दंगे झाले. लीगच्या अडेलतट्‌टू धोरणामुळे मंत्रिमंडळाचे काम अशक्य झाले. १९४७ च्या फेब्रुवारीमध्ये ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जूनमध्ये भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. वेव्हेलच्या जागेवर ॲटलींनी लॉर्ड माऊंटबॅटन यांची व्हाइसरॉय म्हणून नेमणूक केली. त्यांनी शक्य तर एक व ते शक्य न झाल्यास दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करून त्यांच्या हाती सत्ता सुपूर्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

जवाहरलाल नेहरू हे प्रथमपासून फाळणीचे कट्टर विरोधक होते. जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांत त्यांना मान्य नव्हता. विविधतेतून भारताची एकता व एकराष्ट्रीयत्व संपन्न झाले आहे, असा त्यांचा दृष्टीकोण होता परंतु देशातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी व वल्लभभाई पटेल इत्यादींनी आपले हे मत बदलले व फाळणीला मान्यता दिली. अशा रीतीने देशाची फाळणी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा उदय झाला आणि जवाहरलाल हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. या पदावर ते आमरण राहिले.

पंतप्रधानकीची कारकीर्द : ३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधींची हत्या झाली. या भीषण घटनेने जवाहरलालांना फार धक्का बसला.‘आपल्या जीवनातील प्रकाश हरपला’ असे करुण उद्‌गार त्यांनी काढले. पंतप्रधान म्हणून अठरा वर्षांच्या कारकीर्दीत पंडितजींची लोकप्रियता ओसरली नाही. अंतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारणात काही महत्त्वाचे उपक्रम त्यांनी केले. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय संविधान तयार झाले व संसदीय लोकशाही शासनाची सुरुवात झाली. हिंदू कोडबिल मंजूर होऊन हिंदू महिलांना वारसा–घटस्फोटाचे हक्क मिळाले. संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली. भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. महिला, अस्पृश्य व अल्पसंख्यांक यांना समान दर्जा आणि समान संधी उपलब्ध होऊन भारतीय नागरिक समान एकसंघ बनविण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यात आले. नेहरूंच्याच पुढाकाराने नियोजन मंडळाची स्थापना होऊन भारतात आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले. पहिली व दुसरी अशा दोन पंचवार्षिक योजना त्यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्या. या योजनांमुळे देशातील औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला. नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचे ध्येय काँग्रेस पक्षाला दिले. त्यांनी संपूर्ण  राष्ट्रीयीकरणाचे धोरण व स्वीकारता सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे खाजगी क्षेत्रालाही उत्तेजन दिले.

पाकिस्तानने १९४८ मध्ये काश्मीरमध्ये घुसखोर पाठवून ते काबीज करण्याचा डाव रचला होता. पंडितजींनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवून पाकिस्तानचे आक्रमण थांबविले व काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे सोपविला परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही. पाकिस्तानने व्यापलेला आझाद काश्मीर मुलख पाकिस्तानाच्या ताब्यात राहिलाव काश्मिर हे पाक-भारत संघर्षाचे कायमचे कारण झाले. पुढे शेख अब्दुलांच्या कारवाईबद्दल संशय निर्माण होऊन जवाहरलालांना आपल्या या जुन्या सहकाऱ्याला तुरुंगात टाकावे लागले.


भारतातील वसाहतवादाचे सर्व अवशेष नाहीसे करण्यासाठी त्यांनी वाटाघाटी करून फ्रेंचांच्या ताब्यातील पाँडिचेरीसारख्या विभागांचे विलीनीकरण घडवून आणले. पोर्तुगीजांशीही वाटाघाटी करून गोव्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी बारा-तेरा वर्षे प्रयत्न केला. अखेरीस सैन्य पाठवून गोवा स्वतंत्र करावा लागला (१९६२). गोवा, दीव, दमण हे भारताचे अविभाज्य घटक झाले.

