जोझेफ स्टालिन स्टालिन, जोझेफ : (२१ डिसेंबर १८७९ — ५ मार्च १९५३). सोव्हिएट राजकीय नेता व हुकूमशहा. त्याचा जन्म जॉर्जियातील गोरी या शहरात एका चर्मकाराच्या कुटुंबात झाला. त्याचे पूर्वज गुलाम होते. त्याच्या वडिलांनी गुलामीतून सुटका करून घेऊन चर्मकाराचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला पण अपेक्षित यश आले नाही. ते व्यसनी बनले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. स्टालिनची आई अशा छळातून आणि गरिबीतून स्टालिन-वर धार्मिक सं स्कार  करीत  होती.  वडील वारले त्यावेळी स्टालिन अकरा वर्षांचा होता.

 जॉर्जियाची राजधानी तिफ्लिस येथे पाद्रीचे शिक्षण देणार्‍या शाळेत स्टालिन १८९४—९९ पर्यंत शिकला. या शाळेच्या कठोर शिस्तीचा त्याच्या मनावर खूपच परिणाम झाला असावा. शिक्षण पूर्ण झाले त्यावेळी तो वीस वर्षांचा होता आणि त्याला भोवतालच्या परिस्थितीतील विषमतेची, अन्यायाची, सत्तेच्या दुरुपयोगाची कल्पना येऊ लागली होती. अनेक वर्षे जॉर्जिया झारच्या दडपशाहीखाली चिरडला जात होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या प्रांतात स्वातंत्र्यवादी चळवळ तीव्र बनू लागली होती. स्टालिन ज्या धार्मिक शाळेत शिकत होता, तेथेही जहाल बंडखोरांचे स्तोम माजले होते. जॉर्जियन भाषा, इतिहास, संस्कृती आणि लोक यांचा अपमान करणारे अनेक प्रसंग त्या धार्मिक शाळेत घडत होते आणि त्यांना प्रतिकार करण्याची बंडखोर वृत्तीही वाढत होती. त्यातूनच मार्क्सवादी विचाराचा अभ्यास करणारा एक गट तयार झाला होता. स्टालिनचा १८९८ मध्ये एका स्थानिक मार्क्सवादी अभ्यासमंडळाशी निकटचा संबंध आला. हळूहळू तो मार्क्सवादी विचार कामगारांना सांगू लागला. त्याने शाळा सोडली आणि तिफ्लिसच्या वेधशाळेत कारकून म्हणून नोकरी धरली (१८९९). १ मे १९०१ रोजी तिफ्लिसमधील कामगारांच्या एका मोर्चावर पोलिसांनी हल्ला केला. काही पुढारी पकडले गेले. स्टालिन भूमिगत झाला. त्याची नोकरी गेली. स्टालिनच्या आयुष्याला क्रांतिकारक कलाटणी देणारी ही घटना ठरली. त्या दिवसापासून तो क्रांतिकारक बनला.

  स्टालिनचे संघटनकौशल्य त्याच्या ज्येष्ठ सहकार्‍यांच्या लक्षात यावयास वेळ लागला नाही. तिफ्लिसहून त्याची रवानगी बाटूमला झाली. तेथेही त्याने कामगारांचा संप घडवून आणला. १८ एप्रिल १९०२ रोजी त्याला अटक झाली. दीड वर्षानंतर त्याला हद्दपारीची शिक्षा झाली. तेथून तो १९०४ मध्ये निसटला आणि बोल्शेव्हिकांना मिळाला. स्टालिन परत तिफ्लिसला आला  त्यावेळी जॉर्जियातील सोशल डेमॉक्रॅटिक चळवळ हीच मुख्यतः कामगार वर्गाचे नेतृत्व करणारी संघटना होती. त्या चळवळीत १९०३ नंतर बोल्शेव्हिक व मेन्शेव्हिक असे दोन गट पडले. बोल्शेव्हिक गटाचा पुढारी लेनिन होता. त्याचे काही कार्यकर्ते जॉर्जियात काम करीत होते. त्यांच्याशीही स्टालिनचा संबंध आला. पुढे १९०५ ची क्रांती झाली. या क्रांतीत कॉकेशस, बोल्शेव्हिक गटाचा एक क्रियाशील सभासद व महत्त्वाकांक्षी कार्यकर्ता म्हणून स्टालिनचे नाव पुढे आले. लवकरच तो त्या भागात लेनिनच्या कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाचा गणला जाऊ लागला.

