ध्वज : मानाचे, यशाचे वा आदर्शाचे चिन्ह. त्याचप्रमाणे संदेशवाहक साधन म्हणून ध्वजाचा उपयोग प्राचीन काळापासून केलेला आढळतो. प्राचीन काळी काठीला एखादी विशिष्ट प्रतिमा बांधून जे खुणेचे निशान तयार करीत, ते ध्वजाचे आद्य स्वरूप म्हणता येईल. प्राचीन मानवसमूहांनी किंवा टोळ्यांनी आपापल्या गटाची चिन्हे म्हणून पशू, पक्षी तसेच काल्पनिक किंवा दैवी वस्तू वा देवता यांच्या चित्रांचा उपयोग केलेला आढळतो. लढायांत निरनिराळी पथके, तुकड्या, पक्ष इ. दाखविण्यासाठी अशा प्रकारच्या चिन्हांची किंवा निशाणांची नितांत गरज होती. शत्रू किंवा मित्र ओळखायला त्यांपेक्षा अधिक चांगले साधन त्या वेळी नव्हते. पुष्कळदा काठीच्या किंवा भाल्याच्या वरच्या टोकाला बांधलेल्या प्रतिमेच्या खाली फरारे किंवा झिळमिळ्या बांधल्या जात, त्यांना पताका म्हणत. या लांबलचक झिळमिळ्या-फराऱ्यांचे रूपांतर पुढे त्रिकोणी-चौकोनी ध्वजामध्ये झाले. कापडनिर्मितीचे तंत्र व रंगारीकाम या गोष्टी अवगत झाल्यावर पताका आणि ध्वज निरनिराळ्या चमकदार व सुंदर रंगांनी आणि चित्रांनी रंगविले जाऊ लागले.हवेत फडफडणारे रंगीबेरंगी ध्वज उत्तेजक व प्रेरक ठरले. महाभारत, युक्तिकल्पतरू, अपराजितपृच्छा इ. प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथांतील ध्वजवर्णनावरून ध्वजपताका कुलचिन्हविद्यांतर्गत विषय मानावा लागतो. पाश्चिमात्य राष्ट्रांतही ध्वज हे कुलचिन्हविद्येचा एक विषय समजला जातो. ध्वज हा रेशमी किंवा लोकरी कापडाचा असतो. वैयक्तिक नागरिक संस्था सुती कापडाचे ध्वज वापरतात. ध्वजाला संस्कृत भाषेत अक्रा, केतु व पताका असे पर्यायी शब्द आहेत. गुढी, झेंडा, दिंडी, ध्वज, पताका असे मराठीत शब्द आहेत तर इतर भाषांत अलम, कुर, निशान, फरारा, बाहुटा (बावटा) अशी नावे आढळतात. सेनासंघटनेच्या, घोडदळांच्या ध्वजास इंग्लिशमध्ये ‘स्टँडर्डʼ व ‘गिडनʼ आणि इतर दळांच्या झेंड्यांना ‘कलर्सʼ म्हणतात. नौसेनेच्या ध्वजास ध्वज वा एन्‌सिन म्हणतात. काही राष्ट्रे लोकशाही असून त्या राष्ट्रांचे नाममात्र राजा/राणी असतात. उदा., इंग्लंड. अशा परिस्थितीत राष्ट्रध्वज असून शिवाय राजाचा वेगळा ध्वज असतो. त्यास इंग्लिशमध्ये स्टँडर्ड म्हणतात. ऐतिहासिक वा सांस्कृतिक परंपरा यांनुसार ध्वजपताकांच्या अभिकल्पाची योजना होते. अभिकल्प पूर्ण विचाराने निश्चित करतात. राष्ट्राचा व सैनिकी संघटनेचा आणि संघटनानेत्याचा इतिहास परंपरा व आदर्श हे अभिकल्पात प्रतिबिंबित व्हावेत. असे उद्दिष्ट असते. ध्वजाचा पट व पटावरील रंगसंगती, चिन्हे-चित्रे, वचने व पटांवरील त्यांचे स्थान यांमुळे ध्वजपताकांचे वैशिष्ट्य दिसून येते. समारंभ, संचलन, रक्षकालये व ध्वजप्रदान या वेळी रेशमी ध्वजपताका वापरतात. सोसाट्याचा वारा वाहत असलेल्या ठिकाणी उदा., सागरावर लोकरी ध्वजपट असतो. भारतीय राष्ट्रध्वज खादीचा असावा, असे म. गांधींचे मत होते (हरिजन, ८ ऑगस्ट १९४७). बहुधा लांबीरुंदीचे प्रमाण दोनास एक असते. पटचिन्हे रंगवितात वा भरतात. लहानसहान पताका-झेंडे छापतात. ध्वजस्तंभाजवळील पटाच्या भागास उच्चालक म्हणतात. उच्चालक पालरस्सीला शिवतात. नौसेनेचे ध्वज दोरखंडाला शिवतात. हा ध्वजयुक्त दोरखंड ध्वजस्तंभावर चापाने अडकवितात. ध्वजस्तंभाजवळील पटाच्या भागास उच्चालक म्हणतात. ध्वजपटाचे चार चौकोन कल्पिल्यास उच्चालकाजवळील वरच्या चौकास पहिला, त्याच्या खालच्यास तिसरा, पहिल्याच्या उजव्या बाजूचा दुसरा व त्याखालच्यास चौथा चौक मानतात. पहिला चौक मानचौक समजतात. याच चौकात मुख्य ध्वजाशिवाय इतर ध्वज दाखवितात. उदा., भारतीय नौसेनेच्या ध्वजाच्या पहिल्या चौकात भारतीय राष्ट्रध्वज दाखविला आहे. राष्ट्रीय मानचिन्हे व सैनिकी मानचिन्हे झेंड्याच्या मध्यावर दाखवितात. राष्ट्रध्वज हा सर्वांत उंच ठिकाणी लावला जातो. इतर राष्ट्रांचे ध्वज स्वराष्ट्रध्वजाबरोबर फडकावताना सर्व ध्वज समान उंचीवर लावतात. सर्व ध्वजांचे आकारमान समान असावेच लागते.