भाषावर प्रांतरचनेचा प्रश्न पंडितजींच्या कारकीर्दीत निर्माण झाला. प्रथम त्यांचा देशाच्या भाषावार पुनर्रचनेला विरोध होता परंतु आंध्र व महाराष्ट्रातील लोकमताची प्रखरता लक्षात घेऊन त्यांनी भाषावार राज्यपुनर्रचना घडवून आणली. हिंदी राष्ट्रभाषा म्हणून सर्वत्र प्रसृत व्हावी, अशी त्यांची इच्छा होती पण तमिळनाडूतील हिंदीविरोधी उग्र आंदोलन ध्यानी घेता हा प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला.

शिक्षण व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी देशात अनेक संशोधन संस्था व राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या. अणुशक्तीच्या विकासात त्यांना विशेष आस्था होती. त्यांच्याच प्रोत्साहनाने अणुसंशोधन केंद्र भारतात स्थापन झाले. अणुशक्तीचा उपयोग शांततामय कार्यासाठी व्हावा, असे त्यांचे ठाम मत होते. भारताला अणुयुगात आणण्याचे श्रेय पंडितजींनाच द्यावे लागेल.

व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्या हंगामी सरकारचे प्रमुख या नात्याने पहिले भाषण करताना जवाहरलाल नेहरू यांनी, स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाची घोषणा केली होती. भारताच्या परराष्ट्रीय नीतीची उभारणी त्यांनी केलेल्या विवेचनातील मूलतत्त्वांनुसारच पुढे झाली. हंगामी सरकारच्या काळातच त्यांनी पहिली आशियाई परिषद भरविली. केवळ भारतातीलच नव्हे, तर आशिया व आफ्रिका खंडांतील साम्राज्यविरोधी लढ्याचे प्रवक्ते व नेते म्हणून जवाहरलाल सर्वमान्य ठरले. ही आशियाई परिषद म्हणजे सर्व आशियाई देशांच्या राष्ट्रवादी नेत्यांचा अभूतपूर्व मेळावा होता (१९४७). त्यातून आशियाई एकतेला जोराची चालना मिळाली. इंडोनेशियातील स्वातंत्र्ययुद्धाला पाठिंबा देण्यासाठी त्या प्रश्नावर जवाहरलालांनी दुसरी आशियाई परिषद भरविली (१९४९). आशियाई देशांचा एकजूट पाठिंबा इंडोनेशियन स्वातंत्र्यलढ्यासाठी संघटित करण्यात जवाहरलालांना यश आले. तिसरी परिषद १९५५ साली इंडोनेशियात बांडुंग येथे झाली. या परिषदेत आफ्रिकी देशही सामील झाल्यामुळे तिचे स्वरूप आफ्रो-आशियाई झाले. नेहरू-नासर-सूकार्णो या त्रयीच्या बरोबरीने चीनच्या पीपल्स रिपब्लिकचे पंतप्रधान चौ एन-लाय हेही उपस्थित होते. त्यांची परिषदेवर छाप पडलीच पण त्यांच्या वेगळ्या राजनीतीमुळे पूर्वीची सौहार्दता व एकता उरली नाही. अल्जीरियातील शेवटची परिषद यशस्वी झाली नाही परंतु नेहरूंनी आफ्रो-आशियाई देशांतील स्नेह आणि सहकार्य ही उद्दिष्टे समोर ठेवली होती शीतयुद्धाच्या काळात जवाहरलालांच्या अलिप्ततावादाला याच देशांचा पाठिंबा मिळाला. अलिप्ततावादी देशांच्या बेलग्रेड-परिषदेत यूगोस्लाव्हियाचे विद्रोही अलिप्ततावादी राष्ट्रांत सामील झाले (१९६१). पंडितजींना गटाचे राजकारण मुळातच अमान्य होते. राष्ट्रांची बांधीव लष्करी वा राजकीय गटांत विभागणी झाल्याने तणाव वाढतात व जागतिक शांततेला धोका येतो, असे त्यांचे मत होते. म्हणून अलिप्ततावादी देशांचा वेगळा गट बनविण्यास वा शीतयुद्धातील अमेरिकी वा रशियन गटाला विरोधी अशी तिसरी शक्ती निर्माण करण्यास त्यांचा विरोध होता. उलट त्या दोन्ही गटांतील तणाव कमी करणेच त्यांना पसंत होते.