  १९०५ ची क्रांती १९१७ च्या क्रांतीची रंगीत तालीम होती. दरम्यानच्या — बारा वर्षांच्या — काळात स्टालिनचे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली बनत गेले. संघटनेत त्याचे वजन वाढत गेले. तसेच त्याची पकडही घट्ट होत गेली पण हे सर्व पडद्याआड राहून तो करीत होता. स्टालिनलाही आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी लेनिनसारख्या राष्ट्रीय नेत्याचा उपयोग होईल असे वाटत होते. एकमेकांच्या अशा गरजू भावनेतून त्या दोघांचे संबंध वाढत गेले. १९०७ मध्ये स्टालिन कॉकेशसमधील ब्राकू शहर कमिटीचा सभासद होता. तेथील खनिज तेल उद्योगातील कामगारांचे नेतृत्व त्याच्याकडे होते. त्यामुळे स्वाभाविकच त्याला राष्ट्रीय पातळीवर हळूहळू महत्त्व येऊ लागले. कडवा प्रशासक आणि लढाऊ नेता अशा विविध अंगांनी स्टालिनचे महत्त्व वाढत गेले. त्याच्या संघर्षात्मक नेतृत्वामुळे स्टालिन पकडला गेला. दोन वर्षांनी सुटून आल्यावर त्याने पुन्हा कामगारांचे नेतृत्व हाती घेतले. आता तो नेत्यांच्या चुकांवर टीका करण्याइतका धाडसी व मोठा बनला होता. १९१० मध्ये स्टालिनला पुन्हा अटक व हद्दपारी झाली. रशियातील वातावरण क्रांतीच्या दिशेने तापू लागले. असंतोष वाढू लागला. लेनिनने या असंतोषाला तीव्र करण्यासाठी जे निवडक विश्वासू सहकारी निवडले, त्यात स्टालिनचा समावेश होता. १९१२ मध्ये स्टालिन लेनिनचा उजवा हात बनला. त्याच्याकडे अनेक मोठ्या जबाबदार्‍या टाकण्यात आल्या. भूमिगत राहून त्याने क्रांतिसाठी वातावरण तापविले. तो बोल्शेव्हिक पक्षाचा प्रमुख पुढारी बनला. १९१३ नंतर राष्ट्रीय पुढार्‍यांत त्याला महत्त्वाची भूमिका मिळाली. लेनिनच्या कार्यात, कारस्थानात आणि क्रांतीत त्याने महत्त्वाचा भाग घेतला.

  मार्च १९१७ मध्ये रशियात पहिली क्रांती झाली. सर्व राजकीय बंदिस्तांची मुक्तता झाली. स्टालिनही त्यावेळी राजरोसपणे लोकांपुढे आला. लेनिनशी मतभेद असूनही स्टालिनने त्याचे नेतृत्व व धोरण मान्य केले. नोव्हेंबरच्या क्रांतीमध्ये स्टालिनने संघटना मजबूत करून लेनिनच्या मागे पक्षबळ कायम ठेवले. पक्षसंघटनेवरील त्याची पकड खूपच वाढली होती. क्रांतिनंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्टालिनचा समावेश राष्ट्रीय लोकसमूह मंत्री म्हणून झाला. स्टालिन पक्षाच्या कार्यकारिणीचाही सभासद होता. लेनिन, ट्रॉट्स्की व स्टालिन हे तीन नेते रशियाचे भाग्यविधाते आहेत, असे त्यावेळी रशियन जनतेला वाटत होते.

