राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : भारतातील एक राजकारणनिरपेक्ष सांस्कृतिक संघटना. हिंदू समाजातील विविध गटांत ऐक्य निर्माण करून भारतवर्षाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी धर्म आणि संस्कृतीच्या पायावर हिंदू समाजाचे पुनरूज्जीवन घडवून आणणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट तिच्या घटनेत (अनु.३) नमूद केले आहे. हिंदु-मुसलमानांत शाश्वत स्नेहभाव निर्माण करावा, या हेतूने म. गांधींनी १९२०-२९ साली खिलाफत चळवळीचे नेतृत्व स्वीकारले [⟶ खिलाफत चळवळ, भारतातील]. परिणामतः सुशिक्षित नेमस्त मुसलमान नेत्यांच्या ऐवजी रूढिप्रिय हटवादी मौलवींना अवाजवी महत्त्व प्राप्त होऊन त्यांनी गैरमुस्लिमांबाबत तीव्र द्वेषाची आग भडकावून दिली. त्यातूनच मोपलांचे अत्याचार, कोहाट आदी शहरांतल्या भीषण दंगली तसेच तबलीग-तन्निमसारख्या चळवळी उद्‌भवल्या. त्यामुळे आर्यसमाज, विवेकानंदाची प्रणाली इत्यादींचा प्रभाव असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये व इतरांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटली. तबलीग−तन्निमला विरोधी अशा संघटनांची लाट पसरली. १९२५ साली हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन होऊन तिला अखिल भारतीय स्वरूप आले. राष्ट्रीय आंदोलनास मदतरूप असे ⇨ राष्ट्र सेवा दल  अगोदरच स्थापन झाले होते. सर्वधर्मीय राष्ट्रवादाऐवजी हिंदू राष्ट्रवादाच्या तत्त्वप्रणालीवर आधारलेली ही नवी संघटना १९२५ च्या विजयादशमीला नागपूरला असहकारिता आंदोलनातील एक काँग्रेस नेते डॉक्टर ⇨ केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरू केली. तिला नागविदर्भ भागात उत्तम प्रतिसाद मिळाला. १९२६च्या एप्रिलमध्ये २६ सभासदांच्या बैठकीत या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव देण्यात आले. त्या सालच्या जातीय दंगलीत नागपूरला आक्रमक संरक्षण यशस्वीपणे करून दाखविल्यामुळे संघाला बरीच लोकप्रियता मिळाली. कित्येक ठिकाणी संघाच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. त्यात भर पडली. १९२९ साली सर्व शाखाप्रमुखांच्या बैठकीत संघाची एक चालकानुवर्तीं घटना होऊन हेडगेवारांना सरसंघचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीतील शिस्तबद्ध संघटनेच्या धर्तीवर आणि विवेकानंदांच्या हिंदू तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करणारी, आक्रमक संरक्षणावर भर देणारी ही संघटना सबंध देशात पसरू लागली.

संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय प्रथम स्पष्टपणे लाहोर काँग्रेस अधिवेशनात काँग्रसने निश्चित केले. त्यामुळे आनंदित होऊन हेडगेवारांनी प्रत्येक शाखेने काँग्रेसचे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा आयोजित कराव्यात असा आदेश काढला. सत्याग्रह सुरू झाल्यावर संघशाखांनी सत्याग्रहींच्या मदतीसाठी शुश्रूषापथके उभारली. जुलै १९३० मध्ये हेडगेवारांनी सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास पतकरला आणि बऱ्याच संघसेवकांनीही त्यात भाग घेतला.

वर्ध्याच्या लक्ष्मीबाई केळकारंनी १९३६ साली संघाच्या धर्तीवरच पण स्त्रियांसाठी वेगळी राष्ट्रसेविका समिती हेडगेवारांच्या अनुमतीने सुरू केली. तथापि पुढील वर्षापासून हेडगेवार आणि स्वयंसेवक हे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवाहापासून आणि राष्ट्रव्यापी स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर झाले. हिंदुमहासभा किंवा तत्वम पश्चाने सुरू केलेल्या आंदोलनात ते भाग घेऊ लागले. स्वतः हेडगेवारांनी पुण्याला सोन्यामारूती सत्याग्रहात भाग घेतला. नंतर हैदराबाद (भागानगर) सत्याग्रहात संघाच्या सु. दोन हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला.