उद्‌गम व परंपरा : ध्वज वापरण्यास पहिल्यांदा कोणी व कोठे सुरुवात केली हे निश्चित नाही परंतु भारत व चीन यांच्याकडून ध्वज फडकावण्याची परंपरा पश्चिमेकडे गेली असावी, असे इतिहासावरून दिसते. प्राचीन मानवसमूहांनी, गण किंवा टोळ्यांनी आपापल्या गणांची निदर्शक म्हणून पशू, पक्षी, दैवी वस्तू, देवता इत्यादींचा देवक वा गणचिन्हे म्हणून उपयोग केलेला आहे. ईजिप्तमध्ये इ.स.पू. २००० वर्षांपूर्वीची अशा प्रकारची गणचिन्हे, देवकचिन्हे, नारमेर व नरमसीन या राजांच्या पुरावस्तूंत आढळून आली आहेत. ख्रि.पू. ८० मध्ये इराणमध्ये जे बंड झाले, त्याचा नेता एक लोहार होता. त्याचे कपडे हाच एक ध्वज म्हणून बंडखोरांनी वापरला. सोळाव्या शतकात जर्मन शेतकऱ्यांनी सरंजामदारांविरुद्ध केलेल्या उठावात ‘शेतकऱ्याचा जोडाʼ हे ध्वजचिन्ह वापरले होते. या गणचिन्हांचे पुढे ध्वजपताकांत रूपांतर झाले. राजसत्तेचा उदय झाल्यापासून ध्वज हे राजचिन्ह झाले. क्षात्रवर्गाचा उदय झाल्यापासून प्रत्येक योद्धा आपापला वेगळा ध्वज वापरू लागला. उदा., अर्जुनाचा कपिध्वज, कृपाचार्यांचा वृषभध्वज, जयद्रथाचा वराहध्वज, दुर्योधनाचा गजध्वज, भीष्माचार्यांचा तालध्वज, भीमाचा सिंहध्वज, द्रोणांचा कमंडलू, अश्वत्थाम्याचा सिंहाची शेपटी इत्यादी. या ध्वजांची वर्णने महाभारतात आहेत. मौर्य सम्राटांचा मयूरध्वज व गुप्तांचा गरुडध्वज प्रख्यात आहेत.

ख्रिस्ती चर्चमध्ये ध्वजाचा उपयोग चौथ्या शतकापासून करण्यात येऊ लागला. बादशाह कॉस्टंटीनला स्वप्नात ध्वजावर क्रूसाचे चित्र दिसले, अशी एक आख्यायिका आहे. धर्मयुद्धांत क्रूस असलेले ध्वज सैन्यापुढे असत. त्यांवर कधी संतांची चित्रे, पवित्र चिन्हे किंवा बायबलमधील वचने रेखाटलेली किंवा लिहिलेली असत.

इस्लाम धर्मात क्रॉससारखे निश्चित चिन्ह प्रचलित नव्हते. मुहमंद पैगंबरांनी रोमन लोकांचे गरुड हे चिन्ह आपल्या सेनेच्या ध्वजावर वापरले. मुहंमद पैगंबर यांचा ध्वज ‘काळाʼ होता (तो त्यांच्या आवडत्या पत्नीच्या तंबूचा काळा पडदा होता). पुढे निरनिराळ्या शाखांनी उदा., पांढरा (उमय्या), काळा (अब्बासी), हिरवा (फातिमी) खिलाफतींच्या रंगांच्या पताका स्वीकारल्या. त्यावेळेपासून पांढरा, काळा व हिरवा रंग हे इस्लामी ध्वजरंग निश्चित झाले. हिरवा रंग हा पैगंबराच्या हिरव्या कोटावरून घेतला गेला. मस्कत आणि ओमान यांचे ध्वज तांबड्या रंगाचे आहेत. फातिमी पंथाने प्रथम हिरवा रंग स्वीकारला व तोच पुढे इस्लाम धर्माचा झेंडा झाला. इसवी सनाच्या तेराव्या शतकात ऑटोमन तुर्कांनी त्यावर ‘चांदʼ हे चिन्ह वापरले. त्यात पुढे केव्हा तरी ताराही आला. आता अनेक मुस्लिम देश चांदतारांकित ध्वज वापरतात. तिबेटमध्ये चिनी कम्युनिस्टांची सत्ता स्थापन होण्यापूर्वी ठिकठिकाणी ‘धम्म-वृक्षʼ म्हणजे रेशमी कापडावर ‘ओम् मणिपद्मेहंम् ।ʼ ही सहा पवित्र अक्षरे चमकत्या रंगात लिहिलेले ध्वज उंच काठ्यांवर फडकविलेले असत.

