व्ही. पी. मेननमेनन, वपल पंगुण्णी : (? १८९४–१ जानेवारी १९६६) ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक कुशल सनदी नोकर, सत्तांतर कालातील मध्यस्त व भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणातील गृहमंत्री सरदार पटेल यांचे विश्वासू सल्लागार, व्ही. पी. मेनन या नावाने परिचित होते. ओंट्टपल्लम येथे जन्म. तेथील माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतले पण पुढे त्यांना औपचारीक विद्यापिठीय शिक्षणाचा फारसा लाभ मिळाला नाही. तथापी त्यांनी परिश्रमपूर्वक इंग्रजी भाषेचा अभ्यास करून प्रभुत्व मिळविले. इंग्रजी राजवटीत साध्या कारकुनापासून ते सहाय्यक सचिव, बिहारचे हंगामी राज्यपाल इ. अनेक उच्च पदावर त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. १९३६ ते १९५१ या काळात उपसचिव संयुक्त सचिव, गव्हर्नर जनरलचे उपसचिव, प्रायुक्त मंत्रीमंडळाचे सचिव, गृहमंत्रालयाचे खास सल्लागार व सचिव, अर्थ आयोगाचे सदस्य इ. विविधि उच्च पदे त्यांनी जबाबदारींने सांभाळली. १९४५ ते ५० या सत्तांतराच्या काळात भारतीय नेते आणि इंग्रज सरकार यांच्यात सन्मानीय घटनात्मक तडजोडी घडवून आणण्यात मेनन यांचा फार मोठा वाटा होता. गृहमंत्री सरदार पटेल यांचे ते उजवे हात समजले जात. द स्टोरी ऑफ द इन्टिग्रेशन ऑफ द इंडियन स्टेट्स (१९५६) आणि ट्रान्सफर ऑफ पॉवर इन इंडिया (१९५७) हे त्यांचे दोन ग्रंथ भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणारे आहेत.साधार, समतोल आणि सुबोध इतिहासलेखन कसे करावे याची प्रचिती हे ग्रंथ वाचून येईल. निवृत्तीनंतरचे उर्वरित जीवन त्यांनी कर्नाटकात बंगलोर येथे व्यतीत केले. 

दीक्षित म. श्री.