जवळजवळ प्रत्येक प्रांतात १९३९ सालापर्यंत संघशाखा पसरल्या होत्या. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर तीन वर्षांसाठी धडक कार्यक्रम सुरू करण्यात आला. तीन वर्षांच्या अवधीत शहरांतून शेकडा तीन व ग्रामीण भागातून शेकडा एक स्वयंसेवक तयार करण्याचे आव्हान संघाच्या कार्यक्रर्त्यांना करण्यात आले. १९३५ सालापासून हेडगेवारांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर २१ जून १९४० मध्ये हेडगेवार यांचे देहावसान झाले. त्या वेळी संघाच्या २५० शाखा व सु. १८,००० स्वयंसेवक होते. आजन्म संघकार्याला वाहून घेतलेले व सर्वांगीण प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची प्रचारक म्हणून नियुक्ती, हे संघाच्या वाढीचे व शिस्तीचे एक कारण होते. अधिकारी-प्रशिक्षण वर्ग हेडगेवारांनी प्रथमापासूनच सुरू केले होते आणि बहुतेक वर्गांना ते स्वतः उपस्थित राहात. साप्ताहिक बौद्धिके, शारीरिक शिक्षण, कवायत तसेच लाठी, भाला, तलवार इ. पुरातन शस्त्रास्त्रांचे शिक्षण यांसाठी तज्ञ अधिकारी असले पाहिजेत, यांवर त्यांचा भर असे. संघाच्या वार्षिक कार्यक्रमांना संघाबाहेरच्या मान्यवर व्यक्तींना बोलाविण्याचा पायंडा त्यांनीच घालून दिला होता. महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल, काँग्रेस सेवा दलप्रमुख ना. सु. हर्डीकर आदींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून गौरवोद्‌गार काढले होते.

हिंदुराष्ट्रवादाचा उघड पुरस्कार आणि हिंदुमहासभेच्या नेत्यांशी जवळीक यांमुळे संघावर जातीयतेचे आरोप एकसारखे केले जात पण हिंदू राष्ट्रवाद हाच विशुद्ध राष्ट्रवाद आहे, असा संघनेत्यांचा आग्रह असे. आपण राजकारणापासून अलिप्त आहोत, असे हे नेते वारंवार सांगत पण दर गुरुवारी होणाऱ्या बौद्धिकांना पहिली काही वर्षे राजकीय वर्ग असेच संबोधण्यात येत असे. १९३२ साली मध्य प्रांताच्या राघवेंन्द्र राव सरकारने प्रथम सरकारी व स्थानिक संस्थांमधल्या सेवकांना संघकार्यात भाग घेण्यावर बंदी घातली. पण पुढे या प्रश्नावर त्या सरकारचा पराभव झाला. मुस्लिम लीग, हिंदुमहासभा आणि संघ यांपैकी कोणत्याही संघटनेत काँग्रेस सभासदांनी प्रवेश करू नये, असे बंधन अखिल भारतीय काँग्रेस समितीने १९३४ साली घातले.