स्फूर्तिस्थान अथवा मानबिंदू म्हणून ध्वजाचा उपयोग प्राचीन काळापासून जगभर निरनिराळ्या जमातींनी केलेला आढळतो. अमेरिकन इंडियन जमातीच्या ध्वज-शीला हे याचे उदाहरण म्हणून नमूद करता येईल. अवेस्ता (यास्त्र १०–१४) मध्ये ‘गोध्वजाʼ चा उल्लेख आढळतो. बायबलमध्येही चिन्हे म्हणून ध्वज फडकविले जात, असा उल्लेख आहे. शिवाय ज्यूडा आणि इतर राष्ट्रांच्या ध्वजांचा उल्लेख बायबलात ठिकठिकाणी आला आहे. ईजिप्तमधील पुरातन ध्वजांपैकी काहींच्या प्रतिमा हायरा कॉनपोलिस येथील नारमेरच्या (ख्रि.पू. ५००० ते ४०००) हवन कुंडावरील कोरीवकामात मिळाल्या आहेत. ईजिप्तमध्ये प्राचीन देवालयांच्या प्रांगणात उंच डोलकाठ्या उभ्या करीत आणि त्यांची वरची टोके छोट्या पताकांनी सजविली जात. प्राचीन ॲसिरियात काठीच्या वरच्या टोकाला देवतेची प्रतिमा बसविलेली चकती बांधून तिच्याखाली पताकांसारख्या दिसणाऱ्या  शोभिवंत झिळमिळ्या सोडलेल्या असत. धार्मिक ध्वज राजकीय प्रतीक झाल्याचे उदाहरण म्हणून भगव्या झेंड्याचा उल्लेख करता येतो. भगव्या शब्दाची व्युत्पत्ती भृग–भार्गव–भगवा अशी होते. भृगू हा एक आदित्य होय. ऋग्वेदात (७·१८·६) भृगुगण हा सैनिकसमूह वा संघटना म्हणून ओळखली जाते. भगवा रंग सूर्योदयापूर्वी दिसणाऱ्या लालसर-कावेर (कावेसारखा) आहे. त्याचरप्रमाणे ‘भगʼ म्हणजे सूर्य असाही दूरचा संबंध लावता येतो. तो देवांचा आणि देवसेनेचा सूर्यचिन्हांकित ध्वज होता, असे हिंदूंच्या धार्मिक वाङ्‌मयात  म्हटले आहे. म्हणून भगव्या ध्वजाची परंपरा प्राचीन आहे. भगव्या रंगाला अरुण, ताम्र, काषाय, लोहित, कावेर इ. पर्यायी शब्द आहेत. ऋग्वेदादी संहितांतील उल्लेखांवरून किमान इ. स. पू. २००० वर्षांपासून भगव्या ध्वजाची परंपरा सुरू होते. पराक्रम, अपरिग्रह, त्याग या सद्‌गुणांचा भगवा रंग प्रतीक आहे. युद्ध किंवा इतर पवित्र कार्यासाठी प्राणाहुती देण्याचे वेळी केशरी वस्त्रे वापरण्याची भारतीय प्रथा होती. देवगिरीचे यादव व विजयानगर साम्राज्य यांचे ध्वज भगवेच होते. भोसले कुलाचा भगवा ध्वज हाच मराठी राष्ट्राचा राष्ट्रध्वज म्हणून शिवछत्रपतींनी फडकावला. जरीपटका हा मराठी सेनेचा ध्वजही भगवा होता.