पंडितजींनी दोन्ही गटांशी स्नेहाचे संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले अमेरिकेच्या लष्करी गट स्थापण्याच्या धोरणाला त्यांनी विरोध केला. या गटात सामील झाल्यामुळे पाकिस्तानला अमेरिकी शस्त्रास्त्रे मिळू लागली, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. कोरियातील युद्धात त्यांनी अमेरिकन हस्तक्षेपाविरुद्ध भूमिका घेतली व हंगेरीतील अंतर्गत यादवीत रशियाने हस्तक्षेप केल्याबद्दल निषेध करण्यास मात्र नकार दिला. १९६२ मध्ये चीनचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी पश्चिमी राष्ट्रांकडून लष्करी मदतीचीही मागणी केली. या घटनांमुळे⇨  अलिप्ततावादी धोरणाला त्यांनी मुरड घातली, अशी टीका झाली.

चीनने भारताचा अक्‌साई चीनचा प्रदेश व्यापण्यास १९५८ पासूनच सुरुवात केली होती. चीनच्या मैत्रीवर पंडितजींचा विश्वास होता परंतु या प्रश्नावर पुष्कळ वाटाघाटी होऊन अखेर तडजोड झालीच नाही आणि १९६२ च्या ऑक्टोबरमध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. पंडितजींना या घटनेचा फार मोठा धक्का बसला व त्यांची प्रकृतीही ढासळली. १९६३ साली त्यांना प्रथम मोठा आजार झाला व १९६४च्या मे महिन्यात दिल्ली येथे त्यांचे देहावसान झाले.