हेडगेवारांनी आपल्यानंतर माधवराव गोळवलकर उर्फ गुरुजी (१९ फेब्रुवारी १९०६−५ जून १९७३) यांना सरसंघचालक म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा जन्म गोळवलकर-पाध्ये कुटुंबात नागपूरला झाला. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मध्य प्रदेशातील रायपूर, दुर्ग, खांडवा इ. ठिकाणी झाले. चंद्रपूर (चांदा) येथील ज्युबिली हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले (१९२२) आणि नंतर हिस्लॉप कॉलेजातून (नागपूर) इंटर झाल्यावर (१९२४) त्यांनी बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयातून प्राणिशास्त्र विषयात एम्. एस्‌सी. (१९२८) ही पदवी संपादन केली. त्याच विश्वविद्यालयात प्राणिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले (१९३०−३३). विद्यार्थी त्यांना गुरुजी म्हणत आणि याच उपाधीने ते पुढे ओळखले जाऊ लागले. संघ-शाखेशी १९३१ मध्ये त्यांचा संबंध आला. १९३२ मधील संघाच्या नागपूर येथील विजयादशमीच्या उत्सवाला ते हजर होते. पुढे नागपूरातूनच त्यांनी कायद्याची पदवी घेतली. याच काळात डॉक्टरांशी त्यांचा दृढ परिचय झाला. आजन्म अविवाहित राहून देशसेवा करण्याचा निर्धारही त्यांनी केला. त्यांनी स्वामी अखंडानंदाच्या सान्निध्यात आध्यात्मिक साधनेसाठी काही दिवस घालविले व त्यांच्या निधनानंतर ते नागपूरास परत आले. पुढील काळात संघकार्य हेच जीवितकार्य त्यांनी ठरविले. म. गांधींच्या हत्येनंतर त्यांना अटक झाली आणि सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात ठेवण्यात आले (१९४८). सहा महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली, पण त्यांच्या हालचालींवर बंदी होती. याच काळात संघावर बंदी घालण्यात आली. ९ डिसेंबर १९४८ पासून संघाने सत्याग्रहाचे अभियान सुरू केले आणि गुरूजींना पुन्हा कारावास घडला. १२ जुलै १९४९ रोजी संघबंदी उठवल्यानंतर गुरुजींनी भारतभर दौरा करून संघकार्यास चालना दिली. संघाने त्यांच्या नेतृत्त्वाखाली गोहत्याबंदी आंदोलनात भाग घेतला (१९५२). मुंबईला झालेल्या प्रांतीयता विरोधी परिषदेचे ते अध्यक्ष होते. विवेकानंद जन्मशताब्दी वर्षात त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली आणि विवेकानंद स्मारक समितीच्या कामास चालना दिली.


गोळवलकरांनी संघाची सूत्रे हाती घेतली. त्याआधीच मुस्लिम लीगचे लाहोरला फाळणीचा ठराव करून पाकिस्तानसाठी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे संघाचा हिंदू राष्ट्रवाद अधिक प्रखर झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनापासून संघ दूर राहिला तथापि काही संघनेत्यांनी भूमिगत कार्यकर्त्यांना आश्रय देऊन अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. १९४७ च्या फाळणीच्या भीषण कालात संघस्वयंसेवकांनी निर्वासितांना मदत केली. काश्मीर युद्धाच्या वेळीही संघकार्यकर्ते सक्रिय राहिले.

महात्मा गांधीजींच्या खुनाने संघावर फार मोठा आघात झाला. नथुराम गोडसे हा माणूस संघात होता. तो महाराष्ट्रीय ब्राह्मण होता. बहुतेक सर्व संघनेतेही महाराष्ट्रीय ब्राह्मण असल्यामुळे महात्मा गांधीजींच्या खुनाबद्दल संघाला दूषण देण्यात आले. नंतरच्या काळात खेळ, क्लब, धार्मिक उत्सव इ. निमित्तांनी संघ स्वयंसेवक एकत्र येऊ लागले. काहींना बंदीविरूद्ध आंदोलन करून कारावास पतकरला. तरुण स्वयंसेवकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या नव्या विद्यार्थी संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. १९४९ साली बंदी उठली तेव्हापासून राजकारणापासून अलिप्त राहून सांस्कृतिक कार्यावर भर देणारी आपली संघटना आहे, असे संघातर्फे वारंवार घोषित करण्यात येऊ लागले तथापि श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या नव्या भारतीय जनसंघ या राजकीय पक्षातही कित्येक संघकार्यकर्ते काम करू लागले. मुखर्जींच्या मृत्यूनंतर तर जनसंघ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच एक आघाडी असल्याचा प्रत्यय अनेकदा येऊ लागला. त्यामुळे दैनंदिन राजकारणापासून संघ अलिप्त असल्याच्या दाव्यावर बाहेरच्या सुबुद्ध लोकांना विश्वास ठेवणे अशक्य झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेतलेल्या काही स्वयंसेवकांनी भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना सुरू केली. विद्यार्थी परिषद, कामगारसंघ यांप्रमाणेच वनवासी कल्याण केंद्र, विवेकानंद केंद्र, विश्व हिंदू परिषद, पतितपावन संघटना यांसारख्या अनेक आघाडयान संघकार्यकर्त्यांनी उभारल्या. तांत्रिक व कायदेशीर दृष्ट्या या सर्व संस्था व संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून अलग राहिल्या पण या सर्वांमध्ये सरसंघचालकांचे आदेश पाळणारे, संघटनेच्या भूमिकेस बांधलेले कार्यकर्ते नेतृत्त्व करीत आहेत.