ध्वजाचा धार्मिक कार्यासाठी उपयोग केला जातो. शंकराचा ध्वज वृषभचिन्हांकित म्हणून तो वृषभध्वज, विष्णूचा गरुडध्वज, दुर्गेचा सिंहध्वज, गणेशाचा कुंभ अथवा मूषकध्वज, मदनाचा मकरध्वज असे निरनिराळे देवदेवतांचे ध्वज आहेत. काही ठिकाणी देवतांचे प्रतीक म्हणून त्या त्या देवतांचे ध्वज किंवा झेंडा उभारतात. बिहारमध्ये महावीर म्हणजे हनुमानाच्या नावाने ध्वजाची पूजा करतात. वर्षप्रतिपदेच्या दिवशी गुढी उभारतात. यज्ञमंडपावर विविध प्रकारचे ध्वज लावण्याची पद्धत होती. सर्व हिंदू देवळांवर भगवा ध्वज असतो. जैनधर्मीयांच्या धर्मध्वजाचा अभकल्प ‘पंचमंगल महाश्रुतस्कंध नमस्कारʼ महामंत्रावर आधारित आहे. आचार्य उमास्वामींच्या तत्त्वार्थाधिगमसूत्र यातील ‘सम्यगदर्शनज्ञानचरित्राणि मोक्षमार्ग : ।।ʼ(अ. १·१) या सूत्रान्वये ध्वज चिन्हाचा अर्थ लागतो : रक्त, पीत, श्वेत, हरित, नील (आकाश) ही पटरंगसंगती सिद्ध, आचार्य, अविहंत उपाध्याय व साधू यांची सूचक आहे. टिंब व चंद्रकोर, तीन वर्तुळे व स्वस्तिक अनुक्रमे सिद्धशीला, रत्नमयी (दर्शन, ज्ञान व चारित्र्य) व चतुर्गती (देव, नरक, तिर्यग व मनुष्य) यांची द्योतक आहे. पूर्वी गरुड फार आवडते गणचिन्ह होते असे दिसते. आजही काही राष्ट्रांचे ‘गरुडʼ हे प्रतिष्ठाचिन्ह आहे. उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने, प. जर्मनी इत्यादी. गरुड हा सेवाभाव, श्रेष्ठता वगैरे गुणांचे चिन्ह मानतात. आशिया खंडात चित्रांकित ध्वज लोकप्रिय दिसतात. त्या दृष्टीने प्राचीन चीनचा ड्रॅगन (सपक्ष सर्प), कंबोडियाचे मंदिर, थायलंड आणि लाओसचा शुभ्र गज, प्राचीन बह्मदेशाचा मयूर, श्रीलंकेचा सिंह, राष्ट्रीय चीनचा सूर्य, जपानचा उगवता सूर्य, नेपाळचे सूर्यचंद्र इ. ध्वजचिन्हे उल्लेखनीय आहेत.

दक्षिण अमेरिकेत सूर्याचे चिन्ह विशेष आवडते असल्याचे दिसते. तेथे तो स्वातंत्र्याची निशाणी समजला जातो. अर्जेंटिना, यूरग्वाय इ. राष्ट्रांच्या ध्वजांवर ते दिसून येते. फिलिपीन्सच्या राष्ट्रध्वजावरही तो आहे.

तत्त्वज्ञानात्मक किंवा जादूटोण्याचे प्रतीक असेही राष्ट्रध्वज आहेत. प्राचीन दक्षिण मोरोक्कोचा पंचकोण आणि इझ्राएलचा डेव्हिडची ढाल ही या प्रकारच्या ध्वजाची उदाहरणे होत. प्राचीन ग्रीक लोक भाल्याच्या टोकाला कवच बांधून तो ध्वजासारखा वापरीत. निरनिराळी ग्रीक नगरे आपापल्या नगरराज्यांची निशाणे म्हणून पवित्र चिन्हे वापरीत. उदा., अथेन्स–घुबड आणि ऑलिव्ह, थीब्ज–स्त्रीमुखी सिंह, रोमन लोकांचा व्हेक्सिल्यूम हा आधीचा ध्वज होय नंतर पंख पसरलेला गरुड (ॲक्विला) चित्रित केलेला ध्वज यांनी स्वीकारला. रोमन सेनेच्या ध्वजावर गवताची पेंडी किंवा लांडगा, घोडा, बैल, डुक्कर या प्राण्यांची चित्रेही असत. प्राचीन इराणी लोकांच्या ध्वजांवर निरनिराळ्या आकृत्या असत. त्यांमध्ये भाल्यावर बसलेला सुवर्णकांतीचा गरुड हा विशेष प्रचलित होता. आठव्या शतकात अरब भाल्याला किंवा बरचीला ध्वजवस्त्र बांधून ध्वज तयार करीत.

राष्ट्रध्वज हा ध्वजांचा आधुनिक प्रकार होय. राष्ट्र-राज्य ही संस्था आणि राष्ट्रवाद ही कल्पना आधुनिक असल्याने त्याचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज साहजिकपणेच त्यांच्या नंतर जन्मला. यूरोपात झालेल्या धर्मयुद्धांच्या काळी पद्धतशीरपणे राष्ट्रध्वज तयार करण्यात येऊ लागले, असे दिसते. तेराव्या शतकात तयार झालेला डेन्मार्कचा राष्ट्रध्वज हा यूरोपीय देशांतील सर्वांत जुना ध्वज होय. ध्वजावर लिहिलेले पहिले ज्ञात पुस्तक एक स्पॅनिश-फ्रॅन्सिस्कन धर्मगुरूने चौदाव्या शतकात लिहिलेले आहे. ज्या ज्या देशांना त्याने भेटी दिल्या, तेथील ध्वजांबद्दलची सचित्र माहिती त्याने या ग्रंथात दिली आहे. इटलीतील लोकसत्ताक राज्यांनी प्रथम ध्वज उपयोगात आणले आणि मग ही  प्रथा इतरत्र पसरली, असेही एक मत प्रचलित आहे.

राष्ट्रीय ध्वजांवर असणारे तारे सर्वसाधारणतः पाच टोके असलेले असतात. तारा हा आशा, ऐक्य किंवा पाच खंड यांचे प्रतीक मानला जातो. राष्ट्रध्वजावर वनस्पती किंवा पाने यांची चित्रे क्वचित सापडतात. लेबाननच्या ध्वजावरील देवदार आणि कॅनडाच्या राष्ट्रध्वजावरील मेपल पान असे काही अपवाद आहेत. ध्वज दोन्ही बाजूंनी पाहिला जातो. यामुळे त्यावर अक्षरे लिहिणे सोयीचे नसते. काही मुस्लिम राष्ट्रांत मात्र ध्वजावर धर्मवचने लिहिलेली असतात. उदा., सौदी अरेबियाचा ध्वज.