  स्टालिन कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस झाला (१९२२). तो त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा क्षण होता. सोव्हिएट राज्य, कम्युनिस्ट पक्ष आणि शासनयंत्रणा या तिन्हींवर तो आपले वर्चस्व प्रस्थापित करू लागला. लेनिन अर्धांगवायूच्या आजारामुळे सक्रिय राजकारणातून दूर झाला तेव्हा स्टालिनचे वर्चस्व वाढत गेले. लेनिनच्या निधनानंतर (१९२४) त्याने क्रमाक्रमाने विरोधक नष्ट करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. १९२४—२९ या कालखंडात ट्रॉट्स्की, ल्येव्ह कॉमिन्यिव्ह, झ्याझिनॉव्हयी यांसारख्या मातब्बर विरोधकांना सत्तासंघर्षात पराभूत करण्यात तो यशस्वी झाला. 

  स्टालिनला अन्नटंचाई, बेकारी, कारखानदारीची उणीव इ. प्रश्न भेडसावत होते. त्यासाठी त्याने सामुदायिक शेतीचा प्रयोग १९२८ मध्ये केला आणि सधन शेतकर्‍यांचे ( कुलक ) निर्दलन करण्याचा व ग्रामीण भागात सामुदायिक शेती संघटित करण्याचा आदेश दिला. त्यामुळे प्रचंड विरोध झाला. सामुदायिक शेतीची संकल्पना सर्व बाजूंनी अयशस्वी झाली आणि उत्पादन घटले. पुढे त्याने रशियाच्या औद्योगिकीकरणाची पंच-वार्षिक योजना हाती घेतली पण तीही कोलमडली. स्टालिनच्या कार-किर्दीचा तो अत्यंत आणीबाणीचा काळ होता पण त्यातून त्याने डोके वर काढले. त्यावेळी त्याच्या कडक शिस्तीची, निर्दय संघटनकौशल्याची आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या चिकाटीची कसोटीच लागली. समाजवादी अर्थव्यवस्थेचा, उद्योगसंपन्न रशियाचा आणि लष्करी सामर्थ्याचा पाया घालण्याचे कार्य याच वेळी स्टालिन करू शकला. त्यातून त्याला मार्क्स-वादाची तत्त्वे कितपत रुजविता आली हा प्रश्न सोडला तर, त्याने रशियाला जगातील एक बलाढ्य राष्ट्र बनविण्याची भूमिका १९२८ पासून तयार केली, हे नाकारता येणार नाही.

  स्टालिनचा एक निकटचा सहकारी किराव्ह हा डिसेंबर १९३४ मध्ये मारला गेला. त्याचा बदला स्टालिनने आपल्या विरोधकांचे शिरकाण करून घेतला. सतत चार वर्षे रशियात कत्तलींचे पर्व चालू होते. पक्षाचे शुद्धीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या घटना यांमुळे रशियात भीषण भयग्रस्तता पसरली. गुप्तहेरांचा सुळसुळाट आणि स्टालिनचे लहरी राजकारण यांतून कोणालाच वाचण्याची शाश्वती वाटेनाशी झाली. या मार्गाने स्टालिनने पक्षातील आपले सत्तायंत्र अधिक मजबूत केले.

  दुसर्‍या महायुद्धाचा आरंभ झाला (१९३९) आणि स्टालिनला समझोत्याचे राजकारण करण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. त्याने हिटलरशी करार करून  युद्धासाठी अवधी मिळविला. त्यानंतर हिटलरशी झालेल्या युद्धात कमालीचा कणखरपणा दाखवून आणि दोस्तांचे सहकार्य मिळवून त्याने हिटलरवर विजय संपादन केला पण त्याचबरोबर युद्धात भयानक हानीही झाली. ती भरून काढण्यासाठी स्टालिनने पूर्व यूरोपच्या भूमीवर पश्चिमी राष्ट्रांविरुद्ध शीतयुद्ध पुकारले. यावेळी स्टालिनने राष्ट्रवादाची भूमिका स्वीकारून पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रूमानिया, बल्गेरिया, पूर्व जर्मनी इ. देशांत स्थानिक अल्पसंख्य गटाला सत्तारूढ केले आणि रशियाच्या व पश्चिम यूरोपच्या दरम्यान आपल्याला अनुकूल असा एक कम्युनिस्ट राष्ट्रगट निर्माण केला. पूर्व यूरोपच्या सत्ताकारणामुळे रशियन सत्तेचे क्षेत्र खूपच विस्तारले आणि जागतिक राजकारणात रशियाचे सामर्थ्य प्रचंड वाढले.