देशाची फाळणी संघाने अनेक वर्षे मनाने स्वीकारली नाही. स्वतंत्र भारताच्या समान नागरिकत्त्वाच्या तत्त्वावर उभारलेल्या सर्वसंग्राहक राष्ट्रवादावर गुरुजींचा व संघाचा कधीही विश्वास नव्हता. धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) राष्ट्रवादाला त्यांनी पहिली दोन दशके कडाडून विरोध केला. संघाचा हिंदू राष्ट्रवाद अधिक आक्रमक बनत चालला. स्वातंत्र्यपूर्व कालातील जातीय दंगलीत बहुसंख्य ठिकाणी मुसलमान आक्रमक भूमिका घेत आणि हिंदू होरपळून निघत. त्या उलट परिस्थिती स्वातंत्र्यानंतर निर्माण झाली. त्यामुळे संघाच्या आक्रमक संरक्षण या कल्पनेला वास्तवात अर्थ उरला नाही. उलट या जातीय दंगलीत सर्वसामान्यपणे संघाचा हात होता असे आरोप प्रत्येक दंगलीनंतर करण्यात आले. आक्रमक हिंदू राष्ट्रवादामुळेच गोहत्याबंदीच्या आंदोलनात संघ स्वयंसेवकांनीही अत्यंत हिरिरीने भाग घेतला. या आंदोलनात पुढे दंगलीही उसळल्या.

दैनंदिन राजकारणात संघ उघडपणे भाग घेत नसला, तरी भारतीय संविधानात राज्यांना अधिक अधिकार असण्याऐवजी केंद्र शासन अधिक सामर्थ्यवान व्हावे, भाषावार प्रांतरचना करू नये, शक्य तो एकच केंद्र शासन असावे, विधिमंडळात भौगोलिक मतदारसंघातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात, त्यांच्या जोडीला विविध व्यावसायिकांचे वेगळे मतदारसंघ असावेत व त्यांना राखीव प्रतिनिधित्त्व द्यावे, असा आग्रह गुरुजींच्या लिखाणातून आढळतो. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची नविडणूक होऊ नये, तर सरपंच एकमताने निवडावा, यांवरही गुरुजींनी भर दिला. १९६५ साली गुरुजींचे बंच ऑफ थॉट्स  हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याची अनेक भागांत भाषांतरे झाली. संघाचे समर्थन करणारी, गुरुजींच्या विचारांचा प्रसार करणारी शेकडो नियतकालिके अनेक भाषांतून निघाली. परिणामी संघाची अधिक प्रभावशाली प्रचारयंत्रणा उभी राहिली.

बंच ऑफ थॉट्स मधील अवतरणे उद्‌घृत करून संघ हा अल्पसंख्याकांचा शत्रू असून सर्वसंग्राहक राष्ट्रवादाला कसा विरोधी आहे, हे दाखविणाऱ्या पुस्तिका सांप्रदायिकताविरोधी समितीने प्रसिद्ध केल्या. संघावर जातीयता, आक्रमक हिंदुत्ववाद, उजव्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार इ. आरोप करण्यात आले. संघाच्या प्रचार माध्यमांनी हेडगेवारांच्या टीकेला प्रत्युत्तर न देण्याची प्रथा मोडून हिरिरीने आपले समर्थन केले परंतु हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व ही तत्त्वप्रणाली ते इतरांच्या गळी उतरवू शकले नाहीत. तशात गुरूजींनी चातुर्वर्ण्याचा पाठपुरावा करणारी विधाने केल्यामुळे संघाची बाजू अधिकच लंगडी झाली. जनसंघ या राजकीय पक्षात संघकार्यकर्त्यांचे प्राबल्य असले, तरी एक राजकीय पक्ष म्हणून हिंदुमहासभेचे सदस्यत्व अहिंदूंना मिळू शकत नाही, याच मुद्यावर त्यांनी महाभसेशी फारकत घेतली होती. परंपरागत धार्मिक निष्ठांवर श्रद्धा राखणाऱ्या कडव्या संघनेत्यांना जनसंघात राहूनही त्याचे सदस्यत्व मुसलमान, ख्रिश्चन आदी अल्पसंख्याकांनाही खुले असावे, याचे वैषम्य वाटत असे. या आणि इतर काही मुद्यांवरून जनसंघामध्येही कडवे हिंदुराष्ट्रवादी संघकार्यकर्ते आणि इतर असा अंतर्विरोध निर्माण झाला.

