राष्ट्र : एक आधुनिक राजकीय संकल्पना. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे भान ठेवून, त्या परंपरांचे सातत्य राजकीय दृष्टीने म्हणजे राज्याच्या चौकटीत टिकवून ठेवणारा व विशिष्ट भौगोलिक प्रदेशनिष्ठा मनात बाळगणारा लोकसमूह किंवा समाज म्हणजे ‘राष्ट्र’ असे सामान्यपणे म्हणता येईल. राष्ट्र या संकल्पनेचा उदय फ्रेंच राज्यक्रांतीच्या (१७८९) सुमारास झाला. राष्ट्र शब्दास इंग्रजी समानार्थी ‘नेशन’ हा शब्द आहे. नेशन या शब्दाचे मूळ नेशिओ या लॅटिन शब्दात आहे. नेशिओचा अर्थ जन्म किंवा वंश असा असल्याने जन्माने किंवा वंशाने एक असलेला जनसमूह म्हणजेच राष्ट्र, असा सर्वसामान्य ग्रह आढळतो. तो चुकीचा आहे कारण एकतर कोणत्याही लोकसमूहाची वांशिक शुद्धता शास्त्रीय निकषांवर सिद्ध करता येत नाही. अर्थात दुसऱ्या बाजूने असे म्हणता येईल की, वांशिक शुद्धता प्रत्यक्षात असावयासच पाहिजे असे नाही तशी लोकश्रद्धा असली, तरी पुरेसे आहे. हा युक्तिवाद मान्य केला, तरी रक्ततत्त्व (वंशतत्त्व) हा राष्ट्राचा एकमेव आधार होऊ शकत नाही. रक्ततत्त्वाने बांधले गेलेले जनसमूह (जमाती, टोळ्या) इतिहासाच्या सर्व पर्वात अस्तित्वात होते पण त्यांना राष्ट्राचे स्वरूप नव्हते.

इतिहासाच्या प्रत्येक कालखंडास अनुरूप असे समाजाचे संघटन आणि संरचना असते आणि प्रत्येक कालखंडात व्यक्ती असे एक समूहजीवन जगत असते की, ज्याच्या प्रीत्यर्थ ती आपले सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध व्हावी, अशी सामान्यधारणा असते. या समूहजीवनाची व्याप्ती प्रथमतः कुटुंबापुरतीच मर्यादित होती. कालानुक्रमे ती जात–जमात, पंथ, धर्म अशी विस्तारित होत जाऊन आधुनिक काळात सु. गेल्या तीन शतकांत राष्ट्र या स्वरूपात रुजली आहे. आधुनिक जगाचा पायाभूत राजकीय घटक म्हणजे राष्ट्र होय. मानवजातीतील अंतर्विरोध प्रगत–अप्रगत, पौर्वात्य–पाश्चिमात्य, पुंजावादी-साम्यवादी अशा विविध द्वंद्वांमधून व्यक्त होत असला, तरी त्या सर्वांना छेदून जाणारा अंतर्विरोध राष्ट्र या संकल्पनेच्या आधाराने आजही उभा आहे.