स्कँडिनेव्हियन राष्ट्रांत ख्रिस्ती क्रॉस चिन्ह राष्ट्रध्वजावर काढलेले आढळते. मूळच्या अलग राज्याचे एकीकरण होऊन निर्माण झालेल्या एकात्मक किंवा संघात्मक राष्ट्राचे ध्वज हे बहुधा मूळच्या भिन्नभिन्न ध्वजांचे अंशतः किंवा प्रतीकात्मक रीतीने एकत्रीकरण करणारे असतात. ग्रेट ब्रिटनचा युनियन जॅक हे या दृष्टीने उदाहरण म्हणून सांगता येईल. संघराज्यात प्रथम किती राज्ये होती व आज किती आहेत, हे दर्शविण्याची रीत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील लाल-पांढऱ्या  तेरा पट्ट्यांच्या व ५० ताऱ्यांच्या राष्ट्रध्वजात चांगली प्रतिबंबित झाली आहे. निरनिराळ्या राजकीय कल्पनांचे प्रतिनिधी म्हणून निरनिराळे रंग वापरले जातात. धवल रंग शांतीचा प्रतीक समजतात. शरणागतीची, युद्धबंदीची वा शस्त्रसंधीची निशाणी म्हणून पांढरे ध्वज दाखविण्याची रीत जगन्मान्य आहे. लाल हा क्रांतीचा रंग समजला जातो आणि त्यादृष्टीने तो विशेषेकरून साम्यवादी देश व पक्ष वापरतात. म्हणूनच ‘लाल बावट्याचे राज्यʼ व ‘लाल बावटाʼ हे शब्दप्रयोग राजकारणात प्रचलित झाले आहेत. हिरवा रंग हा इस्लामचा प्रतिनिधी रंग म्हणून काही ठिकाणी ओळखला जातो, तर केशरी रंग हा शौर्य आणि त्यागाचा प्रतीक समजतात. बोधरंग वापरण्याचे एक शास्त्र यूरोप खंडात विकसित होत आले. यूरोपीय राष्ट्रांच्या ध्वजरचनेत ह्या शास्त्राचे नियम तंतोतंत पाळण्याची खटपट झालेली आढळून येते.

पट्ट्यापट्ट्यांच्या राष्ट्रध्वजांचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे. जगातील कित्येक राष्ट्रांच्या ध्वजांवर निरनिराळ्या रंगांचे पट्टे असतात. त्यांतही तिरंगी राष्ट्रध्वजाची संख्या बरीच आहे. तिरंगी ध्वज हा स्वातंत्र्यध्वज व क्रांतिध्वज समजतात. विसाव्या शतकात तर तो लोकसत्तेचे प्रतीक बनला आहे. सोळाव्या शतकात तो प्रथम नेदर्लंड्समध्ये उपयोगात आणलेला दिसतो. फ्रेंच राज्यक्रांतीपासून ध्वजरचनेत एक नवीन पर्व सुरू झाले, असे मानले जाते. फ्रान्सने स्वतंत्र झाल्यावर तिरंगा हा आपला ध्वज ठरविला. त्यानंतर निरनिराळ्या राष्ट्रांत तिरंगा राष्ट्रध्वज बनला. भारत अशा राष्टांपैकी एक होय. अर्थात निरनिराळ्या राष्ट्रांच्या तिरंगी राष्ट्रध्वजांतील रंगपट्टे, त्यांचे आकारमान, त्यांचे क्रम, लांबीरुंदी व ते कोणत्या भावनांचे प्रतीक आहेत या बाबींमध्ये राष्ट्रपरत्वे फरक आहे.


भारतीय राष्ट्रध्वज : भारतात १८८५ साली राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली असली, तरी तिने राष्ट्रीय निशाण १९२१ सालापर्यंत स्वीकारले नव्हते.