तेहतीस वर्षे सरसंघचालक म्हणून कार्य केल्यावर गुरुजींचे १९७३ मध्ये निधन झाले, त्या वर्षी संघशाखांची संख्या अकरा हजारांवर आणि नियमित स्वयंसेवकांची संख्या पाच लाखांवर पोहोचली होती. शहरांतूनच संघाचा व्याप अधिक वाढला होता. संघकक्षेबाहेर असलेल्या सुशिक्षितांवर आणि ग्रामीण जनतेवर संघाचा प्रभाव पडू शकला नाही.

गुरुजींनंतर मधुकर दत्तात्रेय ऊर्फ बाळासाहेब देवरस (५ नोव्हेंबर १९१५−   ) यांजकडे सरसंघचालक म्हणून संघाची सूत्रे आली. त्यांचा जन्म नागपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील सरकारी नोकर होते. मॅट्रिकनंतर (१९३१) नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून पदवी घेऊन ते एल्एल्. बी. झाले (१९३७). माधवराव मुळे, एकनाथजी रानडे यांच्याप्रमाणेच प्रचारक म्हणून बाळासाहेबांचे संघात स्थान होते. संघाच्या कार्यपद्धतीसंबंधी मूलभूत विचार करण्यासाठी भरलेल्या नागपूरजवळच्या शिंदी येथील बैठकीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी नागपूरचे ते शहर कार्यवाह होते. पुढे १९४६ मध्ये ते संघाचे सहसरकार्यवाह झाले. भैय्याजी दाणींच्या निधनानंतर सरकार्यवाहवे पद त्यांच्याकडे आले (१९६५). या पदावर ते सरसंघचालक होईतोपर्यंत (१९७३) होते.

देवरसांच्या कारकीर्दीतच संघाच्या राजनैतिक मतप्रणालीत स्पष्ट बदल होऊ लागला. १९७४ साली गुरुजींचेच पण बंच ऑफ थॉट्स पेक्षा कितीतरी कमी वादग्रस्त विचारांचे चिंतनसामग्री  हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. तेव्हापासून संघाविरुद्धच्या टीकेचे मोहोळ शमत चालले. सत्ता केंद्रित झाली म्हणजे एकाधिकारशाही येते, यास्तव सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे व्यक्तिविकास धर्मप्रवण मनाच्या बैठकीतूनच साधता येतो आणि धर्मप्रवणता हीच शासनविरहित समाजाची प्रेरणाशक्ती होऊ शकेल तथापि ‘साधनानाम्‌ अनेकता’ या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला आपापली उपासनापद्धती ठरविण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आपला व्यक्तिविकास करून घेताना इतरांना त्रास होऊ नये, यासाठी सामाजिक अनुशासनावर भर देणे आवश्यक आहे आहे नैतिकतेची बंधने कठोरपणे पाळावीत, पण सर्वांनाच एकपत्नीत्वाच्या साच्यात राहण्याची सक्ती करू नये, यासारखे गुरुजींचे विचार अर्थातच कमी वादळी ठरले. १९७४ सालीच संघाची ओळख करून देणारी एक वेगळी पुस्तिका प्रसिद्ध झाली. तीत हिंदू हा विशिष्ट धर्म नसून ‘सर्वधर्म समादाय भव’ या हिंदू संस्कृतीच्या पायावर उभारलेला सर्व समूहा आहे, हे एक महत्त्वाचे विधान आहे. १९७९ सालाच्या दुसऱ्या एका पुस्तिकेत हिंदू धर्माचे किंवा संस्कृतीचे औदार्य हे सहनशीलतेच्या (टॉलरन्स) वरच्या दर्जाचे आहे, असा दावा मांडला आहे. त्यासाठी ‘एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति’ या वचनाचा आधार घेतला आहे.