एखाद्या जनसमूहास ‘राष्ट्रीय’ व्यक्तिमत्त्व प्राप्त होण्यास कोणती परिस्थिती अनुकूल ठरते? राष्ट्राची घटकतत्त्वे कोणती? राष्ट्रनिर्मितीस अनुकूल अशी पाच घटकतत्त्वे मानण्यात येतात : (१) वांशिक एकता : सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे वांशिक एकता अगर तत्संबंधीची लोकश्रद्धा हा राष्ट्राचा अपरिहार्य घटक नाही. रक्तसंबंधांचा समान वारसा असलेला जनसमूह दोन किंवा अधिक राष्ट्रांत विभागला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे रक्तसंबंधांतील भिन्नतेवर (उदा., भारतातील जाती) मात करून राष्ट्र उभारणी होऊ शकते. (२) भौगोलिक एकता : राष्ट्रनिर्मिती करू इच्छिणाऱ्या सर्व लोकांची वस्ती सलग भौगोलिक प्रदेशात असावी, ही अपेक्षा वाजवी आहे हे जगातल्या सर्व राष्ट्रांकडे नजर टाकल्यास लक्षात येते परंतु पहिल्या महायुद्धापूर्वी पोलिश जनता विविध राज्यांत विभागली गेली असतानासुद्धा पोलंडचे राष्ट्र म्हणून अस्तित्व होतेच. इस्राएल राष्ट्राच्या स्थापनेपूर्वीच (१९४८) ज्यू राष्ट्र हे याच प्रकारचे उदाहरण आहे. राष्ट्रांच्या भौगोलिक मर्यादा वस्तुनिष्ठतेने निसर्गतःच ठरलेल्या असतात, हे जरी खरे असले, तरी भूप्रदेशाचे महत्त्व एका वेगळ्या अर्थाने अनन्यसाधारण आहे. एकाच भौगोलिक प्रदेशात पिढ्यान् पिढ्या वास्तव्य केल्याने त्या प्रदेशाविषयी, त्यातील नद्या, पर्वत, शेते आणि वृक्षराजी यांच्याविषयी एक उत्कट अशी आत्मीयतेची भावना निर्माण होते. ही भावना राष्ट्रीय जाणिवेचा एक अंगभूत भाग म्हणून दृढमूल होते. मानवी पिढ्या येतात आणि जातात, पण भूमी ही अविरत अशा राष्ट्रजीवनाची अविचल साक्षी असते. (३) धार्मिक एकता : ब्रिटनने स्पॅनिश नौदलाचा पराभव केला (१५८८) त्यावेळी प्रॉटेस्टंट पंथाचे रक्षण ही धार्मिक प्रेरणा प्रभावी होती परंतु आधुनिक काळात धर्म हा राष्ट्रभावनेचा केवळ अपवादात्मक आधार राहिलेला आहे. पाकिस्तानची राष्ट्रनिर्मिती धार्मिक प्रेरणेने झाली हे खरे परंतु बांगला देशच्या निर्मितीने या भूमिकेस छेद गेला, हे लक्षात घ्यावयास हवे. अर्थात दुसऱ्या बाजूने हेही लक्षात घ्यावयास हवे की, पाकिस्तानातून विलग झालेला पूर्व बंगाल पुन्हा भारतात विलीन झालेला नाही. मध्ययुगामध्ये यूरोपियन समाज स्वतःला जर्मन, फ्रेंच किंवा ग्रीक समजत नसे, तर कॅथलिक ख्रिश्चन किंवा ग्रीक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समजत असे. धर्मसुधारणेच्या चळवळीतून एका बाजूस राष्ट्रीय राजसत्ता आणि दुसऱ्या बाजूस सर्व ख्रिश्चन धर्मीयांवर प्रभुत्व गाजविणारी सार्वभौम धर्मसत्ता, असा संघर्ष उभा राहिला. या घडामोडीत एक गोष्ट चांगली घडली ती ही, की धर्मसत्तेची राजसत्तेपासून फारकत झाली आणि धर्माचा राजकीय आधार समूळ नष्ट झाला. राजकीय दृष्टीने पाहता धर्माची जागा राष्ट्राने घेतली. (४) ऐतिहासिक : इतिहासातील सुवर्णयुगाचे प्रतीक हा राष्ट्रनिर्मितीचा मोठा आधार होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यांची सामूहिक स्मृती जिवंत आहे, अशा कष्टाच्या, मानहानीच्या, सुखदुःखाच्या, त्यागाच्या आणि जय-पराजयाच्या सामुदायिक अनुभूतीतून राष्ट्राचे व्यक्तिमत्त्व आकार घेते. (५) भाषा : आधुनिक राष्ट्रे ही बव्हंशी भाषेच्या आधाराने उभी आहेत. स्वित्झर्लंड, कॅनडा, रशिया, भारत अशी बहुभाषिक राष्ट्रे जोमाने उभी असली, तरी भाषा हे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचे एक स्वाभाविक अंग मानावयास हवे. समाजातील बुद्धिवैभव, सांस्कृतिक मानदंड आणि भावविश्वे ही साहित्याच्या माध्यमातूनच प्रभावीपणे व्यक्त होतात. साहजिकच राष्ट्रभाषेमध्ये आणि राष्ट्रीय साहित्यामध्ये शतकानुशतके अखंडपणे वाहत आलेल्या राष्ट्रजीवनाची हृदयस्पर्शी रूपे न्याहाळता येतात. भूतकाळात विलीन होणारी प्रत्येक पिढी आपल्या विषयीच्या स्मृती मागे ठेवून जाते. राष्ट्रजीवनात सातत्य आणि चैतन्य निर्माण करतो, तो स्मृतींचा हा अमोल वारसा आणि हा वारसा अखंडित राहतो तो भाषा-साहित्य यांच्या द्वारा.

रक्तसंबंध, प्रादेशिकता, इतिहास, धर्म आणि भाषा हे सर्व घटक राष्ट्रनिर्मितीस आधारभूत होत असले, तरी राष्ट्रनिर्मितीसाठी या सर्वांच्याच बाबतीत समाजाची एकवाक्यता हवी असा त्याचा अर्थ नव्हे. धार्मिक भिन्नता असताना किंवा भाषांमध्येही वैविध्य असतानादेखील राष्ट्रनिर्मिती होऊ शकते. समाजातील सर्वांचा धर्म, सर्वांची भाषा एक आहे की नाही या प्रश्नापेक्षा, त्या समाजात राजकीय एकतेच्या खोलभावनेने एक राष्ट्र म्हणून जगण्याची उर्मी आहे की नाही आणि त्या ध्येयासाठी असीम त्यागाची सिद्धता आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ही भावना नेमकी कशी निर्माण होते, हा आधुनिक समाजविज्ञानातला एक महत्त्वाचा संशोधनविषय आहे आणि त्याबाबत मतभिन्नताही आहे. एक गोष्ट मात्र निश्चित की गतकालाच्या सामूहिक स्मृती, वर्तमानकालीन जीवनाची अनुभूती आणि भविष्याविषयीच्या आकांक्षा यांतून जी अतूट भावबंधने निर्माण होतात, त्यांचे परिणत स्वरूप म्हणजे राष्ट्र होय.

संदर्भ : 1. Akzin, Benjamin, State and Nation, London, 1964.

2. Bendix, Reinhard, Nation-building and Citizenship : Studies of Our Changing Social

Order, New York, 1964.

3. Black, Cyril E. The Dynamic of Modernization : A Study in Comparative History, New

York, 1966.

4. Snyder, Louis L. Ed. The Dynamics of Nationalism, Princeton, 1964.

तवले, सु. न.