मादाम कामा या राष्ट्रभक्त भारतीय महिलेने २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीमध्ये स्टगार्ट येथे भरलेल्या समाजवाद्यांच्या जागतिक मेळाव्यात स्वकल्पनेने तयार केलेले एक तिरंगी निशाण भारताचा राष्ट्रध्वज म्हणून सादर केले. या निशाणात हिरवा, केशरी व तांबडा असे तीन आडवे पट्टे  होते. भारताचे राष्ट्रीय फूल समजल्या जाणाऱ्या कमळाची आठ चित्रे हिरव्या पट्ट्यात, वंदेमातरम् ही अक्षरे केशरी पट्ट्यात आणि हिंदुमुसलमानांची प्रतीके म्हणून अनुक्रमे सूर्य व चंद्र यांची चित्रे तांबड्या पट्ट्यात, असा या ध्वजाचा एकूण साज होता. अशा प्रकारचा ध्वज खुद्द भारतात मात्र कधीच वापरला गेला नाही. १९१६ साली होमरूल चळवळीचे भूखंड म्हणून ॲनी बेझंट, लो. टिळक आदींना अटकेत ठेवले असताना त्यांनी पाच तांबडे व चार हिरवे पट्टे असलेला वरच्या डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक, त्याखाली सात तारे व उजवीकडे चांद अशी चिन्हे धारण करणारा राष्ट्रध्वज तयार करून फडकविला. सरकारी अधिकाऱ्यांनी अर्थातच तो फोडून टाकला १९१७ सालच्या कलकत्ता काँग्रेसमध्ये अधिकृत राष्ट्रध्वज ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर १९२० पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनात ध्वजाबद्दल चर्चा होऊनही निश्चित निर्णय झाला नाही. त्यानंतर गांधीजींच्या पुढाकाराने या प्रश्नाला निश्चित चालना मिळाली. यंग इंडिया, हरिजन या नियतकालिकांतून त्यांनी वेळोवेळी लेख लिहून राष्ट्रध्वजाबाबत मतप्रदर्शन केले. मच्छलीपटनम् शहरातील एक प्राध्यापक पी. व्यंकय्या यांनी गांधीजींच्या सूचनेप्रमाणे ध्वज तयार केला. जलंदरचे लाला हंसराज यांनी सदर ध्वजावर चरखा असावा, अशी केलेली सूचना गांधीजींना व इतरांना अर्थपूर्ण वाटली. हा तिरंगी ध्वज खादीचा असून त्यात तांबडा, हिरवा, पांढरा या रंगांचे आडवे पट्टे व त्यांवर गर्द निळ्या रंगाचा चरखा होता. सर्व धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक असा हा झेंडा असा त्याचा अर्थ लावण्यात आला. हिंदूंचा तांबडा, मुसलमानांचा हिरवा आणि इतरांचा पांढरा अशी रंगांची वाटणी होती. रंगांना जातीय स्वरूप आल्याने शिखांनी आपला प्रतिनिधी म्हणून काळ्या रंगाचाही पट्टा असावा अशी जाहीर मागणी केली, ती मान्य मात्र झाली नाही. १९२१ पासून हा तिरंगा स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय निशाण म्हणून पुढे आला. नागपूर व इतरत्र झालेले ध्वजसत्याग्रह खूप गाजले. १९३१ साली केशरी, पांढरा, हिरवा हे रंगपट्टे धर्माचे द्योतक नसून ते अनुक्रमे त्याग-धैर्य, सत्य-शांतता, प्रेम-विश्वास या गुणांची प्रतिके आहेत, असे जाहीर करण्यात आले.

भारताचा राष्ट्रध्वज संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी निश्चित केला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धर्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे. त्यांच्या विवेचनाप्रमाणे केशरी रंग किंवा भगवा रंग हा त्यागाचा द्योतक आहे, पांढरा रंग प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा प्रतिनिधी आहे, तर हिरवा रंग मानवाचे निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो. धर्म आणि सत्य हे भारताच्या राष्ट्रध्वजाखाली काम करणाऱ्याचे शास्ते असावेत, जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धर्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धर्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्रʼ या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धर्मचक्र प्रवर्तनायʼ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

राष्ट्रध्वजांना द्यावायाचा मान, त्यांच्या वापराबद्दलचे नियम, राष्ट्रीय शोक-आनंद-स्वागतप्रसंगी तो कसा उभारतात आदींबद्दलचे संकेतही निश्चित केलेले असतात. त्यांनुसार राष्ट्रध्वजांचा उपयोग केला जातो. या बाबतीत भारतीय राष्ट्रध्वज संहिता या नावाची पुस्तिका भारत सरकारने प्रसिद्ध केलेली आहे. राष्ट्रध्वजाशिवाय जगभर त्या त्या राष्ट्रातील निरनिराळे पक्ष, संघटना, राष्ट्रप्रमुख, सेनापती, लष्करी तुकड्या, नौदलातील आणि व्यापारी नौका व जहाजे, राजघराण्यांतील मान्यवर लोक, महानगरपालिका, महापौर, विद्यापीठे, स्काउट, गाईड इ. निरनिराळ्या संस्था, खेळ व क्रीडासंघटना आदींच्या स्वतंत्र पताका असतात. संदेश दळवळणासाठी छोटेमोठे बावटे वापरले जातात. संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आहे. ध्वजपट सौम्य निळ्या रंगाचा आहे. पटावर उत्तर ध्रुव हे केंद्र धरून जगाचा नकाशा हे चिन्ह रुपेरी रंगात दाखविले आहे. या नकाशाभोवती ऑलिव्ह वृक्षाच्या दोन फांद्या दाखविल्या आहेत. हा ध्वज सर्व देशांत संयुक्त राष्ट्रदिनी (२४ ऑक्टोबर) फडकवतात. संयुक्त राष्ट्रांच्या ज्या उपशाखा आहेत, त्यांचेही ध्वज किंवा मुद्रा आहेत.

ध्वजविषयक आंतरराष्ट्रीय कायदा : या कायद्याची माहिती ओपेनहाइम यांच्या इंटरनॅशनल लॉ या दोन खंडी ग्रंथात (१९६२) दिली आहे. बार्सिलोना डिक्लेरेशन १९२१ व हेग येथील आंतरराष्ट्रीय करारान्वये (१८९९) झेंडे आणि ध्वज यांच्या युद्धकाळातील उपयोगाविषयी नियम दिले आहेत.

