सादत, (मुहम्मद) अन्वर अल् : (२५ डिसेंबर १९१८–६ ऑक्टोबर १९८१). सार्वभौम ईजिप्तचा तिसरा राष्ट्राध्यक्ष (कार. १९७०–८१), मुत्सद्दी आणि शांततेच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी (१९७८). त्याचा जन्म सामान्य कुटुंबात मिट अबू अल्-कम (ताला जिल्हा, अल् मिनुफियाह प्रांत) गावी झाला. वडील लष्करात कारकून होते. सुरुवातीस परंपरागत मुस्लिम धर्मानुसार शिक्षण घेऊन पुढे कैरो येथील अब्बासिया मिलिटरी ॲकॅडीमीतून त्याने पदवी घेतली (१९३८). विद्यार्थिदशेत त्याचा ⇨ गमाल अब्दुल नासर या भावी क्रां तिकारकाशी परिचय झाला आणि दोघांची मैत्री अखेरपर्यंत दृढ होती.

अन्वर अल् सादतदुसऱ्या महायुद्घ काळात त्याची लष्करात कॅप्टनपदी नियुक्ती झाली. लष्करांतर्गत नासर याने तरुण लष्करी अधिकाऱ्यांची एक गुप्त संघटना (ऑफिसर्स रेव्होल्यूशनरी ऑर्गनायझेशन) स्थापन केली. तीत अन्वर सादतसह अनेकजण सामील झाले. या चळवळीत तो कार्यरत असतानाच जर्मन गुप्तहेरांबरोबर संगनमत केल्याच्या आरोपाखाली त्यास कैद झाली (१९४२ –४४). नंतर तुरुंगातून तो पळून गेला आणि भूमिगत झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर खुनाच्या आरोपाखाली पुन्हा त्यास कैद झाली (१९४६–४९). तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने ट्रकचालक, वृत्तसंपादक, पत्रकार वगैरे नोकऱ्या केल्या. पुढे त्यास पुन्हा लष्करात घेतले (१९५०).

राजा फरूकला पदच्युत करण्याच्या जुलै १९५२ च्या रक्तशून्य अवचित सत्तांतरात सादतने सर्वतोपरी नासरला मदत केली. फरूकला हद्दपार केल्यानंतर नासरने मुहंमद नगीब यास नामधारी प्रमुख केले व पुढे त्यास दूर करून सर्व सत्ता हाती घेतली (१९५६). राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नासरने सादतला महत्त्वाची पदे दिली. सादतने १९५२ ते ६८ दरम्यान इस्लामी काँग्रेसचा अध्यक्ष, राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष, नॅशनल युनियन पक्षाचा सरचिटणीस, आफ्रो-आशियाई एकात्म मंडळाचा अध्यक्ष, अल्जुहुरिया दैनिकाचा संपादक इ. पदे भूषविली. नासरच्या अखेरच्या दिवसांत (१९६८–७०) उपराष्ट्राध्यक्ष व त्याच्या मृत्यूनंतर प्रथम हंगामी राष्ट्राध्यक्ष आणि पुढे सार्वमताने सादत विधिवत राष्ट्राध्यक्ष झाला. पुढे १९७६ मध्ये त्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली.

सादतने देशांतर्गत आर्थिक क्षेत्रात विकेंद्रीकरणाचे तत्त्व वापरून आर्थिक विकासासाठी काही सवलती दिल्या. तसेच व्यक्तिस्वातंत्र्यास मुभा दिली. इझ्राएलविरुद्ध रशिया पुरेशी मदत देत नाही, हे लक्षात येताच त्यांचे हजारो तंत्रज्ञ व सल्लागार यांना देशातून हाकलले आणि आर्थिक ताण कमी केला तथापि अन्नधान्याच्या बाबतीत तसेच बेरोजगारीबाबत त्याच्या योजना असफल ठरल्या मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने धाडसी निर्णय घेऊन इझ्राएलने १९६७ च्या युद्घात पादाक्रांत केलेला प्रदेश (सिनाई द्वीपकल्प व गाझापट्टी) मिळविण्यासाठी सिरियाच्या सहकार्याने संयुक्त लष्करी मोहीम काढली (१९७३). त्यात त्याला काही प्रमाणात यश लाभले. त्यामुळे त्याचा नावलौकिक झाला पण त्याला मध्यपूर्वेत सतत धुमसत असलेला अरब-इझ्राएल संघर्ष कायमचा मिटावा असे वाटत होते. म्हणून त्याने इझ्राएलच्या जेरुसलेम राजधानीस भेट देऊन १९–२१ नोव्हेंबर १९७७ दरम्यान इझ्राएलच्या संसदेत (नेसेट) ईजिप्तची भूमिका स्पष्ट केली. या ऐतिहासिक भेटीमुळे इझ्राएलशी मैत्रीचे व सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. परिणामतः अमेरिकेच्या मध्यस्थीने ईजिप्त-इझ्राएलमध्ये कँप डेव्हिड (अमेरिका) येथे दोन करार झाले (१९७८). त्यांत शांतता तह आणि मध्यपूर्वेतील परिस्थिती यांविषयी ढोबळ आराखडा तयार करण्यात आला. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही पुढे २६ मार्च १९७९ रोजी झाली. त्यानुसार इझ्राएलने सिनाई द्वीपकल्प, गाझापट्टी यांतून सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले. तत्पूर्वीच सुएझ कालवा दळणवळणास खुला झाला होता. या त्याच्या कार्याबद्दल त्याला इझ्राएलचे पंतप्रधान ⇨ मेनाशेबेगीनबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९७८) तथापि लेबानन-सिरियासारखी काही अरब राष्ट्रे आणि ईजिप्तमधील जहाल इस्लामी मूलतत्त्ववादी धर्मार्तंडांना त्याचे इझ्राएलविषयक धोरण मान्य नव्हते. त्यांच्या दहशतवादी संघटनेकडून कैरोत त्याचा खून झाला.

सादतने प्रथम एका अशिक्षित युवतीबरोबर लग्न केले (१९४२). त्यांना तीन मुली झाल्या. पुढे त्याने जिहाननामक अँग्लो-ईजिप्शियन तरुणीशी दुसरा विवाह केला. त्यांना तीन मुली व एक मुलगा झाला.

राजकारणात सतत कार्यमग्न असतानाही त्याने आपला लेखन-वाचनाचा व्यासंग जोपासला आणि फुरसतीच्या वेळात ग्रंथलेखन केले. त्याची अननोन पेजीस (१९५५), द सीक्रेट्‌स ऑफ द ईजिप्शियन रेव्होल्यूशन (१९५ ७), द स्टोरी ऑफ अरब युनिटी (१९५७), माय सन, धीस इज युअर अंकल गमाल (१९५८), फॉर ए न्यू सरेक्शन (१९६१), इन सर्च ऑफ आयडेन्टीटी (१९७८) इ. पुस्तके प्रसिद्घ असून अखेरचे पुस्तक हे त्याचे आत्मवृत्त आहे. त्यातून क्रांत्योत्तर ईजिप्तचा, विशेषतः अरब-इझ्राएल संघर्षाचा इतिहास आढळतो.

देशपांडे, सु. र.