  युद्धोत्तर पुनर्रचनेसाठी स्टालिनला पुन्हा एकदा क्रूर सर्वंकष हुकूमशाही मार्गांचा अवलंब करावा लागला. परिणमत: सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा लोप झाला. रशियन जनता युद्धामुळे हैराण झाली होती पण तिलाच वेठीस धरून स्टालिनने युद्धोत्तर रशियाच्या निर्मितीची योजना आखली. औद्योगिक व लष्करी दृष्ट्या रशियाला पुन्हा समर्थ करण्याचे कार्य त्याने सुरू केले.

  ज्यू डॉक्टरांनी स्टालिनविरुद्ध आणि पक्षाच्या सर्व पुढार्‍यांविरुद्ध कारस्थान केले. सर्वांना ठार करण्याचा कट रचला (१९५२). अशा काही आरोपावरून पुन्हा एकदा शिरकाणाची लाट उसळणार अशी भीती रशियात निर्माण झाली पण त्याच सुमारास स्टालिनचा मास्को येथे मृत्यू झाला. त्याचा खून झाला असावा, असाही एक प्रवाद आहे पण वस्तुस्थिती बाहेर आली नाही. लेनिनच्या मृत्यूनंतर तीस वर्षे रशियाचा इतिहास स्टालिननेच घडविला आणि रशियाला एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनविले.

  स्टालिनची पहिली बायको अशिक्षित कामगार वर्गातील होती. ती लवकरच वारली. १९१९ मध्ये त्याने दुसरे लग्न केले पण दुसर्‍या बायकोने १९३२ मध्ये आत्महत्या केली. त्याचा मुलगा याकोब सैन्यात अधिकारी होता, तर मुलगी स्वेतलाना एका भारतीयाशी विवाहबद्ध झाली परंतु पतीच्या निधनानंतर ती अमेरिकेत गेली. 

  स्टालिनच्या निधनानंतर ख्रुश्चॉव्हने कम्युनिस्ट पक्षाच्या एका अधि-वेशनात त्याच्या भीषण, क्रूर कृत्यांचा पाढा वाचला. तेव्हापासून रशियातून स्टालिनच्या पुतळ्यांची, चित्रांची, एवढेच नव्हे, तर स्थाननामांची देखील संपूर्ण हकालपट्टी झाली. काही वर्षांपूर्वी लाल चौकातील समाधीत असलेले लेनिनच्या शेजारचे स्टालिनचे शवही अज्ञातस्थळी नेले आहे. स्टालिन हा असहिष्णू , सत्तांध आणि स्वयंकेंद्री होता पण त्याच्या काळातच रशियाचे सामर्थ्य वाढले. म्हणून रशियाच्या संदर्भात तरी तो त्या देशाचा महान शिल्पकार ठरतो यात शंका नाही.

 संदर्भ : 1. Bullock, Alan, Hitler and Stalin : Parallel Lives, New York, १९९१. 

           2. Conquest, Robert, Stalin : Breaker of Nations, New Delhi, १९९१. 

           3. Volkogonov, Dmitri, Stalin : Triumph and Tragedy, Russia, १९९१.

           4. समाजप्रबोधिनी पत्रिका, सोव्हिएट रशियाची पन्नास वर्षे, अंक १० व २०, पुणे, १९६८.                      

गर्गे, स. मा.

Close Menu
Skip to content