ध्वजदिन : ज्या दिवशी एखाद्या ध्वजाची निर्मिती होऊन तो स्वीकारला जातो किंवा ज्या दिवशी एखादी संघटना प्रस्थापित केली जाते, तो दिवस ध्वजदिन म्हणून पाळला जातो. उदा., भारतीय प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हा ध्वजदिनही मानला जातो. १४ जानेवारी हा भारतीय भूसेना दिन म्हणून पाळला जातो इत्यादी.

विरामसंधिपताका : पांढऱ्या रंगाची पताका युद्धतहकुबीची निर्देशक आहे. याविषयीचे नियम आंतरराष्ट्रीय कायद्यात दिले आहेत. सोळाव्या शतकापूर्वी सेनापतीने जर दोन सैन्यांमध्ये खंजीर, तलवार व ढाल उभी केली, तर ती लढाई थांबविण्याची खूण आहे असे महाराष्ट्रात मानले जाई. तसेच लढाई सुरू करण्याची खूण म्हणून रणांगणामध्ये रणखांब उभारण्याची पद्धत महाराष्ट्रात होती.

२३ फेब्रुवारी १९६६ रोजी चंद्रावर पहिला अवकाश ध्वज (स्पेस फ्लॅग) रशियाने रोवला. हा धातुपत्र्याचा त्रिकोणी ध्वज आहे. त्याच्या एका अंगावर ल्यूना-९ या अवकाशयानाच्या मार्गाने पृथ्वीला चंद्राशी जोडल्याचे दृश्य आहे. दुसऱ्याअंगावर सोव्हिएट शस्त्रगौरवावरण हे दृश्य असून त्याखाली युनियन ऑफ सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिक्स हे शब्द कोरले आहेत. ४ जुलै १९६४ रोजी न्यू ॲटलांटिस नावाचा एक नवा देश कॅरिबियन समुद्रात जमेकापासून सु. १० किमी. अंतरावर लिस्टर हेमिंग्वे याने स्थापिला. हा देश म्हणजे ६ चौ.मी. आकाराचा तरता तराफा आहे. या देशाचे सु. सात नागरिक आहेत. या नव देशाचाही स्वतंत्र ध्वज आहे.


सैनिकी ध्वज व ध्वजचिन्हे : या ध्वजांचा उगम क्षत्रिय वर्गाच्या उदयापासून झाला असावा, असे महाभारतीय युद्धवर्णनावरून वाटते. परंतु भारतीय ध्वजांची परंपरा निदान वैदिक काळापासून सुरू झाली असावी, असे ऋग्वेदातील १·११९, १·१४३, ३·१–१२, ५·८, ७·८३–८५, १०·१०३–११ इ. ऋचांवरून निश्चित करता येते. ध्वजांच्या अभिकल्पाची माहिती मात्र मिळत नाही परंतु ध्वजपतकांचे वेगवेगळे प्रकार होते. उदा., कृतध्वज, केतू, बृहकेतू इत्यादी. दुंदुभी वाजत असता ध्वजपताका उभारल्या जात. ते सेनेचे प्राण असल्यामुळे त्यांचे निष्ठेने रक्षण करण्यात येई. ध्वजपताकांवर मारा करून त्यांना खाली पाडणे, तोडणे अथवा जिंकणे म्हणजे पराभव झाला असे समजत. देवसेनेचा ध्वज सूर्यकेतू म्हणजे सूर्यचिन्हांकित असे. कौटिलीय अर्थशास्त्रात जकात व टोलनाक्यावर ध्वज लावीत (२·२१). युद्धात ध्वजाखाली सैनिक लढत, असे युद्धबंद्यांच्या उल्लेखावरून वाटते (कौटिलीय अर्थशास्त्र ३·१३·१९). तसेच सेनाशिक्षणासाठी ध्वजपताकांचा उपयोग केला जाई (३·३३·११). युद्धभूमीवर ज्या ठिकाणी ध्वज नसतो, त्या ठिकाणी राजा असावा (१०·३·३) वगैरे उल्लेखांवरून मौर्यकालीन सैनिकी ध्वजपताकांची माहिती मिळते. गुप्तकालीन काही शिलालेखांत गरुडध्वज आणि रेशमी ध्वजांचे उल्लेख आहेत. वामनपुराणावरून सैनिकांकडे पताका असून ते सेनापतीच्या ध्वजाखाली लढत, असे वर्णन अढळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत रणांगण, शिबिर, सेनासंचलन इ. प्रसंगी ध्वजपताकांचा उपयोग केल्याचे दिसते. शांतताकाळात प्रासाद, नगरे व तटबंद्या यांवर ध्वज फडकावला जाई. गुप्तकाळातील युक्तिकल्पतरु या ग्रंथात ध्वजपताकांचे उल्लेख आहेत. अपराजितपृच्छा हा ग्रंथही उल्लेखनीय आहे. मोगली सेनेत ध्वजपताकांना कूर, अलम वगैरे म्हणत. ध्वजाधिकाऱ्यास ‘कुरबेगीʼ किंवा ‘माही-ओ-मरातिबʼ म्हणत सेनेच्या अग्रभागी भाल्याच्या टोकावर ‘पंजेʼ लावण्याची रीत होती. ध्वजपताका त्रिकोणी हिरव्या वा शेंदरी रंगाच्या असत. ध्वजपटावर जरतारीकाम असून काठ सोनेरी कलाबतूचे असत. एकहजारी मनसबदार आणि त्यावरील सेनाधिकाऱ्यास पताका दिल्या जात. ध्वजदंडाच्या टोकांवर जी प्रतिमा असे, तीच ध्वजपटावरही असे. सेनेत रक्तवर्णीय घोड्याच्या शेपट्याही मिरविल्या जात. चंगीझखानाच्या मोगल-तुर्क सेनेत याकच्या शेपट्या हे प्रतीक म्हणून मिरविले जाई. त्यास चत्र-टोक म्हणत. मराठा सेनेचा राष्ट्रध्वज भगवा व जरीपटका ही सेनापताका लढाईत नेली जात. जरीपटका तिकोनी असून त्यावर जरतारीकाम असे. मराठी सेनेने जिंकलेल्या जागेवर तोच रोवला जाई.