नेहरूंचे वाङ्‌मय : नेहरूंचे ग्रंथलेखन इंग्रजीत असून ते कारागृहातच झालेले आहे. ग्लिम्प्‌सिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी (१९३९), जवाहरलाल नेहरू :न ऑटोबायग्राफी (१९३६) व डिस्‌कव्हरी ऑफ इंडिया (१९४५) हे त्यांचे तीन ग्रंथ विशेष महत्त्वाचे मानले जातात. ग्लिम्प्‌सिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी आणि डिस्‌कव्हरी ऑफ इंडिया हे ग्रंथ त्यांनी कारागृहांत लिहीले. त्यामुळे त्यांना मूळ संदर्भग्रंथ, कागदपत्रे वा साहित्य उपलब्ध झाले नाही. साहजिकच त्यांनी काढलेले निष्कर्ष वा अनुमाने दुय्यम साधनांवर आधारित असल्याने त्यांपैकी काही निष्कर्ष विवाद्य ठरले. हे दोन ग्रंथ म्हणजे एकाच विषयावरचे दोन स्वतंत्र भाग म्हणता येतील. पहिल्यात नेहरूंनी जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन घडवले आहे तर दुसऱ्यात भारतीय इतिहासाचे विवेचन केले आहे. इतिहासासारख्या विषयातही त्यांच्या काव्यात्म व रसिक शैलीने जिवंतपणा आणला आहे. ग्लिम्प्‌सिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी हा ग्रंथ त्यांनी मुख्यतः आपल्या कन्येसाठी-‘प्रियदर्शिनी इंदिरा हिच्यासाठी’-लिहिला. तिला लिहिलेल्या पत्रांचे ते संकलन आहे. त्यात त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शैक्षणिक दृष्टी दृग्गोचर होते. हे जागतिक इतिहासाचे निवडक दर्शन घडविताना त्यांनी मानवाच्या प्रगतीच्या, वैभवाच्या व वीरकृत्यांच्या गौरवशाली कालखंडाबरोबरच  जुलमी अधोगतीच्या आणि अवनतीच्या कालखंडावरही अभ्यासू दृष्टीने प्रकाश टाकला आहे आणि हे करताना त्यातून काही बोध घेण्याचा हेतू दृष्टिआड होऊ दिला नाही. वर्तमान काळाची पूर्ण जाणीव असल्याशिवाय भूतकाळातील इतिहासातून आपल्याला काहीही शिकता येणार नाही, याची योग्य जाणीव त्यांना होती. या ग्रंथात इतिहासाबरोबर त्यांनी कला,विज्ञान,ऐतिहासिक व्यक्ती,संस्कृती यांचाही परामर्श घेतला. डिस्‌कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात नेहरूंनी अतिप्राचीन काळापासून सद्यःस्थितीपर्यंतचा संगतवार इतिहास संक्षिप्तपणे मांडलेला असून भारताच्या इतिहासातील प्रेरणांचे धागेदोरे जुळवून त्यांची तात्त्विक पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध घेतला आहे. त्यातून भविष्यकाळ घडविण्याचे मार्गदर्शन लाभावे हा हेतू दिसतो म्हणजे इतिहास कसा घडवावा यासंबंधीचे मार्गदर्शन शोधणे, हे या ग्रंथामागील उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक घटनांची व व्यक्तींची शोधक चिकित्सा त्यात आढळते. या ग्रंथाचा पूर्वार्ध ब्रिटिशपूर्व कालखंडाचे ऐतिहासिक विवेचन हा आहे व उत्तराधार्त इंग्रजी अंमल, जागतिक अधिभौतिक व वैचारिक क्रांती, दोन महायुद्धे, भारतीय-आर्थिक व राजकीय आंदोलने, काँग्रेसची वृद्धी, टिळक, गांधी, टागोर वगैरेंची थोरवी व कार्य, हिंदु-मुसलमान यांची दुही, समाजवादाचा उदय, स्वातंत्र्याची इष्टता व अपरिहार्यता, सामाजिक पुनरर्चना, राष्ट्रीय नियोजनव्यवस्था, धर्म, तत्त्वज्ञान, भौतिक शास्त्रे इ. अनेक विषयांचे तात्त्विक व ऐतिहासिक विवेचन केलेले आहे


जवाहरलाल नेहरू : ॲन ऑटोबायग्राफी या आत्मचारित्रात त्यांनी १९३६ पर्यंतच्या जीवनाचा आढावा घेतलेला असून त्यात माता, पिता, भगिनी, पत्नी या कुटुंबियांविषयी जसे लिहिले, तसेच तुरुंगातील सन्मित्र, सेवक, पशुपक्षी यांसंबंधी सहृदयतेने लिहिले आहे. म. गांधी, राजेंद्रबाबू, पटेल, सुभाषचंद्र यांसारख्या सहकारी व्यक्तींविषयी लिहिताना ते प्रेमादराने भारावून जातात. ही सारी माहिती, त्यांनी प्रारंभीच्या तीनचार प्रकरणांत संपविली आहे. पुढे ते स्वातंत्र्यसंग्रामाकडे वळले आहेत. त्यांचे नेतृत्व, काँग्रेसचे कार्य आणि अधिवेशने यांचा इतिहासच त्यांनी त्यात सविस्तर दिलेला आहे. व्यक्तीच्या अंतरंगात जो संघर्ष सतत चालू असतो, तोच कोणत्याही चरित्राचा किंवा आत्मचरित्राचा महत्त्वाचा घटक मानला जातो, हे सूत्र गृहीत धरून नेहरूंनी ही आत्मकथा लिहिली आहे. नेहरूंचे आत्मचरित्र लोकप्रिय झाले. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. लेटर्स फ्रॉम ए फादर टू हिज डॉटर (१९२९) आणि ए बंच ऑफ ओल्ड लेटर्स (१९५८) ही नेहरूंची आणखी दोन पुस्तके. यांत नेहरूंची मोतीलाल, ⇨ विजयालक्ष्मी पंडित, कृष्णा हाथिसिंग, इंदिरा गांधी वगैरे कुटुंबियांना, तसेच जगातील विविध लहानथोर व्यक्तींना लिहिलेली पत्रे व काहींची उत्तरे आहेत. पत्रलेखनशैलीचे हे दोन नमुनेदार ग्रंथ आहेत.