देशात १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली आणि संघ व इतर अनेक संघटनांवर बंदी घालण्यात आली. अनेक संघनेते तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले, तर कित्येक अज्ञातवासात राहिले. मात्र आणीबाणी रद्द होऊन जनता राजवट आल्यावर संघाच्या कार्याला जोराने गती मिळाली. आंध्र, केरळ, तमिळनाडू या संघापासून दूर राहिलेल्या प्रदेशांतही संघशाखा सुरू झाल्या. तेथील संघशाखांची पुढील आकडेवारी पाहता दक्षिणेत संघाचा प्रभाव वाढला आहे, असे दिसते. १९८७ मध्ये केरळ-४,७००, आंध्र प्रदेश-१,०४०, कर्नाटक-१,४०० व तमिळनाडू-७०० संघशाखा होत्या. ग्रामीण भागांतून संघकार्य विस्तारू लागले. आदिवासींमध्ये संघ कधीही पोहोचला नव्हता, तेथेही संघशाखा दिसू लागल्या. यापूर्वी संघ मानवी अगर नैसर्गिक आपत्तींच्या वेळीच जनसेवेचे कार्य हाती घेई. गेली काही वर्षे आर्थिक प्रगती व्हावी, या हेतूने काही दूरदूरच्या खेड्यांतून आणि विभागातूनही संघकार्यकर्ते विधायक कार्यात गुंतलेले आढळतात. एक ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी तर उत्तर प्रदेशाचा गोंड नावाचा एक मागासलेला जिल्हाच विकासासाठी निवडून तेथे १९७९ पासून कार्य सुरू केलेले आहे.

आणीबाणीविरुद्धचा लढा, जनता राजवट, विद्यमान सरसंचालक बाळासाहेब देवरस यांनी ध्येयधोरणात संथ, पण निश्चितपणे केलेले बदल या सर्वांमुळे त्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या आठ वर्षांतच संघशाखांची संख्या वीस हजारांवर आणि नियमित स्वयंसेवकांची संख्या दहा लाखांवर गेली आहे.


संघाच्या घटनेत बदल झाल्याचे जाहीर नसले, तरी हल्ली अहिंदूंनाही संघात प्रवेश मिळतो असे सांगितले जाते. संघटनेच्या साच्यात विशेष बदल झालेले नाहीत. सरसंघचालक, सरकार्यवाह, सहसरकार्यवाह, प्रचार-प्रमुख, बौद्धिक प्रमुख आणि व्यवस्था-प्रमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय नेतृत्त्व करतात. पंचवीस सदस्यांची केंद्रीय कार्यकारिणी धोरणविषयक निर्णय घेते. त्यांना १२५ सदस्य असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेकडून मान्यता मिळवावी लागते. कामकाजाच्या सोयीसाठी संघाने देशाचे पाच मुख्य भाग (क्षेत्र-प्रांत) केले असून त्यांत एकूण अठरा संघप्रांतांचा समावेश आहे. कार्याच्या दृष्टीने संघाचे ३५४ जिल्हे असून त्यांची १,९५० तालुक्यांत विभागणी झाली आहे. हेडगेवारांच्या वेळेपासून संघकार्य चालविण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शाखेत स्वयंसेवकाकडून वर्गणी, देणगी, किंवा गुरुदक्षिणा गोळा केली आहे. हल्ली वार्षिक गुरुक्षिणेचा आकडा एक कोटीवर गेला आहे.

संदर्भ : 1. Andersen W. K. Damle, S. D. The Brotherhood in Saffron, New Delhi, 1987.

2. Curren. J. A. Militant Hindulsm in Indian Politics : A Study of the R. S. S., New York,1951.

3. Madhok, Balraj, Indian Natlonalism, New Delhi, 1969.

4. Mishra, Dina Nath, R. S. S.: Myth and Reality, Ghaziabad, 1978.

5. Purohit, B. R. Hindu Revivalism and Indian Nationalism, Sagar, 1965.

६. देशपांडे, स. ह. संघातील दिवस, पुणे, १९८३.

७. मोडक, अशोक, संघाचे आव्हान, सातारा, १९८५.

नगरकर, वसंत