आधुनिक भारतीय सेना-ध्वजांची परंपरा ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यापासून सुरू होते. इंग्लिशमध्ये ध्वजांना कलर्स व पताकांना पेन्नन म्हणतात. घोडदळांच्या पताकांना स्टँडर्ड किंवा गिडन म्हणतात. नौसेना व वायुसेनांच्या ध्वजांनाही कलर्स म्हणतात. ब्रिगेडियर व तत्सम श्रेणी नौसेना-वायुसेना अधिकारी व त्यावरील अधिकाऱ्यांच्याझेंड्यांना पेन्नन म्हणतात. या अधिकाऱ्यांच्या पताकांवर पाच टोकी तारे अधिकाऱ्याचा दर्जा दर्शवितात. ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल व जनरल आणि त्यांचे इतर समान अधिकारी यांसाठी अनुक्रमे एक ते चार टोकी तारे पताकांवर असतात. फक्त लढाऊ दलांच्या उदा., ब्रिगेड, डिव्हिजन, प्राधिकाऱ्यांनाच पताका फडकावण्यास अनुज्ञा असते. इतर तत्तुल्य अधिकारी वाहनावर श्रेणीदर्शक फलक लावतात. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय सेना-पलटणी १९४७ सालापूर्वीच्याच ध्वजपताका थोडाफार फरक करून वापरतात. राजमुकुट, युनियन जॅक, हिंदताराऐवजी अशोकस्तंभावरील चार सिंह व चक्र तसेच भारताचा राष्ट्रध्वज सनिकी पताकांत अंतर्भूत केले आहेत.

इतर संघटनांप्रमाणे सैनिकी संघटनांच्या विशिष्ट प्रथा-परंपरा आहेत. त्या ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेल्या असल्या, तरी स्वातंत्र्योत्तर काळात त्यांत बदल होत आहेत. ज्या दलांनी दीर्घकाळ सैनिकी सेवा केली आहे, अशा दलांना राष्ट्रपती पताका प्रदान करतात. या विधीला पताकाप्रदानविधी (प्रेझेंटेशन ऑफ कलर्स) म्हणतात. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी राष्ट्रध्वजाच्या वंदनाप्रीत्यर्थ तोफा डागल्या जातात. पताका जमिनीला समांतर लववून राष्ट्रपतींना वंदन केले जाते. नवीन दलपताका वापरात आणण्यापूर्वी पताकापुण्यार्पणविधी (कॉन्सिक्रेशन ऑफ कलर्स) होतो. शपथविधीच्या वेळी नवसैनिक दलपताका हातात धरून सैनिककर्तव्याची शपथ घेतो. नित्यनैमित्तिक म्हणून सकाळी रक्षकालयासमोर ध्वजपताका फडकावली जाते आणि संध्याकाळी परतीच्या (रिट्रीट) विधीच्या वेळी मानसन्मानाने उतरविली जाते. दुसऱ्या दिवसापर्यंत रक्षकालयात तिचे जतन केले जाते. पताकानिवृत्तिविधीही गंभीरपणे केला जातो. इंग्लंडमध्ये निवृत्तीनंतर पताका चर्चमध्ये किंवा सरकारी इमारतीत इतमामाने जतन करून ठेवतात.

इतर राष्ट्रांत परंपरेप्रमाणे सैनिक पताकारोहणादी वगैरे विधी पाळतात. इंग्लंडमध्ये शहराच्या महापौरांच्या संमतिविना सेनादलांना शस्त्रे व पताका घेऊन शहरातून जाता येत नाही.

एखाद्या शहरात दंगेधोपे झाले, तर तेथील नागरिकांवर वचक बसविण्यासाठी ध्वजसंचलन (फ्लॅग मार्च) केले जाते.

संदर्भ : 1. Campbell, Gordon Evans, I. O. The Book of Flags, London, 1960.

            2. Edwards, T. J. Military Customs, London, 1954.  

            3. Kangle, R. P. The Kautiliya Arthasastra, Parts 1–3, Bombay, 1960, 1963, 1965.

            ४. पांड्ये, रामदीन, प्राचीन भारत की संग्रामिकता, पटना, १९५७.

रुपवते, दा. ता. दीक्षित, हे. वि.