नेहरूंचे वक्तृत्व अस्खलित नसले, तरी मनाचा ठाव घेणारे आहे. व्यासपीठावर ते उभे राहिले की त्यांच्या सस्मित, लालबुंद देखण्या व्यक्तिमत्त्वाने सारा श्रोतृवर्ग भारावून जाई. त्यांच्या हालचालींत चपलता असे. त्यांनी भारतावर व भारतीय जनतेवर अलोट प्रेम केले. भारतीय जनतेनेही त्यांच्या प्रेमास अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ते आमरण पंतप्रधान तर होतेच, शिवाय इतर अनेक उच्च मानमरातब जनतेने त्यांना बहाल केले. अखिल भारतीय काँग्रेसचे पाच वेळा अध्यक्ष होणारे ते एकमेव नेते होत. देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन १९५५ मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. आफ्रो-आशियाई देशांचे स्वातंत्र्य व संघटना, अलिप्ततावादाचे धोरण आणि ⇨ पंचशील तत्त्व यांचा पुरस्कार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यांसाठी अविरत प्रयत्न केले. त्यांची कृतज्ञतापूर्वक दखल घेण्यासाठी भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यांसाठी ⇨ नेहरू पुरस्काराची योजना कार्यान्वित करण्यात आली. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात अगदी पहिल्यापासून आदर्शवाद व वास्तवता यांच्यातील द्वंद्वं कायम राहिले. त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाची मीमांसा या द्वंद्वांच्या आधारेही केली जाणे शक्य आहे तथापि राष्ट्रीय दृष्टीने पाहता, महात्मा गांधींनी आपला वारस निवडून पंडितजीच्या कर्तृत्वावर जो विश्वास प्रकट केला होता, तो पंडितजींनी आपल्या कर्तुत्वाने सार्थ असल्याचे सिद्ध केले यात संदेह नाही.

संदर्भ : 1. Brecher, Michael, Nehru : A Political Biography, London, 1959.

           2. Croker, Walter, Nehru, London, 1966. 

           3. Das, M. N. The Political Philosophy of Jawaharlal Nehru, London, 1961. 

           4. Gopal, S. Ed. Selected Works of Jawaharlal Nehru, 10 Vols., New Delhi, 1972. 

           5. Hutheesing, Krishna Nehru, We Nehrus, Bombay, 1969. 

           6. Jolly, G. S. Ed. The Image of Nehru, Delhi, 1969. 

           7. Natwar Singh, K. Ed. The Emerging World : Jawaharlal Nehru Memorial Volume, Bombay, 1964. 

           8. Natwar Sing, K. Ed. The Legacy of Nehru : A Mamorial Tribute, Onatario, 1965. 

           9. Seton, Marie, Panditji : A Portrait of Jawaharlal Nehru, Bombay, 1967.

         १०. कुरुंदकर, नरहर राजूरकर, न. गो. पंडित नेहरू : एक मागोवा, पुणे, १९७३. 

         ११. गाडगीळ पां. वा. शांतिदूत नेहरू, मुंबई, १९६६.

देशपांडे, सु. र. साक्रीकर, दिनकर

नेहरू कुटुंब : आई स्वरूपराणी, वडील मोतीलाल, बहीण विजयालक्ष्मी व तरूण जवाहरलाल. पितापुत्र
पं. नेहरू, म. गांधी व सरदार पटेल बालकांच्या मेळाव्यात नेहरू
पंतप्रधानपदाचा शपथविधी, १५ ऑगस्ट १९४७ पंतप्रधान नेहरू
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, प्रतापगड, १९५७. पंडितजींच्या तीन भावमुद्रा
जवाहरलाल व पत्नी कमला

जवाहरलाल नेहरू, बार ॲट लॉ